Chhagan Bhujbal : होय, मी नाराज... छगन भुजबळ तडकाफडकी नाशिकला; अजित पवारांच्या राष्ट्रवादीत राहणार की वेगळा निर्णय घेणार?
Chhagan Bhujbal : मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळ तडकाफडकी नाशिकला रवाना झाले आहेत.
Chhagan Bhujbal : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) रविवारी झाला. या मंत्रिमंडळ विस्तारात उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या (Ajit Pawar) राष्ट्रवादी काँग्रेसकडून (NCP) नऊ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना मंत्रिमंडळात संधी मिळणार अशी चर्चा असतानाच त्यांना मंत्रिमंडळातून डावलण्यात आले. त्यानंतर त्यांची आपल्याच पक्षातील नेत्यांबाबतची नाराजी लपून राहिलेली नाही. भुजबळांनी कमी शब्दात आगामी काळातील आपल्या राजकारणाची दिशा दाखवून दिली आहे. त्यामुळे भुजबळ काय निर्णय घेणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
छगन भुजबळ यांच्या नाराजीच्या चर्चा सुरू झाल्या आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून छगन भुजबळ यांची दखल घेत थेट त्यांना राज्यसभेवर पाठवण्याची तयारी पक्षाकडून सुरू असल्याची माहिती एबीपी माझाला विश्वसनीय सूत्रांनी दिली. पक्षाकडून ही देखील बाब सांगण्यात आली होती की, छगन भुजबळ यांचीच इच्छा होती की, आपण राज्यसभेवर जायला हवं आणि त्यासाठीच हा निर्णय घेतला असल्याची माहिती मिळाली आहे.
भुजबळ नाशिकला समता परिषदेच्या कार्यकर्त्यांशी करणार चर्चा
तर छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून देण्यात आलेला प्रस्ताव नाकारल्यानंतर पहिल्याच दिवशी अधिवेशनात हजेरी लावून थेट नाशिकला जाणे पसंद केले. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना 'मी नाराज आहे. पुढे काय? ज्यांनी मला डावललं त्यांना तुम्ही प्रश्न विचारायला हवेत, असे त्यांनी म्हटले. तर उद्यापासून छगन भुजबळ समता परिषदेच्या कार्यकर्त्यांना भेटणार असून आगामी काळात आपण काय भूमिका घ्यायला हवी याबाबत चर्चा करणार आहेत. त्यामुळे आता छगन भुजबळ काय निर्णय घेणार? हे येत्या काळात स्पष्ट होणार आहे.
राष्ट्रवादीत राहणार की वेगळा निर्णय घेणार?
एकंदरीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नाराज छगन भुजबळ यांच्याबाबत जे घडलं ते भुजबळ ओबीसी असल्यामुळे घडत असल्याची टीका विरोधकांनी केलीय. भुजबळांनी देखील मंत्रिपद नाकारल्यामुळे स्वतःच्या पक्षा विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यामुळे भुजबळ आता आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात राहणार की वेगळा पर्याय निवडणार हे आगामी 2 ते 3 दिवसांत स्पष्ट होणार आहे. भुजबळ नेमका काय निर्णय घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
आणखी वाचा