(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Samit Kadam: देवेंद्र फडणवीसांची कथित ऑफर घेऊन आल्याचा आरोप, अनिल देशमुखांच्या रडारवर, कोण आहेत मिरजेचे समित कदम?
Maharashtra Politics: तीन वर्षांपूर्वी फडणवीसांचा खासा समित कदम माझ्याकडे प्रतिज्ञापत्र घेऊन आला होता, अनिल देशमुखांकडून फडणवीसांवरील आरोपांचा पुनरुच्चार. जेल में जाओ नही तो बीजेपी में आओ, हे भाजपचे धोरण असल्याचा आरोप.
मुंबई: महाविकास आघाडी सरकारच्या काळात मी गृहमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांच्याकडून एक माणूस माझ्याकडे आला होता. या व्यक्तीने मला ईडीच्या कारवाईपासून वाचण्यासाठी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप करण्याची ऑफर दिली होती, असा आरोप अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी केला होता. देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ऑफर घेऊन येणारी व्यक्ती म्हणजे समित कदम (Samit Kadam) असल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर अचानक प्रकाशझोतात आलेले समित कदम कोण, अशा प्रश्न सर्वांनाच पडला होता. देवेंद्र फडणवीस यांच्या इतक्या निकट असणाऱ्या आणि फडणवीसांच्या महत्त्वाच्या योजना पूर्णत्त्वाला नेणाऱ्या समित कदम यांच्याविषयी अनेकांच्या मनात कुतूहल निर्माण झाले होते. भाजपच्या नेत्यांकडून सध्या आमचा किंवा देवेंद्र फडणवीस यांचा समित कदम यांच्याशी कोणताही संबंध नसल्याचे सांगितले जात असले तरी सोशल मीडियावरील व्हायरल झालेल्या फोटोंमुळे फडणवीस आणि समित कदम यांच्यातील कनेक्शनभोवती निर्माण झालेले संशयाचे धुके आणखीनच गडद झाले आहे.
समित कदम आहेत तरी कोण?
जनसुराज्य शक्ती पक्षाचे युवा प्रदेशाध्यक्ष म्हणून समित कदम गेल्या काही वर्षांपासून धुरा सांभाळत आहेत. मूळचे मिरजेचे असलेले समित कदम यांची प्रदेशाध्यक्ष पदामुळे राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीए आघाडीतील सर्व पक्षातील नेत्यांशी घनिष्ठ संबंध निर्माण झाले आहेत. समित कदम यांचे वडील बाळासाहेब कदम हे मिरजेचे नगराध्यक्ष राहिलेले आहेत. समित कदम यांनी गेल्या काही वर्षांमध्ये जनसुराज्य शक्ती पक्षाच्या माध्यमातून कोल्हापूर, सांगली, नाशिक, यासह महाराष्ट्राभर पक्षांच्या माध्यमातून युवकांचे संघटन करण्याचे काम केले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी समित कदम यांचे कौटुंबिक संबंध असल्याचेही सांगितले जाते.
समित कदमांनी अनिल देशमुखांचे आरोप फेटाळले
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करताना समित कदम यांचं नाव घेत फडणवीस आणि समित कदम यांना आपल्याला भेटायला पाठवलं होतं असा आरोप केला होता. यामुळे मूळच्या सांगलीतील मिरज मधील असलेले समित कदम यांचे नाव चर्चेत आलंय. देवेंद्र फडणीस आणि समित कदम यांचे घनिष्ट संबंध असल्याचाही आरोप आज देशमुख यांनी केला. यावर समित कदम यांनी देखील प्रत्युत्तर दिले.
अनिल देशमुख यांनी केलेले सर्व आरोप समित कदम यांनी फेटाळून लावले आहेत. अनिल देशमुख यांचं डोकं फिरलं आहे. अनिल देशमुख अन्न व नागरी पुरवठा मंत्री असल्यापासून त्याचे आणि माझे संबंध आहेत. या गोष्टीचा त्यांना विसर पडला असेल. माझे देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतचे फोटो हे वर्तमानपत्रांमध्ये छापून आले आहेत, यामध्ये काही नवीन नाही, असे समित कदम यांनी स्पष्ट केले. तसेच संजय राऊत यांनी आरोप केलेल्या विधानावर देखील समित कदम यांनी देवेंद्र फडणीस यांचा विषय निघेल तेथे संजय राऊत यांनी बोलणं बंधनकारक झालेय असं म्हटलंय. तसेच समित कदम यांना वाय दर्जाची सुरक्षा दिली जाते यावर सुमित कदम यांनी मी घटक पक्षाचा अध्यक्ष आहे त्यामुळे मला सुरक्षा दिले याचा शोध त्यांनी घेऊ द्या, असेही कदम म्हणाले.
समित कदमांचे फोटो शरद पवार आणि आदित्य ठाकरे यांच्यासोबत: केशव उपाध्ये
समित कदम यांचे फोटो शरद पवार आणि आदित्य ठाकरे यांच्या सोबत देखील आहेत. राजकीय नेत्यांसोबत अनेक फोटो काढले जातात. मात्र, त्यावरून संदर्भ जोडला तर ती सगळ्यात मोठी राजकीय चूक आहे. अहो देशमुख साहेब पुरावे असतील तर ते कोर्टात द्यायचे असतात. तुम्ही राज्याचे गृहमंत्री होता. तुम्ही तरी असं करू नका. खोटा नरेटिव्ह सेट करु नका. खालच्या पातळीचे राजकारण करू नका, असे भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्य यांनी म्हटले.
आणखी वाचा