Chhagan Bhujbal : गणराया, महायुतीच्या नेत्यांना बुद्धी द्या, जेणेकरून ते चुकीचं वक्तव्य करणार नाही, भुजबळांचं बाप्पाला साकडं
Chhagan Bhujbal : महायुतीच्या नेत्यांना बुद्धी द्या, जेणेकरून ते चुकीचं वक्तव्य करणार नाही, असं साकडं मंत्री छगन भुजबळ यांनी गणपती बाप्पाला घातलं आहे.
मुंबई : महायुतीच्या नेत्यांना बुद्धी द्या, जेणेकरून ते चुकीचं वक्तव्य करणार नाही, असं साकडं राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी गणपती बाप्पाला (Ganpati Bappa) घातलं आहे. शनिवारी देशभरात लाडक्या बाप्पाचं (Ganeshotsav 2024) मोठ्या उत्साहात आगमन झालं. गणरायाला प्रत्येक जण आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी साकडं घालतं असतो. त्यातच आता मंत्री छगन भुजबळ यांनी गणरायाला साकडं घालत एकप्रकारे महायुतीच्या (Mahayuti) नेत्यांना टोलाच लगावला आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असाच सामना रंगणार असल्याचे चित्र आहे. त्यातच महायुतीत गेल्या काही दिवसांपासून आरोपांच्या फैरी सुरु झाल्या आहेत. यावरून मंत्री छगन भुजबळ यांनी महायुतीच्या सुनावले आहे.
महायुतीच्या नेत्यांना बुद्धी द्या
छगन भुजबळ म्हणाले की, परमेश्वराने आमच्या महायुतीच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना बुद्धी द्यावी. जेणेकरून ते चुकीचं वक्तव्य करणार नाही. आपण सगळे एक आहोत आणि सगळे मिळून विधानसभा निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. कुठल्याही प्रकारचा वाद निर्माण होईल असे नेत्यांनी वागू नये. आपल्यात भेदभाव असल्याचं चित्र जनतेसमोर आणू नये, असे त्यांनी म्हटले आहे.
नेत्यांच्या बेताल वक्तव्यांमुळे महायुतीमध्ये मतभेद निर्माण होताय
शिवसेना शिंदे गट राज्यात 120 जागा लढवेल, असे वक्तव्य आमदार संजय गायकवाड यांनी केले. यावरून छगन भुजबळांनी संजय गायकवाडांना टोला लगावला आहे. ते म्हणाले की, भाजप असो किंवा शिंदे गट किंवा अजितदादा गट असो महायुतीत सर्वांना न्याय मिळेल. दिल्लीतील नेत्यांनी सुद्धा सर्वांना आश्वासन दिले आहे. कोणावर अन्याय होणार नाही, असे दिल्लीच्या नेत्यांनी स्पष्ट केले आहे. आता जे बाकीचे कार्यकर्ते, आमदार आपापल्या पद्धतीने काहीही बोलत असतील तर यावर माझे काही म्हणणे नाही. नेत्यांच्या बेताल वक्तव्यांमुळे महायुतीमध्ये मतभेद निर्माण होत आहेत. महायुती बरोबरच बेताल वक्तव्य करणाऱ्या नेत्यांमुळे त्यांचे पक्षही अडचणीत येत असल्याची तिन्ही घटक पक्षाची भावना आहे, असे त्यांनी म्हटले.
इतर महत्त्वाच्या बातम्या
जरांगेंवर आरोप करणं थांबवा, यापुढे विजयाचा गुलाल उधळू देणार नाही, मराठा आंदोलकाने भुजबळांना सुनावले