"असली फालतू बडबड करायला मी मोकळा नाही", प्रश्नाचं उत्तर देताना अजित पवार भडकले; नेमकं काय घडलं?
आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने सर्वच पक्ष कामाला लागले आहे. या निवडणुकीसाठी वेगवेगळ्या पक्षांनी आपली तयारी चालू केली आहे.

पुणे : आगामी विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवासांवर आली आहे. निवडणूक आयोगाकडून लवकरच या निडवणुकीची घोषणा केली जाऊ शकते. त्यामुळे राज्यातील सर्व महत्त्वाचे पक्ष तयारीला लागले आहेत. सत्ताधारी महायुतीनेही निवडणुकीसाठी रणनीती आखली आहे. महायुतीची सत्ता आल्यास राज्यात मुख्यमंत्री कोण असणार? असं विचारलं जातं. महायुतीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा अद्याप ठरलेला नाही. याबाबतच विचारले असता उपमुख्यमंत्री अजित पवार चांगलेच भडकले. असली फालतू बडबड करायला मी मोकळा नाही. मला गरिबी, विकास याबाबत विचारत जा, असे अजित पवार म्हणाले. ते पुण्यात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देत होते.
मुख्यमंत्रिपदासंदर्भात काहीही काळजी करू नका
आगामी मुख्यमंत्री कोण असणार? असे अजित पवार यांना विचारण्यात आले. यावर बोलताना "भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी या तीन पक्षांच्या नेत्यांच्या नेतृत्त्वाखाली आगामी विधानसभा निवडणूक लढवली जाणार आहे. मुख्यमंत्रिपदासंदर्भात काहीही काळजी करू नका. या राज्याला मुख्यमंत्री दिला जाईल," असे अजित पवार म्हणाले.
मला फक्त विकासाबाबत...
तसेच "याच कारणामुळे मी तुमच्याशी बोलत नाहीत. असली फालतू बडबड करायला मी मोकळा नाही. मी कामाचा माणूस आहे. तुम्ही सगळे अंथरूणात असताना माझी सकाळी सात वाजता बैठक चालू झाली होती. मी फक्त सांगतोय. त्यामुळे मला फक्त विकासाबाबत, गरिबीबाबत प्रश्न विचारा," अशी नाराजी अजित पवार यांनी व्यक्त केली.
"मला माझा वेळही घालवायचा नाही"
पुढे बोलताना, "राज्यातील गरिबी दूर करण्यासाठी योजना राबवल्या जात आहेत. राज्याचा सर्वांगीन विकास होण्यासाठी सरकारने पाऊलं उचलली आहेत. विरोधक काय म्हणाले, विरोधकांनी काय स्वप्न दावखली याला मला महत्त्व द्यायचं नाही. त्यांना उत्तरं देऊन मला माझा वेळही घालवायचा नाही," असंही अजित पवार म्हणाले.
अशा बातम्यांनी माझं मनोरंजन होतं
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून अजित पवार तिसऱ्या आघाडीच्या पर्यायाची चाचपणी करत आहेत, असं बोललं जातंय. यावरही त्यांनी भाष्य केलं. यामध्ये काहीही तथ्य नाही. अशा बातम्यांनी माझं मनोरंजन होतं. मी या चर्चा एका कानाने ऐकतो आणि दुसऱ्या कानाने सोडून देतो, असे अजित पवार यांनी सांगितले.
हेही वाचा :
गुलाबी स्टेज, गुलाबी बॅनर्स, 'पिंक पॉलिटिक्स'वर अजित पवार यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
राज्यात काहीही घडू शकतं, कदाचित शरद पवार-अजित पवार एकत्र येतील; अतुल बेनकेचं खळबळजनक वक्तव्य
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
