Amit Shah: मराठवाडा-विदर्भासाठी अमित शाहांचं मायक्रो प्लॅनिंग; भाजपच्या कार्यकर्त्यांना म्हणाले, आपल्याला शरद पवारांना रोखायचंय
Amit Shah in Maharashtra: अमित शाह हे महाराष्ट्र दौऱ्यावर असून ते विधानसभा निवडणुकीच्यादृष्टीने मायक्रो प्लॅनिंग करत आहेत. लोकसभा निवडणुकीत आपली कामगिरी चांगली झाली नाही, अमित शाहांची कबुली
नागपूर: लोकसभा निवडणुकीत दणका बसल्यानंतर आता भाजपने विधानसभा निवडणुकीसाठी चांगलीच कंबर कसली आहे. त्यासाठी भाजपचे केंद्रीय मंत्री अमित शाह हे सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. अमित शाह (Amit Shah) यांनी बुधवारी नागपूर आणि छत्रपती संभाजीनगरमधील भाजप नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले होते. यावेळी अमित शाह यांनी विधानसभा निवडणुकीत आपले प्रमुख उद्दिष्ट हे शरद पवार (Sharad Pawar) आणि उद्धव ठाकरे यांना रोखणे, हेच असेल असे सांगितले.
अमित शाह यांनी भाजपच्या स्थानिक नेत्यांना जमिनीवर उतरुन काम करण्याचा आदेश दिला. केवळ कार्यकर्त्यांवर विसंबून राहू नका. आपल्याला प्रत्येक बुथवर 10 टक्के मतदान वाढवायचे आहे. त्यादृष्टीने प्रयत्न करा, असे अमित शाह यांनी सांगितले. उद्धव ठाकरे यांनी आपल्याला दगा दिला आहे. त्यामुळे आपल्याला त्यांनाही रोखायचे आहे. तर विधानसभा निवडणुकीत चांगले यश मिळवण्यासाठी विदर्भात काँग्रेसला पराभूत करण्याची आवश्यकता आहे, असे अमित शाह यांनी म्हटले.
यावेळी अमित शाह यांनी बैठकीत उपस्थित असलेले भाजप नेते आणि कार्यकर्त्यांकडून राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. स्थानिक पातळीवर कितपत नाराजी आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न त्यांनी केला. तसेच महाराष्ट्रात भाजप सर्वात मोठा पक्ष बनू शकतो का, असा प्रश्नही अमित शाह यांनी उपस्थित भाजप नेत्यांना विचारला. आपण मित्रपक्षांना सर्वात चांगली वागणूक देतो. लोकसभा निवडणुकीत आपली कामगिरी चांगली झाली नाही. पण कार्यकर्त्यांनी निराश होण्याची गरज नाही. भाजपने लोकसभा निवडणुकीत लढवलेल्या एकूण जागांपैकी 50 टक्क्यांपेक्षा जास्त सीट जिंकल्या आहेत. विधानसभा निवडणुकीत भाजपची विदर्भातील कामगिरी महत्त्वाची आहे. विदर्भात चांगले यश मिळते तेव्हा भाजपची सत्ता येते. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या काळात महाराष्ट्रात समन्वयावर भर द्या, असे अमित शाह यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना सांगितले. अमित शाह यांनी विधासनभा निवडणुकीत विदर्भात 45 आणि मराठवाड्यात 30 जागा जिंकण्याचे टार्गेट भाजपच्या कार्यकर्त्यांना दिले आहे.
अमित शाह आज नाशिक आणि कोल्हापुरात भाजप नेत्यांना भेटणार
अमित शाह यांच्या महाराष्ट्र दौऱ्याचा आज दुसरा दिवस असून ते बुधवारी नाशिक आणि कोल्हापूरमधील भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. तत्पूर्वी आज सकाळी छत्रपती संभाजीनगरमध्ये अमित शाह यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चा केली. या दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा झाल्याचे सांगितले जाते. आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अमित शाह महाराष्ट्रातील परिस्थितीचा आढावा घेत असल्याची सूत्रांची माहिती आहे.
आणखी वाचा
अमित शाह नागपुरात, नितीन गडकरी काश्मिरात; राज्यातील राजकारणापासून गडकरींना कोण दूर ठेवतंय?