फक्त 45 आमदारांच्या जीवावर नाना पटोले-भास्कर जाधवांची मोठी उडी, देवेंद्र फडणवीसांकडे मागितली 'ही' दोन महत्त्वाची पदं
Maharashtra Politics : सत्ताधाऱ्यांकडे विधानसभा अध्यक्षपद तर विरोधकांकडे विधानसभेचे उपाध्यक्ष पद असावं. अशी विनंती आम्ही मुख्यमंत्र्यांसमोर केली असल्याची माहिती भास्कर जाधव यांनी दिली आहे.
Maharashtra Politics मुंबई : महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आज बैठक घेऊन विधानसभा अध्यक्ष पदाचा अर्ज न भरण्याबाबत निर्णय घेतला. त्या बदल्यात आम्ही विरोधी पक्षनेते पद आणि विधानसभा उपाध्यक्ष पद आम्हाला मिळावं, यासाठी मुख्यमंत्र्यांसमोर प्रस्ताव ठेवला. त्यांची भेट घेतली. दरम्यान, 1999 पासूनची परंपरा होती की सत्ताधाऱ्यांकडे विधानसभा अध्यक्षपद तर विरोधकांकडे विधानसभेचे उपाध्यक्ष पद असावं. भाजप आणि शिवसेनेच्या काही चुकांमुळे ही परंपरा खंडित झाली होती. त्यामुळे ही परंपरा पुन्हा सुरू करावी आणि उपाध्यक्ष पद मिळावं अशी विनंती आम्ही मुख्यमंत्र्यांसमोर केली असल्याची माहिती शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी दिली आहे.
महाविकास आघाडीचे नेते नाना पटोले, भास्कर जाधव, अस्लम शेख आणि विजय वडेट्टीवार यांनी आज मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. याभेटीनंतर ते बोलत होते.
देवेंद्र फडणवीस आमच्या दोन प्रस्तावासंदर्भात सकारात्मक- भास्कर जाधव
राज्य चालवण्यासाठी जेवढे सत्ताधारी महत्त्वाचे असतात, तेवढेच विरोधक महत्त्वाचे आहे. त्यामुळेच विरोधी पक्षनेते पद आम्हाला मिळावं, असं आम्ही मुख्यमंत्र्यांना बोललो. विरोधी पक्ष नेता निवडीसाठी संख्याबळ महत्त्वाचं नाही. हा मुद्दा मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पटवून दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आमच्या दोन प्रस्तावासंदर्भात सकारात्मक आहेत. विधानसभा अध्यक्ष निवडीनंतर यासंदर्भात निर्णय होईल असेही ते म्हणाले.
विधानसभा अध्यक्ष बिनविरोध व्हावा ही परंपरा- नाना पटोले
दरम्यान, या विषयी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, विधानसभा अध्यक्ष बिनविरोध व्हावा ही परंपरा राहिली आहे. विरोधीपक्ष नेता यासंदर्भात व्यवस्था असली पाहिजे. दिल्लीत आप ने भाजपचा विरोधी पक्षनेता तयार केला होता. ही भूमिका आम्ही मांडली. विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक बिनविरोध होणार असल्याचे नाना पटोले म्हणाले.
सलग दुसऱ्यांदा राहुल नार्वेकर यांच्याकडे अध्यक्षपद जाणार
महाराष्ट्रात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेत बंड केले आणि त्यानंतर भाजपबरोबर जात सरकार स्थापन केले. यानंतर विधानसभा अध्यक्षपद हे भाजपनं त्यांच्याकडे घेतलं होतं. यावेळी भाजपनं आमदार राहुल नार्वेकर यांच्याकडे अध्यक्षपदाची जबाबदारी दिली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा राहुल नार्वेकर यांच्याकडे विधानसभेचं अध्यक्षपद जाणार आहे. फक्त नावाचा घोषणा होणच बाकी आहे. आज उमेदवारी अर्ज भरण्याची दुपारी 12 वाजेपर्यंत मुदत होती. या काळात महाविकास आघाडीकडून एकाही उमेदवाराने अर्ज दाखल केला नाही. त्यामुळं राहुल नार्वेकर हे बिनविरोध अध्यक्ष होणार आहेत. नार्वेकर हे दुसऱ्यांदाविधानसभा अध्यक्ष होणार आहेत. दरम्यान, राहुल नार्वेकर हे कुलाबा विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून निवडून आले आहे. नार्वेकर सलग दुसऱ्यांदा या मतदारसंघातून विजयी झाले आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या