Congress President Election: गेहलोत यांची 'एक्झिट', दिग्विजय सिंह आणि शशी थरूर यांच्याशिवाय कोण-कोण शर्यतीत, जाणून घ्या
Congress President Election: शुक्रवारी म्हणजेच 30 सप्टेंबर रोजी काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. अध्यक्षपदाच्या या निवडणुकीतून राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत हे बाहेर पडले आहेत.
Congress President Election: शुक्रवारी म्हणजेच 30 सप्टेंबर रोजी काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. अध्यक्षपदाच्या या निवडणुकीतून राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत हे बाहेर पडले आहेत. आता या शर्यतीत दोन नावे समोर आहेत, ज्यात शशी थरूर आणि दिग्विजय सिंह यांच्या समावेश आहे. दिग्विजय सिंह यांनी ही निवडणूक लढवण्यासाठी अर्ज घेतला आहे. ते उद्या आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
तत्पूर्वी थरूर यांनीही 30 सप्टेंबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची घोषणा केली आहे. अशातच आता या दोघांशिवाय या शर्यतीत कोण सामील होणार, हा प्रश्न अनेकांना पडला आहे. अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची उद्या शेवटची तारीख आहे. काँग्रेसच्या या निवडणुकीत पवन बन्सल यांचेही नाव चर्चेत आहे. त्यांनी उमेदवारी अर्जही घेतल्याचे वृत्त आहे. पवन बन्सल हे यूपीए सरकारच्या काळात रेल्वेमंत्री होते. याबाबत बोलताना काँग्रेसचे माजी नेते कुलदीप विश्नोई म्हणतात की, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या निर्णयांनी काँग्रेसची दुर्दशा झाली आहे. आता अध्यक्ष कोणीही असो, तरीही तेच लोक निर्णय घेतील.
काँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीत कोणाचा आहे समावेश ?
शशी थरूर आणि दिग्विजय सिंह हे दोघे ही निवडणूक लढवणार असल्याचं निश्चित आहे. याशिवाय केसी वेणुगोपाल, मनीष तिवारी, मल्लिकार्जुन खरगे आणि मुकुल वासनिक हे देखील ही निवडणूक लढू शकतात, अशी चर्चा आहे. मात्र याबाबत अद्याप अधिकृत अशी कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
यातच काँग्रेस नेते वेणुगोपाल म्हणाले की, काँग्रेस अध्यक्षपदासाठी किती जण उमेदवारी अर्ज भरणार, हे लवकरच कळेल. सोनिया गांधी या कोणाच्याही बाजूने नाहीत, त्या तटस्थ आहेत. काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी सोनिया गांधी पूर्णपणे निष्पक्ष आहेत. उद्या सायंकाळपर्यंत याबाबत आणखी चित्र स्पष्ट होईल. राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांबाबत जे काही प्रश्न आहेत, तेही एक-दोन दिवसांत स्पष्ट होतील. दरम्यन, 24 तारखेपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून ती 30 सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख 8 ऑक्टोबर आहे. एकापेक्षा जास्त उमेदवार असल्यास 17 ऑक्टोबरला मतदान होईल आणि 19 ऑक्टोबरला निकाल जाहीर केला जाणार असल्याची माहिती काँग्रेस पक्षाकडून देण्यात आली आहे.