BJP Plan : लीड द्या आणि पुन्हा आमदारकी मिळवा, जो लीड देणार नाही त्याचं तिकीट धोक्यात; भाजपचे नवे धोरण
Lok Sabha Election : भाजपच्या या नव्या धोरणामुळे पक्षाने दिलेल्या लोकसभा उमेदवाराबाबत आमदारांचे कितीही मतभेद असेल तरी स्वतःच्या विधानसभेच्या उमेदवारीसाठी तरी त्यांना काम करावे लागणार आहे.
मुंबई: लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) महायुतीने विशेषत: भाजपने 'मिशन 45 प्लस' (BJP Mission 45 Plus) अत्यंत गांभीर्याने घेतल्याचं दिसतंय. त्यासाठी भाजपने आपल्या आमदारांना विशेष टार्गेट दिलंय. जो आमदार हे टार्गेट पूर्ण करणार नाही त्या आमदारांचे तिकीट धोक्यात येऊ शकतं. जो आमदार लोकसभेच्या उमेदवाराला लीड देईल त्याला पुन्हा तिकीट देण्यात येईल, आणि ज्याच्या मतदारसंघात लीड कमी मिळेल त्याचं आमदारकीचं तिकीट धोक्यात येणार आहे. त्यामुळे लोकसभेच्या उमेदवाराशी मतभेद असले तरीही स्वतःच्या विधानसभेसाठी आमदारांना काम करावं लागणार आहे.
राज्यातील पहिल्या टप्प्यातील मतदानाला अवघे काही तास उरलेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राज्यात प्रचारसभा देखील सुरु झाल्यात. राज्यात मिशन 45 पूर्ण करण्यासाठी एकीकडे हे दिग्गज नेते कामाला लागले असताना दुसरीकडे भाजपने आपल्या आमदारांना देखील त्यांच्या त्यांच्या मतदारसंघातून लीड देणं बंधनकारक केलं आहे.
प्रत्येक आमदाराचं रिपोर्ट कार्ड तयार होणार
सगळ्यात महत्वाचे म्हणजे भाजप नेत्यांनी विधानसभा आमदारांना नुसतं टार्गेटच दिलं नाही तर त्यानुसार प्रत्येकाचं रिपोर्ट कार्डच तयार केलं जाणार आहे. त्यांच्या मताधिक्याचा उमेदवाराला कसा फायदा झाला, याचं मूल्यमापन यावेळी केले जाणार आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी विधानसभा आमदार आणि इच्छुक उमेदवारांना तशा सूचना दिल्या आहेत. त्यामुळे पुन्हा आमदारकीचं स्वप्न पाहायचं असेल, तर आतापासूनच जोमाने कामाला सुरुवात करावी लागणार आहे.
आमदारकी हवी असेल तर परफॉर्मन्स दाखवा
ज्याची कामगिरी चांगली त्याला तिकीट असं धोरण मागील काही निवडणुकामध्ये भाजपने राबविलेल्याचं दिसतंय. या लोकसभा निवडणुकीत देखील सुमार कामगिरी असणाऱ्या काही खासदारांचा पत्ता कट करण्यात आलाय. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा तिकीट मिळवायचे असेल तर लोकसभेत आपला परफॉर्मन्स आमदारांना दाखवावाच लागेल. त्यामुळे पक्षाने दिलेल्या लोकसभा उमेदवाराबाबत आमदारांचे कितीही मतभेद असेल तरी स्वतःच्या विधानसभेच्या उमेदवारीसाठी तरी आमदारांना काम करावे लागणार हे मात्र नक्की.
भाजपचे मिशन 45 प्लस
राज्यातील 48 पैकी 40 हून अधिक जागा जिंकण्याचं धोरण भाजपने आखलं असून त्या दृष्टीने सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी भाजपने सुरूवातीला एकनाथ शिंदे आणि नंतर राष्ट्रवादीच्या अजित पवारांना सोबत घेतलं. आता राज ठाकरे यांनाही सोबत घेण्यात आलं आहे.
ही बातमी वाचा: