(Source: Poll of Polls)
गुजरात निवडणुकीसाठी काँग्रेसचा नवा फॉर्म्युला, अशोक गेहलोत-सचिन पायलट यांना बनवलं स्टार प्रचारक
Gujarat Assembly Election 2022: काँग्रेस पक्षाचे नवनिर्वाचित राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पक्षाची सूत्रे हाती घेताच निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
Gujarat Assembly Election 2022: काँग्रेस पक्षाचे नवनिर्वाचित राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पक्षाची सूत्रे हाती घेताच निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. काँग्रेस समोरील आव्हाने पाहता खर्गे यांनी निवडणूक रणनीती तयार केली आहे. या रणनीतीनुसार राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांना गुजरात निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या जोडीला टक्कर देण्यासाठी मैदानात उतरवण्यात आले आहे. काँग्रेस पक्षाने आपल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली असून त्या यादीत मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना वरिष्ठ निरीक्षक बनवण्यात आले आहे. विशेष म्हणजे सत्तेत किंवा संघटनेत नसलेले माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांना स्टार प्रचारक म्हणून मैदानात उतरवले आहे. पुढील महिन्यात गुजरात-हिमाचलमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत.
राजस्थान काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या राजकीय वादाला पूर्णविराम देण्यासाठी आणि आपसातले मनमुटाव दूर करण्यासाठी हायकमांडने हा खास फॉर्म्युला स्वीकारला आहे. काँग्रेसने गुजरात-हिमाचल निवडणुकीसाठी स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली होती, ज्यात 40 नेते तसेच मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासमवेत पक्षाने दिलेली जबाबदारी स्वीकारली आहे.
राजस्थान काँग्रेसचे गेहलोत आणि पायलट यांच्यासह इतर नेत्यांनाही मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. काँग्रेस हायकमांडने गुजरात निवडणुकीसाठी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांची वरिष्ठ निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. त्याचबरोबर काँग्रेस पक्षाने रघू शर्मा यांना गुजरातचे प्रभारी बनवले असून त्यासोबतच गेहलोत यांच्याकडे हिमाचल निवडणुकीच्या प्रचाराची जबाबदारी देण्यात आली आहे. काँग्रेस हायकमांडने सचिन पायलट यांची हिमाचल निवडणुकीसाठी निरीक्षक म्हणून नियुक्ती केली असून निवडणूक प्रचारासाठी स्टार प्रचारकांच्या यादीत सचिन पायलट यांचे नाव समाविष्ट करण्यात आले आहे.
सचिन पायलट यांच्या गुजरातमध्ये 4 सभा होणार
गुजरात निवडणुकीतील स्टार प्रचारक म्हणून 31 ऑक्टोबरला सचिन पायलट एकापाठोपाठ एक अशा एकूण 4 जाहीर सभांना संबोधित करणार आहेत. ज्यात सचिन पायलट यांचा पहिला कार्यक्रम गुजरातच्या खेडा येथील पागलवरल येथे 10:30 वाजता होणार असून, येथे ते जाहीर सभेला संबोधित करणार आहेत. यानंतर ते काँग्रेसच्या परिवर्तन संकल्प यात्रेला हिरवा झेंडा दाखवतील आणि त्यानंतर साडेअकरा वाजता राजकोटच्या वीरपूरमध्ये त्यांच्या स्वागतासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यानंतर सचिन पायलट यांचा तिसरा कार्यक्रम गुजरातमधील माही सागर जिल्ह्यातील लोणावळा येथे आहे. जिथे ते 12:15 वाजता संतपूर येथे जाहीर सभेला संबोधित करतील. यानंतर शेवटी चौथ्या कार्यक्रमात ते दाहोद येथे दुपारी 4.15 वाजता जाहीर सभेला संबोधित करणार आहेत.