"संजय राऊत सर्वात मोठा डोमकावळा, घाबरतो का मी..."; दादा भुसेंचा जोरदार पलटवार
Dada Bhuse on Sanjay Raut : उद्या डोम नावाच्या सभागृहात डोम कावळे जमणार आहेत, अशी टीका संजय राऊत यांनी शिवसेनेच्या वर्धापन दिनावरून शिंदे गटावर केली. यावरून दादा भुसेंनी संजय राऊतांवर पलटवार केलाय.
Dada Bhuse on Sanjay Raut : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज पत्रकार परिषदेत शिंदेंच्या शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला. बाळासाहेबांच्या विचारांशी बेईमानी करणाऱ्यांनी शिवसेनेचा वर्धापनदिन (Shiv Sena Foundation Day) साजरा करू नये. उद्या डोम नावाच्या सभागृहात डोम कावळे जमणार आहेत, असे त्यांनी म्हटले. तसेच मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा (Mumbai North West Loksabha) मतदारसंघात रवींद्र वायकरांच्या विजयावरूनही शिंदे गटावर निशाणा साधला. यावरून आता राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे.
शिवसेना पक्षाचा उद्या 58 वा वर्धापन दिन आहे. एकीकडे या वर्धापन दिनाची उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गटाकडून जोरदार तयारी सुरु आहे. तर दुसरीकडे दोनही शिवसेनेच्या नेत्यांमध्ये वर्धापनदिनावरून कलगीतुरा रंगला आहे. आज पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी वर्धापनदिनावरून शिंदे गटावर तोफ डागली. तर आता मंत्री दादा भुसे यांनी संजय राऊत यांच्यावर पलटवार केला आहे.
संजय राऊत सर्वात मोठा डोमकावळा
सर्वात मोठा डोमकावळा तर संजय राऊत आहे. घाबरतो का मी त्याला, असा एकेरी उल्लेख करत दादा भुसे यांनी संजय राऊत यांना डिवचले आहे. शिवसेना पक्षाच्या स्थापनेवेळी आम्ही गोधडीत होतो. तर राऊत कुठे होते. ते तर कारकूनी करत होते. आता त्यांना वेगळ्या पदाचे वेध लागले आहेत. पक्षाचे विचार आम्ही सोडलेले नाहीत. जिथे जिंकून येतात तिथे ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित केला जात नाही. पराभव झाला की लगेच ईव्हीएमकडे बोट दाखवल जाते. पुढील चार महिनेही असाच खोटा नेरेटिव्ह सेट केला जाणार आहे, अशी टीका त्यांनी यावेळी केली आहे.
काय म्हणाले होते संजय राऊत?
हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 58 वर्षांपूर्वी शिवसेनेचा पाया घातला. 58 वर्षांपासून बाळासाहेबांची शिवसेना काम करत आहे. आम्ही तेव्हापासून त्यांच्या विचारांनी भारावलेल्या सर्व तरुणांनी भगवा झेंडा आमच्या खांद्यावर घेतला. आम्ही अनेक संकटांना सामोरे गेलो. या पक्षासाठी आमच्या अनेक जुन्या सहकाऱ्यांनी बलिदान दिले आहे. आम्ही सर्वांनी तुरुंगवास भोगला. मात्र पक्षाशी इमान कायम ठेवला. आता जर कोणी म्हणत असेल ते शिंदे गट आमची शिवसेना खरी तर त्यांनी स्वतःला आरशात पाहावे. बाळासाहेबांची शिवसेना जेव्हा स्थापन झाली तेव्हा ते कुठे होते, कुठल्या गोधडीत रांगत होते. उद्या डोम नावाच्या सभागृहात कुठेतरी हे डोम कावळे जमणार आहेत, अशी टीका संजय राऊत यांनी केली होती.
आणखी वाचा