Baramati Loksabha: भाजपच्या 'सगळंच आम्ही केलं' प्रचाराला शरद पवारांचं उत्तर; फडणवीसांच्या मोदी फॅक्टरने लढाईचं मैदानच बदललं, बारामतीत दोन चाणक्यांची चढाओढ
Maharashtra Politics: शरद पवारांनी भाजपच्या 'सगळं आम्हीच केलं' प्रचाराला काऊंटर केलं, फडणवीसांनी थेट नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी नरेटिव्ह मांडलं, बारामतीत दोन चाणक्यांनी डाव टाकले. यंदाच्या लोकसभेत काय घडणार?
Sharad Pawar Vs Devendra Fadnavis: यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील सर्वात प्रतिष्ठेची लढाई म्हणून पाहिल्या जाणाऱ्या बारामती मतदारसंघातील प्रचाराची हवा आता चांगलीच तापली आहे. बारामतीच्या रिंगणात मविआच्या सुप्रिया सुळे विरुद्ध महायुतीच्या सुनेत्रा पवार उमेदवार असल्या तरी खरी लढाई ही राज्यातील दोन राजकीय चाणक्यांमध्ये होणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी बारामतीमधून अजित पवार यांच्या पत्नीला उमेदवारी देऊन शरद पवार गटासमोर मोठे आव्हान निर्माण केल्याची चर्चा आहे. यापूर्वी 2019 च्या विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार (Sharad Pawar) या दोन नेतृत्त्वांमध्ये लढाई झाली होती. त्यावेळी शरद पवारांनी फडणवीसांना धोबीपछाड दिला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा बारामतीच्या निमित्ताने हे दोन चाणक्य आमनेसामने उभे ठाकले आहेत.
शरद पवार यांची सोमवारी बारामती मतदारसंघातील सुपे येथे सभा झाली. यावेळी शरद पवार यांनी भाजपकडून करण्यात येणाऱ विकासाचे दावे कसे फोल आहेत, हे पटवून देण्याचा प्रयत्न केला. तर देवेंद्र फडणवीसांनी पवारांच्या या मुद्द्याला बगल देत बारामतीची निवडणूक थेट राष्ट्रीय पातळीवर नेण्याचा प्रयत्न केला. सुप्रिया सुळेंना मत म्हणजे राहुल गांधींना मत आणि सुनेत्रा पवारांना मत म्हणजे नरेंद्र मोदींना मत, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
बारामतीचा विकास आमच्या काळात झालाय, भाजपच्या काळात नाही? शरद पवारांचा दावा
एकेकाळी पुण्यात फक्त पिंपरी-चिंचवडला कारखाने होते. पण तुम्ही आमच्या हातात सत्ता दिली तेव्हा आम्ही फक्त पिंपरी-चिंचवडपुरता मर्यादित राहिलो नाही. आम्ही जेजुरी, सासवडला कारखाने काढले, बारामतीला एमआयडीसी सुरु केली, इंदापूरला एमआयडीसी काढली, कुरकुंभला एमआयडीसी काढली, रांजणगावला एमआयडीसी सुरु केली आणि पुण्याजवळ हिंजवडी येथे आयटी पार्क उभारले. या माध्यमातून या परिसरातील जवळपास 1 लाख लोकांना रोजगार प्राप्त करुन दिले. हे आताच्या सरकारने केलं नाही, हे आम्हा लोकांच्या हातात सत्ता असताना झालं, त्यामुळे हजारो मुलांना काम मिळालं.
दुष्काळी भागातील मुलं एमआयडीसीत कामाला जायला लागल्याने त्यांच्या घरातील परिस्थिती बदलली. हा बदल आमच्या सरकारने केला, आजच्या सरकारने केला नाही. 56 वर्षांपूर्वी मी पहिल्यांदा महाराष्ट्राच्या विधानसभेत निवडून आलो. त्या काळात काय स्थिती होती, सुप्यात त्यावेळी वेगळी परिस्थिती होती. पण गेल्या काही वर्षांमध्ये सुप्यातील परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. मुली शिकल्याचा परिणाम घरातील राहणीमान सुधारण्यात झाला. हा बदल भाजपवाल्यांनी केला नाही. आज सुप्यामध्ये इंग्रजी माध्यमाची शाळा आहे. ही शाळा कोणी बांधली? विद्या प्रतिष्ठान संस्था कोणी सुरु केली?, असे सवाल शरद पवारांनी विचारले. आणखी काही वर्षांनी सुप्याच्या इंग्रजी शाळेतील मुलं राज्याच्या वेगवेगळ्या कंपनीत काम करतील, हे चित्र पाहायला मिळेल.
बारामतीमध्ये मी 1970 साली विद्या प्रतिष्ठान संस्था सुरु केली. विद्या प्रतिष्ठानने शिक्षणाचं नवं दालन सुरु केलं. आज त्याठिकाणी 35000 मुलं-मुली शिकत आहेत. त्यामुळे खेड्यातील मुलांना शिक्षण मिळत आहेत, असा दावा शरद पवार यांनी केला.
देवेंद्र फडणवीसांकडून मोदी Vs राहुल गांधी नरेटिव्ह
2019 मध्ये उद्धव ठाकरे केवळ मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीसाठी शरद पवार यांच्यासोबत गेले. अडीच वर्षे राज्यात सर्वसामान्य लोकांवर अन्याय करणारे, वसुली करणारे सरकार होते. अजित पवारांचे मत होते की, आपल्याला विकासाकडे जायचं असेल तर मोदींसोबत गेले पाहिजे. मोदींना साथ देण्यासाठी आपल्याला संघटित झालं पाहिजे त्यांना सोबत घेतलं पाहिजे. काही लोकांना वाटत की बारामतीची लढाई ही अजित पवार आणि शरद पवारांची आहे. पण ही लढाई राहुल गांधी आणि नरेंद्र मोदी यांच्यातील आहे. महायुतीचा खासदार निवडून आला तर तो खासदार मोदींसाठी हात वर करेल. मोदींच्या प्रत्येक निर्णयाचा विरोध सुप्रिया सुळे यांनी केला. मोदींच्या मागे चालणारा खासदार पाहिजे का? राहुल गांधी जे मोदींचा विकास डिरेल करणार त्यांच्यामागे जाणार, असा सवाल देवेंद्र फडणवीसांनी विचारला.
आणखी वाचा