चंद्रकांत पाटलांना 'ते' वक्तव्य टाळता आलं असतं, अमित शाह यांच्या भेटीनंतर आशिष शेलार यांची प्रतिक्रिया
Chandrakant Patil Controversy : चंद्रकांत पाटील यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यावरुन ठाकरे गट तर आक्रमक झालाच, पण आता स्वकीयांकडूनही त्यांच्यावर टीका होत आहे.
Chandrakant Patil Controversy : भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) चांगलेच नाराज असल्याचं कळतं. दोन दिवसांपूर्वी चंद्रकांत पाटील यांनी बाबरी मशिदी विद्ध्वंसावरुन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यावरुन ठाकरे गट तर आक्रमक झालाच, पण आता स्वकीयांकडूनही चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका होत आहे. पाटील यांना हे वक्तव्य टाळता आलं असतं, असं खुद्द आशिष शेलार (Ashish Shelar) म्हणाले आहेत. विशेष म्हणजे अमित शाहांची भेट घेतल्यावर शेलार यांनी ही प्रतिक्रिया दिली. त्यामुळे येत्या काही दिवसांत पक्षामध्येही चंद्रकांत पाटील यांच्या अडचणी वाढणार असंच दिसत आहे.
चंद्रकांत पाटलांना हे वक्तव्य टाळता आलं असतं : आशिष शेलार
याबाबत आशिष शेलार म्हणाले की, "चंद्रकांत पाटील यांचं हे वैयक्तिक मत आहे. त्यांना हे वक्तव्य टाळता आलं असतं. संपूर्ण रामजन्मभूमी अभियान, बाबरी ढांचा पाडणं ही कारसेवक हिंदू समाजाची उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती. भाजपने याचं श्रेय घेतलं नाही आणि भविष्यातही कधी घेणार नाही. सकल हिंदू समाज एकत्र राहावा, 500 वर्षांपासूनची मागणी होती, आमच्या साधू संतांनी हे आंदोलन सुरु केलं होतं. त्यात संपूर्ण समाज जोडण्यासाठी समाजातील सर्व जण एकत्रित आले होते. त्यात महत्त्वाची भूमिका बाळासाहेब ठाकरे यांनी बजावली होती, त्याचा निश्चित फायदा झाला होता. बाळासाहेबांच्या या भूमिकेचा आम्ही सन्मान करतो. पण हा प्रश्न उपस्थित करणाऱ्या उद्धव ठाकरे यांना आमचा प्रश्न आहे की, तुमचं या अभियानात काय योगदान होतं?
चंद्रकांत पाटील काय म्हणाले होते?
बाबरी मशीद पाडण्यात एकाही शिवसैनिकाचा हात नव्हता, असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी एका टीव्ही मुलाखतीत केलं होतं. 6 डिसेंबर 1992 रोजी अयोध्येतील बाबरी मशीद बजरंग दल, विश्व हिंदू परिषद आणि दुर्गा वाहिनीने पाडली तेव्हा शिवसेनेचा एकही कार्यकर्ता घटनास्थळी उपस्थित नव्हता. "मला अयोध्येतील कारसेवकांच्या सोयीसाठी बजरंग दलाने तीन-चार महिने तिथे ठेवले होते. यात सहभाग घेतलेले लोक बजरंग दल, विहिंप (विश्व हिंदू परिषद) किंवा दुर्गा वाहिनीचे होते," असं चंद्रकांत पाटील म्हणाले होते.
बाबरी पाडली तेव्हा सगळे उंदीर बिळात लपले होते : उद्धव ठाकरे
चंद्रकांत पाटलांच्या या वक्तव्याचा उद्धव ठाकरे यांनी समाचार घेतला. "बाबरी पाडली तेव्हा सगळे उंदीर बिळात लपलेले होते. बाबरी पाडण्यात शिवसैनिकांचा संबंध नव्हता असं म्हणणाऱ्या भाजपच्या चंद्रकांत पाटील यांची हकालपट्टी करा. तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामा द्यावा", अशी मागणी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. लाळघोट्या मिंध्यांनी चंद्रकांत पाटलांची हकालपट्टी करावी, स्वत:ही राजीनामा द्यावा, असं उद्धव ठाकरे म्हणाले. "भाजपकडे कोणतंही शौर्य नव्हतं. ज्याच्याकडे शौर्य नसतं ते चौर्य करतात. बाबरी पाडली त्यावेळी दंगली झाल्या. त्यावेळी आमची सत्ता नव्हती तरीही आम्ही मुंबई वाचवली. मला भाजपची किव येतेय. मोहन भागवत मशिदीत जात आहेत आता हे सगळे कव्वाली करायला जात आहेत. यांचं हिदुत्व कुठे जातंय हे कळत नाही," अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी हल्लाबोल केला.
संजय राऊत यांचं टीकास्त्र
चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्यानंतर संजय राऊत यांनी त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. "एवढे दिवस पळपुटे चंद्रकांत पाटील कुठे होते?" असा थेट सवालही राऊतांनी केला आहे. "चंद्रकांत पाटलांनी थेट बाळासाहेबांचा अपमान केलाय त्यामुळे आता भाजपसोबत मांडीला मांडी लावून बसलेल्या त्या 40 लोकांचे काय म्हणणं आहे? बाळासाहेबांचा अपमान करण्याची हिंमत आत्तापर्यंत कधी कुणी दाखवली नव्हती, तुम्ही गुलाम झाल्यामुळे किंवा भाजपने शिवसेना फोडल्यामुळे भाजपचे लोक सातत्याने बाळासाहेबांचा अपमान करत आहेत. हिंमत असेल तर मुख्यमंत्र्यांनी यावर प्रतिक्रिया द्यावी," असं राऊत म्हणाले.