Badlapur Encounter : ''संस्थाचालकांवर कारवाई होत नाही, पण आरोपी गोळी झाडून घेतो हे धक्कादायक अन् संशयास्पद''
Badlapur Encounter : अक्षय शिंदे याने गोळी झाडून घेणे म्हणजे पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?, अक्षय शिंदे याने गोळी नेमकी कशी झाडली?,
Badlapur Encounter : मुंबई : बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काऊंटर करण्यात आल्याची घटना घडली आहे. मुंब्रा बायपासवर पोलिसांची गाडी आली असता हा थरार झाला आहे. आरोपी अक्षयने पोलिसांची बंदूक हिसकाऊन घेतल्यानंतर गोळीबार केला, त्यावेळी पोलिसांकडून स्वसंरक्षणासाठी हा गोळीबार करण्यात आल्याचं सांगण्यात येतयं. मात्र, विरोधी पक्षातील नेत्यांकडून पोलिसांच्या या कृत्यावर अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले असून तात्काळ टीमही नेमण्यात आल्याचे समजते. मात्र, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यानंतर, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) यांनीही या घटनेची न्यायिक चौकशी झालीच पाहिजे, अशी मागणी करत अनेक सवाल उपस्थित केले आहेत.
अक्षय शिंदे याने गोळी झाडून घेणे म्हणजे पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?, अक्षय शिंदे याने गोळी नेमकी कशी झाडली?, आरोपी अक्षय पोलिसांच्या ताब्यात असताना त्याचे हात बांधले नव्हते का?, त्याला बंदूक कशी काय त्याला मिळाली? पोलिस इतके बेसावध कसे असू शकतात? असे एका ना अनेक सवाल विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी बदलापूर अत्याचारातील आरोपीच्या एन्काऊंटरनंतर उपस्थित केले आहेत. बदलापूर प्रकरणात एकीकडे संस्थाचालक भाजपशी सबंधित असताना संस्थाचालकांवर कारवाई होत नाही, दुसरीकडे आज आरोपी अक्षय शिंदे स्वतःवर गोळी घालून घेतो हे अतिशय धक्कादायक आणि संशयास्पद आहे, असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय. तसेच, बदलापूर प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेवर आमचा पहिल्यापासून विश्वास नाही. आता या प्रकरणाची न्यायिक चौकशी झालीच पाहिजे, अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी ट्विटवरुन केली आहे.
गृहमंत्र्यांना ताबडतोब काढून टाकलं पाहिजे
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, आज जी गोष्ट झाली त्यावरून राज्यात कायदा सुव्यवस्था राहिली आहे की नाही असा प्रश्न पडतोय. अक्षय शिंदे यांचा एन्काऊंटर झाल्यानंतर या प्रकरणात कोण संस्थाचालक आणि आरोपी होते हे कधीही बाहेर येणार नाही. बदलापूर प्रकरणी राज्यातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. अशा परिस्थितीमध्ये या घटनेची सखोल चौकशी करण्याऐवजी आरोपीला मारून टाकले जाते. गृहमंत्र्यांचा काही वचक आहे की नाही? असा सवाल पृथ्वीराज चव्हाण यांनी विचारला. तसेच, गृहमंत्र्यांना ताबडतोब काढून टाकलं पाहिजे, कधी नव्हे ती महाराष्ट्राची बदनामी होत आहे, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. ते
खऱ्या दोषीला शिक्षा व्हायला हवी होती
बदलापूर प्रकरणात अक्षय शिंदेसोबत अजून कोण आरोपी होतं, या गोष्टीच्या तळापर्यंत जाणं गरजेचं होतं. सत्य बाहेर येऊन खऱ्या दोषीला शिक्षा व्हायला हवी होती. आता त्याचा एन्काऊंटर झाल्यामुळे हे कधीही समोर येणार नाही. आरोपीला मारण्यामध्ये कुणाचा इंटरेस्ट आहे हे तपासलं पाहिजे.
हेही वाचा
बदलापूर आरोपीचा एन्काऊंटर, उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; सांगितलं पुढं काय