CM Eknath Shinde On Sanjay Raut : संजय राऊत यांचं आक्षेपार्ह वक्तव्य, मुख्यमंत्र्यांचं प्रत्युत्तर, म्हणाले...
CM Eknath Shinde On Sanjay Raut : संजय राऊत यांनी केलेल्या आक्षेपार्ह टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. "खालच्या भाषेत टीका करणाऱ्यांना टीका करु दे, ते जेवढी टीका करत राहतील, तेवढं कामाने उत्तर देईन," असं मुख्यमंत्री म्हणाले.
CM Eknath Shinde On Sanjay Raut : ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलेल्या आक्षेपार्ह टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. "खालच्या भाषेत टीका करणाऱ्यांना टीका करु दे, ते जेवढी टीका करत राहतील, तेवढं कामाने उत्तर देईन," असं मुख्यमंत्री म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या शिवजन्मोत्सव कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री आग्र्यात होते. त्यावेळी बोलत असताना त्यांनी संजय राऊत यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.
त्यांच्या टीकेला मी कामाने प्रत्युत्तर देईन : मुख्यमंत्री
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "राजकारणाची पातळी कुणी कितीही सोडली असली तरी महाराष्ट्रातील जनता सुज्ञ आहे. ते योग्य वेळी उत्तर देतील. मी पातळी सोडणार नाही. खालच्या भाषेत टीका करणाऱ्यांना टीका करु दे. ते जेवढी टीका करत राहतील तेवढं मी कामाने उत्तर देईन. कोणी काहीही बोलू दे आम्ही कामाने उत्तर देऊ. महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास करण्यासाठी दिवसरात्र काम करणार. ते लोक जेवढे आरोप करतील, त्याच्या दहापट काम मी करणार."
संजय राऊत काय म्हणाले होते?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) काल (19 फेब्रुवारी) पुणे दौऱ्यावर होते. अमित शाह यांनी आपल्या पुणे दौऱ्यात 'मोदी @ 20' या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली होती. या कार्यक्रमात केलेल्या भाषणात अमित शाह यांनी यूपीए सरकार आणि उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका केली. मुख्यमंत्री पद मिळावं म्हणून उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीचे 'तळवे' चाटले असं वक्तव्य अमित शाह यांनी केलं होतं. यालाच प्रत्युत्तर देताना संजय राऊतांनी भाजपसह शिंदे गटातील नेत्यांचा समाचार घेतला. अमित शहा यांनी उद्धव ठाकरेंवर केलेल्या टीकेला उत्तर देताना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यांविरोधात अपशब्द वापरले होते. "आता सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कुणाची चाटत आहेत. अशी चाटूगिरी महाराष्ट्रात कधीच झाली नव्हती," अशी टीका संजय राऊत यांनी केली.
संजय राऊत यांच्यावर नाशिक, ठाण्यात गुन्हा
दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह भाजपवर आक्षेपार्ह भाषेत टीका केली होती. याप्रकरणी संजय राऊत यांच्याविरोधात नाशिक आणि ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिंदे गटाचे नेते योगेश बेलदार यांच्या तक्रारीवरुन नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यात संजय राऊत यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर ठाण्यातील नगर पोलीस ठाण्यात संजय राऊत यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
हेही वाचा
संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ, नाशिकनंतर ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल