जानकरांनी राजीनामा द्यावा, मी कशावरही निवडणूक लढायला तयार, राम सातपुतेंचं आव्हान, म्हणाले पवारांच्या सभेला पडळकरांच्या सभेनं चोख उत्तर देणार
शरद पवार (Sharad Pawar) यांच्या सभेला येत्या दोन दिवसात गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांच्या सभेने चोख उत्तर दिले जाईल असं वक्तव्य भाजपचे माजी आमदार राम सातपुते यांनी केलं आहे.
Ram Satpute on Uttam Jankar : शरद पवार (Sharad Pawar) यांच्या सभेला येत्या दोन दिवसात गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांच्या सभेने चोख उत्तर दिले जाईल असं वक्तव्य भाजपचे माजी आमदार राम सातपुते यांनी केलं आहे. मारकडवाडी येथील ग्रामस्थ आणि मतदार हे मोहिते पाटील यांचे कट्टर विरोधक असून त्यांच्याकडून कधीही या गावात विकासाची कामे झाली नव्हती असे सातपुते म्हणाले. उत्तम जानकर यांच्या विरोधात मला पडलेली मते ही माझ्या विकास कामामुळे आणि मोहिते पाटील विरोधामुळे मिळाली असल्याचे सातपुते म्हणाले.
मोहिते पाटील आणि उत्तम जानकर यांचा दिवा विजायला आलेला आहे. उत्तम जानकर यांनी राजीनामा देऊन कशावर हवे त्यावर निवडणूक लढवावी, मी लढायला तयार आहे असे आव्हान राम सातपुते यांनी दिलं आहे. रणजितसिंह मोहिते पाटील यांना जनाची नाही तर मनाची लाज असेल तर त्यांनी विधान परिषदेचा राजीनामा द्यावा असा टोलाही राम सातपुते यांनी लगावला आहे. आज जमा झालेली लोक हे रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या कारखान्यावरचे आणि धैर्यशील मोहिते पाटील यांच्या दूध संघातील असल्याचा टोलाही सातपुते यांनी लगावला.
शरद पवारांनी दिली मारकडवाडी गावाला भेट
ईव्हीएममधून झालेल्या मतदानावर शंका उपस्थित करत सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस विधानसभा मतदारसंघातील मारकडवाडी (Markadwadi) गावाने मतपत्रिकेवर मतदान घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, प्रशासनाने दबाब टाकत अभिरुप मतदानाचा प्रयोग बंद पाडला. आज याच मारकडवाडी गावाला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी भेट दिली. या गावात सभेत बोलताना शरद पवार यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले आहे. देशाचे अनेक खासदार मला भेटतात, ते एकच चर्चा करतात ती फक्त तुमच्या गावाची. मला विचारतात की हे गाव कुठे आहे? संपूर्ण देशाच्या जे लक्षात आले नाही ते या गावकऱ्यांच्या कसे लक्षात आले? तुमच्या सगळ्यांचे अभिनंदन संपूर्ण देश करत आहे, याचाच आम्हा सर्वांना आनंद होत असल्याचे शरद पवार म्हणाले. आज अमेरिका, इंग्लंडमध्ये ईव्हीएमवर निवडणूक होत नाही. लोकांना स्वतःचे अधिकार देण्यासाठी ईव्हीएम नको असे तिथे म्हणतात. मग आमचाच हट्ट का? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. मी चार पाच दिवसापूर्वीच येणार होतो. तुम्ही मतदान करायचा निर्णय घेतल्यावर पोलीस खात्याने तुम्हाला थांबवले. तुमच्या गावात तुम्हालाच जमावबंदी केली. हा कुठला कायदा? असा सवालही शरद पवार यांनी उपस्थित केला.
महत्वाच्या बातम्या: