Maratha Reservation: मराठा-ओबीसी वाद भाजपनेच लावला, जरांगे मराठ्यांसाठी लढले तर पोटात का दुखतं? ठाकरेंचा नेता कडाडला
Maharashtra Politics: ओबीसी नेत्यांनी आजपर्यंत स्वत:च्या समाजासाठी अनेक लढे दिले, मग मनोज जरांगे मराठा समाजासाठी लढत असतील तर काय चुकलं? ठाकरेंच्या नेत्याचा सवाल.
परभणी: मनोज जरांगे यांना मराठा आरक्षणासाठी रस्त्यावर उतरण्याचा अधिकार आहे. राज्यात मराठा ओबीसी वाद हा भाजप अन त्यांच्या नेतृत्वानेच लावला, असे वक्तव्य ठाकरे गटाचे नेते आणि परभणी लोकसभेचे उमेदवार संजय उर्फ बंडू जाधव (Sanjay Jadhav) यांनी केले. तसेच बीडमध्ये घडलेली घटना पुन्हा घडू नये, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
यावेळी संजय जाधव यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेचे जोरदार समर्थन केले. आजपर्यंत ओबीसींसाठी छगन भुजबळ,महादेव जानकर,प्रकाश शेंडगे,गोपीचंद पडळकर यांच्यासह अनेकांनी लढा दिला. सगळ्या समाजांनी रस्त्यावर उतरुन, सरकारवर दबाव आणून काही मागण्या मान्य करुन घेतल्या. त्यामध्ये मराठा समाजाच्या पुढाऱ्यांनी तसाच प्रयत्न केला तर पोटात दुखायचं कारण काय? प्रत्येकाला स्वत:च्या समाजासाठी गोष्टी मागण्याचा नैतिक अधिकार आहे. या गोष्टी मिळवण्यासाठी मराठा रस्त्यावर उतरला तर तो दोषी आहे का? मराठ्यांनी ओबीसीतून किंवा सगेसोयऱ्याचे आरक्षण मागणे चुकीचे आहे का? असा सवाल शिवसेनेचे उपनेते तथा परभणीतील उमेदवार संजय जाधव यांनी भाजपसह महायुतीच्या नेत्यांना विचारला.
यावेळी बंडु जाधव यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालाबाबतही भाष्य केले.लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे हेच मॅन ऑफ द सिरीज राहतील. महाविकास आघाडीच्या महाराष्ट्रात 35 जागा निवडून येतील, असा दावा बंडू जाधव यांनी केला.
शरद पवारांनी कधीच मराठ्यांना पाठिंबा दिला नाही, मनोज जरांगेंचं आंदोलन भरकटलंय; मराठा समन्वयकाची टीका
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी सुरु केलेलं आंदोलन सुरुवातीच्या काळात गरजवंत मराठ्यांसाठी होते. मात्र, नंतरच्या काळात हे आंदोलन भरकटत गेले. त्यांच्या मागण्या बदलत गेल्या. आता मनोज जरांगे यांचे आंदोलन हे राजकीय हेतूने प्रेरित आहे. मराठा आरक्षण आंदोलन हे जरांगेंच्या हातातून गेले आहे, अशी टीका मराठा समन्वयक दिलीप पाटील यांनी केली. ते बुधवारी कोल्हापूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
यावेळी दिलीप पाटील यांनी बीडमधील मराठा आणि वंजारी समाजातील वादावर भाष्य केले. दोन समाजांनी एकमेकांवर बहिष्कार टाकणे, हे घातक आणि धोकादायक आहे. बहिष्काराचे पहिलं आंदोलन चुकीच होतं, त्याला प्रतिक्रिया म्हणून ओबीसी समाजाकडून बहिष्काराची भाषा आली. ही बहिष्काराची दोन्ही आंदोलन चुकीची आहेत. शरद पवार यांनी मराठ्यांना कधीही पाठींबा दिला नाही. त्यांनी मराठा समाजाच आरक्षण त्यांनी घालवलं, सारथीला त्यांनी कधीही मदत केली नाही. दोन समाजात अशा घटना घडत असताना शरद पवार यात राजकारण करत आहेत.
वास्तविक त्यांनी ज्येष्ठ नेता म्हणून त्यांनी समन्वय साधण्याची गरज होती. जरांगे यांचा आंदोलनानंतर फक्त ३४ हजार कुणबी दाखले मिळाले आहेत. मनोज जरांगे पाटील आणि राज्य सरकारकडून कुणबी दाखल्यांच्या आकडेवारी बाबत दिशाभूल केली जात आहे. 34 हजार पेक्षा जास्त दाखले दिले गेले असतील तर आम्ही समाजकारण सोडू. सोयीस्कररित्या कोणालातरी पाठिंबा देणे आणि सोयीस्करपणे कोणालातरी विरोध करण्यासाठी जरांगे पाटलांचा आंदोलन सुरू झाले आहे, अशी टीका दिलीप पाटील यांनी केली.
आणखी वाचा
मराठ्यांनी जातीयवाद कधीच केलेला नाही, तुमच्यावरचा अन्याय बंद करायचा असेल तर... : मनोज जरांगे