Eknath Shinde: भावना गवळी यांना वाऱ्यावर सोडणार नाही; यवतमाळच्या सभेत एकनाथ शिंदेंची गॅरंटी
Yavatmal Washim Lok Sabha: यवतमाळ वाशिम लोकसभेत शिंदे गटाकडून राजश्री पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यासाठी पाच टर्म खासदार राहिलेल्या भावना गवळी यांचा पत्ता कट करण्यात आला. हा भावना गवळी यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
यवतमाळ: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात शिंदे गटाकडून विद्यमान खासदार भावना गवळी यांना डावलून राजश्री पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे भावना गवळी (Bhavana Gawali) प्रचंड नाराज झाल्या आहेत. यवतमाळ-वाशिम लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गुरुवारी शेवटचा दिसत होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत राजश्री पाटील (Rajashree Patil) आणि हिंगोलीतून बाबुराव कदम कोहळीकर यांनी आपले उमेदवारी अर्ज भरले. यानंतर यवतमाळमध्ये एकनाथ शिंदे यांची सभा झाली. या सभेतील भाषणावेळी एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी भावना गवळी यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला.
राजकारणात आपल्याला काही निर्णय घ्यावे लागतात. कोणालाही वाऱ्यावर सोडले जाणार नाही. भावना गवळी यांनाही आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही. आपण महायुतीचा अनादर करणार नाही, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. एकनाथ शिंदे यांनी हे वक्तव्य करुन भावना गवळी यांना एकप्रकारे गोंजारण्याचा प्रयत्न केला आहे. यावर आता भावना गवळी काय प्रतिक्रिया देतात, ते पाहावे लागेल.
यवतमाळ-वाशिमची उमेदवारी मिळवण्यासाठी भावना गवळी या शेवटच्या क्षणापर्यंत मुंबईत ठाण मांडून बसल्या होत्या. त्या नागपूरमध्ये जाऊन देवेंद्र फडणवीस यांनाही भेटल्या होत्या. मात्र, त्यांचे सगळे प्रयत्न फोल ठरले होते. शिंदे गटाकडून त्यांचा पत्ता कट झाल्यानंतर भावना गवळी यांनी माझी दावेदारी अजूनही कायम असल्याचे म्हटले होते. मी आता माझ्या मतदारसंघात जाऊन उमेदवारी अर्ज भरेन, असे भावना गवळी यांनी म्हटले होते. भावना गवळी या यवतमाळ-वाशिममधून सलग पाचवेळा निवडून आल्या आहेत. या मतदारसंघात त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे शिंदे गटाची डोकेदुखी वाढली होती.
राजश्री पाटील यांच्या नामांकन सभेत भावना गवळी गैरहजर
यवतमाळ-वाशिममधून तिकीट कापल्यानंतर भावना गवळी यांची नाराजी कायम असल्याचे गुरुवारी दिसून आले. त्या राजश्री पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरताना हजर नव्हत्या. राजश्री पाटील यांचा अर्ज भरतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सह संजय राठोड , मदन येरावार, दादा भुसे सह इतर आमदार उपस्थित होते. मात्र, भावना गवळी नामांकनाच्या वेळी देखील गैरहजर होत्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यवतमाळमध्ये येऊनही भावना गवळी आपल्या घरीच थांबल्या होत्या. त्यामुळे भावना गवळी यांची नाराजी कायम असल्याचे चित्र आहे.
आणखी वाचा: