Baramati Loksabha: अजित पवारांचा पेशन्स गेम! विजय शिवतारे-शरद पवारांनी पत्ते उघड केल्यानंतरच सुनेत्रा पवारांचं नाव जाहीर केलं
Maharashtra Politics: विजय शिवतारे आणि शरद पवारांनी पत्ते उघड केल्यानंतरच अजितदादांनी चाल खेळली, बारामतीचा उमेदवार जाहीर. अजित पवारांचा पेशन्स गेम, सगळं चित्र स्पष्ट झाल्यानंतरच सुनेत्रा पवारांचं नाव जाहीर केलं.
मुंबई: विजय शिवतारे यांना वैयक्तिक स्तरावर अजित पवार यांच्याविषयी काय वाटते, हा त्यांचा प्रश्न आहे. विजय शिवतारे यांनी त्यांच्या ज्या भावना व्यक्त केल्या आहेत, त्या त्यांच्यासाठी आहेत. आम्हाला त्यामध्ये वावगं वाटण्याचं काही कारण नाही. पण विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी महायुतीच्या उमेदवाराला समर्थन देण्याचा निर्णय घेतला आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातून सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) या महायुतीच्या उमेदवार आहेत. त्यामुळे विजय शिवतारे यांचे सुनेत्रा पवार यांना समर्थन आहे, हे स्पष्ट होते. त्यामुळे बाकीच्या गोष्टी आमच्यासाठी गौण आहेत, असे वक्तव्य अजितदादा गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी व्यक्त केले. ते शनिवारी मुंबईतील पत्रकार परिषदेत बोलत होते.
या पत्रकार परिषदेत सुनील तटकरे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार म्हणून सुनेत्रा पवार यांच्या नावाची घोषणा केली. बारामती लोकसभा मतदारसंघात शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी अजित पवारांविरोधात टोकाची भूमिका घेतली होती. त्यामुळे सुनेत्रा पवार यांच्याबाबत लोकसभा निवडणुकीत दगाफटका होण्याची शक्यता होती. त्यामुळे इतके दिवस अजितदादा गटाकडून सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली नव्हती. परंतु, शनिवारी सकाळीच विजय शिवतारे यांनी अजित पवार यांच्याविरोधात बंडाची तलवार म्यान केली. नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी आणि एकनाथ शिंदे यांना कोणतीही अडचण होऊ नये, यासाठी आपण बारामती लोकसभा मतदारसंघातून माघार घेत असल्याचे विजय शिवतारे यांनी जाहीर केले होते.
विजय शिवतारे यांच्या या घोषणेनंतर काहीवेळातच शरद पवार गटाकडून आपल्या लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये बारामतीमधून सुप्रिया सुळे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. विजय शिवतारे आणि शरद पवार या दोघांनी आपले पत्ते उघड केल्यानंतर अजित पवार गटाकडून तातडीने पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी सुनील तटकरे यांनी बारामतीमधून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी जाहीर केली. हा सगळा घटनाक्रम पाहता अजित पवार यांनी बारामतीमधून सुनेत्रा पवारांच्या नावाची घोषणा करण्यापूर्वी विजय शिवतारे आणि शरद पवार हे दोघे काय करणार, याची वाट पाहिली. सुनेत्रा पवार याच राष्ट्रवादी काँग्रेसच्या बारातमीच्या उमेदवार असणार, ही काळ्या दगडावरची रेघ असतानाही अजित पवार यांनी शेवटपर्यंत संयम ठेवला. त्यानंतर प्रतिस्पर्ध्यांनी आपापली चाल खेळल्याची खात्री झाल्यानंतरच अजित पवार यांनी आपला डाव टाकला आहे. दरम्यान, अजितदादा गटाकडून परभणीची जागा रासपच्या महादेव जानकर यांच्यासाठी सोडण्यात आल्याचीही घोषणा करण्यात आली आहे. तर रायगडमधून सुनील तटकरे आणि शिरुरमधून शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या नावाची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसने यापूर्वीच केली आहे.
आणखी वाचा
आधी म्हणाले अजितदादा उर्मट, आता मात्र नरमले; बारामतीतून माघार घेतल्यानंतर विजय शिवतारेंची अडचण!