Eknath Shinde On Neelam Gorhe: काळेधंदे बाहेर काढल्याने मिरच्या लागल्या; एकनाथ शिंदेंकडून नीलम गोऱ्हेंची पाठराखण, राज ठाकरेंचंही नाव घेतलं!
Eknath Shinde On Neelam Gorhe: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी नीलम गोऱ्हेंची पाठराखण केली आहे.

Eknath Shinde On Neelam Gorhe मुंबई: शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी ठाकरे गटाबाबत केलेल्या मर्सिडीजबाबतच्या विधानावरुन महाराष्ट्रात राजकारण (Maharashtra Politics) तापलं आहे. ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज दिल्या की एक पद मिळायचं, असा खळबळजनक आरोप नीलम गोऱ्हे यांनी केला. नीलम गोऱ्हेंच्या या विधानावरुन ठाकरे गट चांगलाच आक्रमक झाला आहे. याचदरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी नीलम गोऱ्हेंची पाठराखण केली आहे.
एकनाथ शिंदे म्हणाले की, नीलम गोऱ्हे यांनी दिल्लीच्या साहित्य संमेलनातील व्यासपीठावरुन एक वाक्य बोलल्या ते काहीजणांना प्रचंड झोंबले. नीलम गोऱ्हेंनी त्यांचे काळे धंदे बाहेर काढल्याने त्यांना मिरच्या लागल्या. नीलम गोऱ्हे यांच्यापुर्वीही अनेक लोक याबाबत बोलले आहेत, असं एकनाथ शिंदे म्हणाले. तसेच राज ठाकरे बोलले की त्यांना खोके नाही तर कंटेनर लागतात. नारायण राणे, रामदास कदम, नितेश राणे, निलेश राणे देखील यापूर्वी बोलले आहेत. मात्र नीलम गोऱ्हे बोलल्या, तर लगेचच त्यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका करणे हे तुम्हाला शोभत नाही, अशी टीका एकनाथ शिंदेंनी केली.
आमची देना बँक आहे आणि समोर लेना बँक- एकनाथ शिंदे
आमची देना बँक आहे आणि समोर लेना बँक आहे, असा टोलाही एकनाथ शिदेंनी लगावला. तसेच महिलांवर अत्याचार झाल्यास पहिल्या धावून जाणाऱ्या नीलम गोऱ्हे होत्या. शक्ती विधेयकामध्ये नीलम गोऱ्हेंचं योगदान मोठं आहे. जे चांगलं काम करतात त्यांना बदनाम कसं करायचे ही यांची पोटदुखी असल्याचे मत एकनाथ शिंदेंनी व्यक्त केले.
आता त्यांना कायमचं घरी बसवायचंय- एकनाथ शिंदे
पोटदुखी यांची जात नाही, कारण ते डॉक्टरकडून नाही तर कंपाऊंडरकडून औषध घेतात. आधीच्या मुख्यमंत्र्यांनी अडीच वर्षात 2.5 कोटी रूपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून दिले. मी अडीच वर्षांत 460 कोटी मदतनिधीतून दिलेत. लोकसभेत फेक नरेटिव्हनं त्यांनी लोकांची मत मिळवली, पण विधानसभेत लोकांना त्यांची असलीयत कळली.आता आपलं अर्जुनासारखं एकच लक्ष पाहिजे, मिशन मुंबई...जादुगाराचा जीव पोपटात असतो, तसा काहींचा जीव या मुंबई महापालिकेत आहे. कारण काही लोकांना ती सोन्याचं अंडं देणारी कोंबडी वाटते, त्यांना आता कायमचं घरी बसवायचंय, विधानसभेत त्यांना आपण घरी बसवलंय, असं एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.
























