Raigad Guardian Minister: रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी शिवसेनेच्या आमदारांची फिल्डिंग, देवेंद्र फडणवीसांना भेटून सगळं पक्कं करणार
Bharat Gogawale: महायुती सरकारमध्ये आता मंत्रिपदानंतर जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदावरुन वाद रंगण्याची चिन्हे दिसत आहेत. शिवसेना रायगडच्या पालकमंत्री पदासाठी आग्रही
मुंबई: राज्यातील 288 आमदारांचा शपथविधी पार पडल्यानंतर आता महायुतीच्या आमदारांना खातेवाटपाचे वेध लागले आहेत. आपल्याला मंत्रीपद मिळावं, यासाठी अनेक नेते देव पाण्यात बुडवून बसले आहेत. यासोबत जिल्ह्याच्या राजकारणाच्यादृष्टीने मंत्रिपदांइतकंच महत्त्व असलेल्या पालकमंत्री पदासाठीही सध्या महायुतीच्या नेत्यांमध्ये चढाओढ सुरु आहे. महायुती सरकारच्या गेल्या टर्ममध्ये वादाचा विषय ठरलेल्या रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदासाठी (Raigad Guardian Minister) शिंदे गटाच्या आमदारांनी जोरदार फिल्डिंग लावली आहे. यापूर्वी रायगडच्या पालकमंत्रीपदावरुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या अदिती तटकरे आणि भरत गोगावले (Bharat Gogawale) यांच्यात वाद पाहायला मिळाला होता. त्यामुळे या खेपेला रायगडचे पालकमंत्रीपद हे भरत गोगावले यांनाच मिळेल, यासाठी शिवसेनेच्या रायगडमधील आमदारांनी एकत्र येत रणनीती आखली आहे.
शिवसेनेचे कर्जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी यासंदर्भात 'एबीपी माझा'शी संवाद साधला. यावेळी महेंद्र थोरवे यांनी रायगडच्या पालकमंत्रीपदावर शिवसेनेचा हक्क असल्याचे ठणकावून सांगितले. रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री पद हे शिवसेनेलाच मिळाले पाहिजे, असे आम्ही तिन्ही आमदारांनी एकनाथ शिंदे यांना सांगितले आहे. आम्ही लवकरच यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटू. भरत गोगावले यांनाच रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री करावे, असे आम्ही त्यांना सांगू. 2019 साली रायगड जिल्ह्यातील तीन आमदार असताना उद्धव ठाकरे यांच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा पालकमंत्री झाला. त्यामुळेच एकनाथ शिंदे यांच्या उठावावेळी आम्ही त्यांना साथ दिली. महायुतीच्या गेल्या टर्ममध्येही भरत गोगावले यांना मंत्री करण्यात आले नाही. त्यांनी तेदेखील सहन करुन पक्षासाठी योगदान दिले, असे महेंद्र थोरवे यांनी म्हटले.
कर्जतला पर्यटन तालुका म्हणून घोषित करावे; महेंद्र थोरवेंची मागणी
गेल्या पाच वर्षांत शिंदे साहेबांच्या नेतृत्त्वाखाली काम करताना मी कर्जत मतदारसंघात विकासकामांसाठी मोठा निधी घेऊन गेलो. त्यामुळे कर्जतच्या जनतेने मला पुन्हा संधी दिली. सध्या राज्याचा कारभार तीन अभ्यासू नेत्यांच्या हातात आहे. त्यांच्या नेतृत्त्वाखाली राज्याच्या विकासासाठी काम करणे, ही अभिमानाची गोष्ट असल्याचे महेंद्र थोरवे यांनी सांगितले. यावेळी महेंद्र थोरवे यांनी कर्जतला पर्यटन तालुक्याचा दर्जा द्यावा, अशी मागणी केली.
कर्जतचा परिसर हा निसर्गसंपन्न आहे, माझ्या मतदारसंघात माथेरान हे गिरीस्थान येते. कर्जतमध्ये अनेक हॉटेल्स आणि रिसॉर्ट आहेत. त्यामुळे कर्जतला पर्यटन तालुका म्हणून घोषित करावे. कर्जतमध्ये कोणताही औद्योगिक प्रकल्प नाही. त्यामुळे आगामी काळात कर्जत तालुक्याची अर्थव्यवस्था पर्यटनावर चालावी, ही माझी इच्छा असल्याचे महेंद्र थोरवे यांनी सांगितले.
आणखी वाचा