Madha : मोहिते पाटलांची माढ्यातून माघार? सध्यातरी'वेट अँड वॉच'ची भूमिका, शरद पवार आणि देवेंद्र फडणवीसही कात्रीत
Manoj Jarange Madha Sabha : मोहिते पाटलांनी गेल्या दोन दिवसांपासून त्यांचा प्रचार थांबवल्यामुळे ते माघार घेणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. त्यामुळे भाजपचे रणजित निंबाळकर आणि रासपच्या महादेव जानकर यांच्यात लढत होण्याची शक्यता आहे.
सोलापूर: माढा लोकसभा मतदारसंघात (Madha Lok Sabha Election) आता मोहिते पाटील हाती तुतारी घेणार की भाजपमध्येच राहणार याची चर्चा सुरूच आहे. पहिले पाच दिवस प्रचाराचा धडाका लावलेल्या मोहिते पाटील यांचा प्रचार गेल्या दोन दिवसापासून थंडावल्याने सध्या शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस हे दोघेही कात्रीत सापडल्याचं दिसतंय. मोहिते पाटील काय भूमिका जाहीर करतील याकडे भाजप आणि शरद पवार गट डोळे लावून बसला होता. मात्र मोहिते पाटील यांनी केवळ मतदारांचा कौल जाणून घेत असल्याची भूमिका घेतली आहे. यामुळे भाजप खासदार रणजित निंबाळकर आणि रासपचे महादेव जानकर यांच्यात माढा लोकसभेची लढत होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
अनिकेत रामराजे निंबाळकर आणि धैर्यशील मोहिते पाटील यांनी एकत्रित शिखर शिंगणापूर येथे शंभो महादेवाची पूजा केली होती. यावेळी आम्ही एकत्रित आलो हा योगायोग होता असे सांगत माढा लोकसभेला उमेदवार कोण हे 12 एप्रिल रोजी समजेल असे सांगत सस्पेन्स वाढवण्याचा प्रयत्न केला होता .
खासदार निंबाळकर यांच्या पाठीशी भाजपची ताकद
माढा लोकसभेसाठी खासदार रणजित निंबाळकर आणि धैर्यशील मोहिते पाटील हे दोन इच्छुक उमेदवार होते. माढा लोकसभा मतदारसंघातील सहा पैकी पाच आमदारांनी आपले वजन विद्यमान खासदार रणजित निंबाळकर यांच्या पारड्यात टाकल्याने भाजपकडून रणजित निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. यानंतर सुरु झालेले मोहिते पाटील आणि रामराजे निंबाळकर यांचे नाराजी नाट्य राज्याने पाहिले.
खासदार रणजित निंबाळकर यांना काम करण्यासाठी तसे अडीच वर्षाचं मिळाले. पहिल्या अडीच वर्षात राज्यात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असल्याने त्यांची कोणतीही योजना मंजूर होत नव्हती. यानंतर मात्र सत्तांतर झाल्यावर निंबाळकर यांनी या अडीच वर्षात कामाचा एवढा झपाटा दाखवला की पाण्याच्या योजना, महामार्ग , रेल्वेची कामे वेगाने मंजूर झाली. त्यामुळेच देशातील टॉप टेन खासदाराच्या त्यांचे नाव असल्याचे खुद्द भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे याना सांगावे लागले .
मोहिते पाटलांमुळे शरद पवार देखील अडकले कात्रीत
माढा लोकसभेसाठी मोहिते पाटील यांनी आग्रह धरल्याने भाजपने मोहिते पाटील यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र नाराज मोहिते पाटील यांनी सुरुवातीला गावभेटीचा जोरदार धडाका लावल्याने मोहिते पाटील आता शरद पवार गटात जातील अशी चर्चा सुरु होती. मात्र मोहिते पाटील यांच्याशी शरद पवार गटातील मध्यस्थांच्या मार्फत चर्चा होऊनही मोहिते पाटील यांनी ठोस भूमिका घेतली नाही. त्यामुळे शरद पवार यांनी राज्यातील धनगर समाजाला खुश करण्यासाठी रासप अध्यक्ष महादेव जानकर यांच्यासाठी जागा सोडण्याची भूमिका घेतली.
जानकरांना दिलेली उमेदवारी बदलणे अवघड
भाजपकडून तिकीट बदलाचे कोणतेही संकेत न मिळाल्याने मोहिते पाटील पुन्हा शरद पवार गटातून उभारणार अशी चर्चा काळापासून पुन्हा सुरु झाली आहे. मात्र शरद पवार यांनी वारंवार संकेत देत महादेव जानकर यांची उमेदवारी निश्चित केल्याने आता ती बदलणे पवार यांनाही परवडणारे नाही. मोहिते पाटील यांच्यासारखा पश्चिम महाराष्ट्रातील मोठा गट आपल्यात येणे जेवढे शरद पवार याना फायदेशीर आहे तेवढाच तोटा आता महादेव जानकर यांची उमेदवारी बदलणे यामध्ये आहे.
माढा लोकसभा मतदारसंघातील बारामती आणि इतर अनेक मतदारसंघात धनगर समाजाची भूमिका निर्णायक ठरणारी आहे. अनेक वर्षे धनगर समाज हा पवार यांच्यावर नाराज आहे. ही नाराजी दूर करत माढासोबत सुप्रिया सुळे यांच्या बारामती लोकसभा मतदारसंघाचे गणित बसवण्यासाठी पवार यांनी महादेव जानकर यांच्यासारख्या मोठ्या धनगर नेत्याची उमेदवारी निश्चित केली होती.
यामुळे भाजपचा पारंपरिक मतदार असणारा धनगर समाज भाजपपासून दूर न्यायचा आणि त्याचा फायदा महायुतीला मिळवून द्यायचा ही खेळी शरद पवार यांची होती. मात्र आता पुन्हा मोहिते पाटील यांना उमेदवारी देणे म्हणजे धनगर समाजाचे वादळ अंगावर ओढवून घेणे असे होणार आहे. यामुळेच मोहिते पाटील यांच्यामुळे खुद्द शरद पवार हे देखील आता कात्रीत सापडले आहेत.
मोहिते पाटील यांच्यामुळे भाजपाही कात्रीत
शरद पवार यांचे अत्यंत निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे मोहिते पाटील यांच्यात 2019 मध्ये लोकसभा उमेदवारीमुळे मतभेद झाल्याने मोहिते पाटील हे भाजपच्या गळाला लागले होते. मात्र यावेळी मोहिते पाटील यांनी लोकसभा निवडणूक न लढवता फलटण येथील रणजित निंबाळकर यांना उमेदवारी देऊन राष्ट्रवादीचा बालेकिल्ला भाजपने भेदला होता.
मोहिते पाटील यांच्या येण्याचा फायदा भाजपाला पश्चिम महाराष्ट्रातील अनेक लोकसभा मतदारसंघात झाला होता. त्यानंतर भाजपने रणजितसिंह मोहिते पाटील याना विधानपरिषद दिली, त्यांच्या अनेक योजनांना मंजुरी दिल्या, मोहिते पाटील यांच्या कारखान्याला भरगच्चं पॅकेज दिले. यामुळे मोहिते पाटील भाजपशी साथ सोडणार नाहीत ही खात्री देवेंद्र फडणवीस याना होती. मात्र मोहिते उमेदवारीसाठी ज्या पद्धतीने आक्रमक झाले ते पाहता आता भाजपनेही हा विषय गंभीरपणे घेतल्याचे चित्र आहे.
मोहिते पाटील यांनाही भाजपाची नाराजी अजिबात परवडणारी नसली तरी समर्थकांच्या रेट्यामुळे जर मोहिते पाटील गटाकडून भाजप विरोधी काम झाले तर मोहिते पाटील यांच्याही अडचणी वाढणार आहेत याची जाणीव मोहिते पाटील याना आहे. एकाबाजूला '400 पार'चा नारा देत असताना भाजपाला मोहिते गटाची समजूत काढून माढा जिंकावा लागणार आहे. भाजपने मोहिते पाटील यांच्यासाठी उमेदवारी बदलली तर त्यांना मतदारसंघातील पाच आमदारांच्या नाराजीही सामोरे जावे लागणार आहे .
रणजित निंबाळकर आणि महादेव जानकर यांची लढत निश्चित
आता माढा लोकसभा मतदारसंघाचा तिढा सोडवताना भाजपनेही विद्यमान खासदार रणजित निंबाळकर यांच्याच पाठीशी संपूर्ण ताकद उभी करण्यास सुरुवात केली आहे. शरद पवार यांच्याकडूनही रासपसाठी उमेदवारी निश्चित करून धनगर मताला आपलेसे करायचा प्रयत्न सुरु केला आहे.
उमेदवारीचे काय होणार हे 12 एप्रिल रोजी समजेल असे सांगणारे मोहिते पाटील हे आता काय करणार याची उत्सुकता असली तरी येत्या दोन दिवसात भाजप उमेदवार रणजित निंबाळकर यांच्या प्रचाराचा नारळ फोडण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. मोहिते पाटील यांनी योग्यवेळी निर्णय न घेतल्याने आता त्यांना शांत राहण्याची वेळ येणार आहे.
ही बातमी वाचा: