Shiv Sena Dasara Melava : दसरा मेळाव्याच्या जागेचा वाद टळला? शिंदेंचा मेळावा 'या' मैदानावर होण्याची शक्यता, ठाकरेंची तोफ शिवाजी पार्कवरच धडाडणार?
Shiv Sena Dasara Melava 2024 : एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर शिवसेनेचे दोन दसरा मेळावे पार पडतात. मागील वर्षी ठाकरे गटाचा मेळावा शिवाजी पार्कवर झाला. आझाद मैदानावर शिंदे गटाचा मेळावा झाला होता.
मुंबई : दसरा मेळावा ही शिवसेनेची (Shiv Sena Dasara Melava) परंपरा आहे. दसरा मेळाव्याच्या दिवशी होणाऱ्या भाषणाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेले असते. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलेल्या बंडानंतर शिवसेनेचे दोन दसरा मेळावे पार पडतात. मागील वर्षी शिवसेना ठाकरे गटाचा (Shiv Sena UBT) शिवाजी पार्कवर (Shivaji Park) दसरा मेळावा झाला होता. तर मुंबईतील आझाद मैदानावर (Azad Maidan) शिवसेना शिंदे गटाचा (Shiv Sena Shinde Group) दसरा मेळावा पार पडला. आता यंदा शिवसेना शिंदे गटाचा दसरा मेळावा नेमका कुठे होणार? याबाबत आता मोठी अपडेट समोर आली आहे.
यंदा शिवसेना शिंदे गटाचा दसरा मेळावा बीकेसी किंवा आझाद मैदान येथे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिवसेनेकडून दोन्ही मैदानाचे दसऱ्याच्या दिवशी आरक्षण करण्यात आले आहे. तर दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदानाची मागणी केली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यामुळे दसरा मेळाव्याच्या जागेवरून दोन्ही शिवसेनेत होणार वाद टळल्याचे दिसून येत आहे.
शिंदेसेनेचा दसरा मेळावा बीकेसी मैदानावर?
पुढील काही दिवसात शिवसेनेच्या महत्त्वाच्या नेत्यांकडून दोन्ही मैदानाची पाहणी केली जाणार आहे आणि अंतिम जागा निश्चित केली जाणार असल्याची माहिती मिळत असून बीकेसी मैदान अंतिम होण्याची शक्यता जास्त आहे. कारण याच ठिकाणी आधी देखील शिवसेना शिंदे गटाचा दसरा मेळावा पार पडला होता. मात्र आता शिवसेना शिंदे गटाचा दसरा मेळावा नेमका कुठे होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तर दरवर्षीप्रमाणे यंदाही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच होण्याची शक्यता आहे.
यंदा मनोज जरांगेंचाही दसरा मेळावा?
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे देखील यंदा दसरा मेळावा घेणार असल्याचे बोलले जात आहे. या मेळाव्याच्या नियोजनासाठी आज बीडच्या नारायणगड (Narayangad) येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले असून, या बैठकीत मेळाव्याची रूपरेषा ठरणार आहे. या बैठकीला बीड (Beed) जिल्ह्यातील मराठा आंदोलनातील समन्वयक व मराठा समाज बांधवांची उपस्थिती राहणार आहे. या बैठकीतच मनोज जरांगे पाटील यांच्या दसरा मेळाव्याची रूपरेषा व ठिकाण देखील ठरणार असल्याची माहिती मिळत आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या