Buldhana Politics : "...तर स्वकर्तृत्वावर पक्ष आणि कार्यालये निर्माण करा", ठाकरे गटाचं आमदार संजय गायकवाड यांना आव्हान
Buldhana Politics : ठाकरे गटाचे राज्यातील कार्यालये आम्ही लवकरच ताब्यात घेणार असल्याचं वक्तव्य शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी नागपुरात केलं. त्यांना आता ठाकरे गटाचे बुलढाण्याचे संपर्क प्रमुख छगन मेहेत्रे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
Buldhana Politics : : उद्धव ठाकरे गटाचे राज्यातील कार्यालये आम्ही लवकरच ताब्यात घेणार असल्याचं वक्तव्य शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी नागपुरात केलं. त्यांना आता उद्धव ठाकरे गटाचे बुलढाण्याचे (Buldhana)संपर्क प्रमुख छगन मेहेत्रे (Chhagan Mehetre) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. तुमच्या आईने दूध पाजलं असेल तर स्वकर्तृत्वावर पक्ष आणि कार्यालये निर्माण करा, असं आव्हान छगन मेहत्रे यांनी दिलं आहे. मुंबई महापालिकेच्या (BMC) शिवसेना पक्ष कार्यालयावर शिंदे गटाच्या माजी नगरसेवकांनी दावा केला. यावरुनच काल शिंदे गट (Shinde Group) आणि ठाकरे गटात (Thackeray Group) राडा झाल्याचं पाहायला मिळालं. दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात घोषणाबाजी करत गोंधळ घातला. यावर छनग मेहेत्रे यांनी प्रतिक्रिया दिली.
'अरे! तुमच्या मायने अजून दूध पाजलं नाही. तुमच्यात हिंमत असेल पक्ष निर्माण करा, कार्यालय निर्माण करा'
ते म्हणाले की, मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेना गटनेत्यांचे कार्यालय काही मिंधे गटाच्या लोकांच्या कार्यकर्त्यांकडून ताब्यात घेण्याचा प्रयत्न झाला आहे. एकतर यांच्याकडे काही नाही. हे आयत्या पिठावर रेघोट्या ओढणारे लोक आहेत. पक्षाशी गद्दारी करुन हे महाराष्ट्रात काळ्या तोंडाने फिरत आहेत. त्यातल्या त्यात संजय गायकवाड या वाचाळवीराने असं म्हटलं आहे की, राज्यातील सर्व कार्यालय आम्ही ताब्यात घेऊ. अरे! तुमच्या मायने अजून दूध पाजलं नाही. तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही निर्माण करा. पक्ष निर्माण करा, कार्यालय निर्माण करा. तुम्ही बाळासाहेबांचं नाव चोरलं, तुम्ही धनुष्यबाण चोरला, तुम्ही पक्ष चोरला. अरे! नालायकांनो तुम्ही आता काय काय करणार आहात. महाराष्ट्रातील जनता येत्या निवडणुकीत तुम्हाला भुईसपाट केल्याशिवाय राहणार नाही. शिवसेनेच्या एकाही कार्यालयात तुम्हाला घुसू देणार नाही आणि घुसले तर परिणाम भोगायला ही तयार राहा. बाळासाहेबांचं किंवा उद्धव साहेबांचं कुठलंही कार्यालय घेण्याचा प्रयत्नही केला तर लक्षात ठेवा की गाठ शिवसेनेची आहे.
जे जे पक्षाचे कार्यालय असतील ते ते आम्ही घेणारच : संजय गायकवाड
आमच्याकडे 40 आमदार असल्यामुळे मोठा पक्ष आमचाच आहे. त्यामुळे जे जे पक्षाचे कार्यालय असतील ते ते आम्ही घेणारच, असं शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड नागपूरमध्य एबीपी माझाशी बोलताना म्हणाले होते. तसंच शिवसेना भवनाबाबत अद्याप धोरण ठरलेलं नाही, असंही त्यांनी सांगितलं.
VIDEO : Sanjay Gaikwad : हळूहळू शिवसेनेचं प्रत्येक कार्यालय आमच्या ताब्यात असणार: संजय गायकवाड
बीएमसीमध्ये काय घडलं?
मुंबई महापालिकेत दुपारी 4 वाजता शिंदे गटाच्या नेत्यांची एक टीम धडकली. त्यात खासदार राहुल शेवळे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष यशवंत जाधव, शीतल म्हात्रे, ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के अनेक जण होते. पालिकेत पोहचल्यानंतर त्यांनी सर्वात आधी शिवसेनेचं पक्षकार्यालय गाठलं. तिथे दाराजवळ असलेल्या बोर्डावर काही तरी छेडाछाड केली. त्यानंतर सगळे जण सभागृहात पोहोचले. शिवसेनेच्या पक्ष कार्यालयात दाखल होईल छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घातला आणि घोषणाही दिल्या. स्वच्छता केल्याचा दावा करत शिंदे गटातील नेत्यांनी बैठक सुरु केली. शिंदे गटाच्या हालचालींची माहिती मिळताच पुढच्या काही मिनिटांत मोठा ट्विस्ट आला. उद्धव ठाकरे गटातील माजी आमदारांसह शिवसैनिकांची मोठी फौजच तिथे पोहोचली आणि घोषणाबाजीला सुरुवात झाली. कार्यलयाच्या हॉलमध्ये दोन्ही गट एकमेकांसमोर आले. दोन्ही बाजूने जोरदार घोषणाबाजी सुरु झाली. तणाव वाढू लागला. दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांविरोधात घोषणाबाजी सुरु केली. अखेर बीएमसीच्या सुरक्षारक्षकांना सोबत घेऊन मुंबई पोलिसांनी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना पालिकेच्या इमारतीबाहेर काढलं.
संबंधित बातमी