महाराष्ट्रासोबत होणाऱ्या हरियाणाच्या विधानसभा निवडणुकीचे बिगूल वाजणार, निवडणूक आयोग आज तारीख जाहीर करणार!
केंद्रीय निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेणार आहे. या पत्रकार परिषदेत हरियाणा आणि जम्मू-काश्मीरच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा होऊ शकते.
नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोग (Election Commission Of India) आज हरियाणा आणि जम्मू काश्मीरच्या विधानसभा निवडणुका (Jammu And Kashmir Election) जाहीर करण्याची शक्यता आहे. आज दुपारी 3 वाजता निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेणार असून यावेळी निवडणूक आयोग या दोन राज्यांसाठीचा सविस्तर निवडणूक कार्यक्रम सार्वजनिक करणार आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र विधानसभेचा निवडणूक कार्यक्रम कधी जाहीर होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हरियाणा राज्याचा निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता
साधारण 2009 सालापासून तीन वेळा महाराष्ट्र आणि हरियाणा या दोन्ही राज्यांच्या विधानसभा निवडणुका सोबतच आयोजित केल्या जातात. निवडणूक आयोगाकडून प्रत्येक निवडणुकीला या दोन्ही राज्यांचा निवडणूक कार्यक्रम सोबतच जाहीर केला जातो. मात्र यावेळी फक्त हरियाणा राज्याचाच विधानसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. हरियाणातील विद्यमान विधानसभेचा कार्यकाळ येत्या नोव्हेंबरमध्ये संपणार आहे. त्यामुळे आता महाराष्ट्राची निवडणूक कधी जाहीर होणार? याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.
जम्मू काश्मीरच्या निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर होणार?
जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 रद्दबातल ठरवल्यानंतर जम्मू आणि काश्मीरमध्ये विधानसभेच्या निवडणुका जाहीर झालेल्या नाहीत. 30 सप्टेंबर 2024 पर्यंत जम्मू आणि काश्मीरच्या निवडणुका आयोजित कराव्यात असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे. त्यामुळे आजच्या पत्रकार परिषदेत केंद्रीय निवडणूक आयोग जम्मू आणि काश्मीरसाठीही निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याची शक्यता आहे. जम्मू-काश्मीरमध्ये एकूण 90 जागांसाठी ही निवडणूक होईल.
अनेक दिवसांपासून निवडणुकीची तयारी
गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय निवडणूक आयोगाकडून हरियाणा आणि जम्मू काश्मीरच्या विधानसभा निवडणुकीसाठी तयार केली जात आहे. याच तयारीचा एक भाग म्हणून निवडणूक आयोगाच्या काही अधिकाऱ्यांनी हरियाणा आणि जम्मू-काश्मीरला भेट दिली होती. त्यानंतर केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांच्यासोबत निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची बुधवारी बैठक झाली. निवडणुकीदरम्यानच्या सुरक्षेबाबत या बैठकीत चर्चा झाली आहे.
दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयोगाने आज दुपारी तीन वाजता फक्त पत्रकार परिषद घेण्याचे जाहीर केले जात आहे. या पत्रकार परिषदेत निवडणूक आयोग नेमकं कोणत्या राज्यांसाठी निवडणुका जाहीर करणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे.
हेही वाचा :
Maharashtra MLA List : महाराष्ट्रातील सर्व आमदारांची नावे, 288 विधानसभा, जिल्हानिहाय आमदारांची यादी