Nitin Gadkari : अमित शाह नागपुरात, नितीन गडकरी काश्मिरात; राज्यातील राजकारणापासून गडकरींना कोण दूर ठेवतंय?
Amit Shah Nagpur Visit : लोकसभेच्या निकालानंतर भाजपची पिछेहाट झाल्यानंतर नितीन गडकरींनी राज्याच्या राजकारणात सक्रिय भूमिका बजावावी असा एक मतप्रवाह भाजपमध्ये आहे.
नागपूर : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत नागपूरमध्ये आज भाजपची कार्यकर्ता संवाद बैठक पार पडतेय. पण राज्याच्या निवडणूक प्रचाराची धुरा हाती असलेले नितीन गडकरी मात्र या बैठकीला उपस्थित नसणार आहेत. ते जम्मू काश्मीरमधल्या प्रचारात व्यस्त आहेत. शाह यांच्या बैठकीला स्थानिक भाजप खासदार आणि भाजपचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. पण या महत्त्वाच्या बैठकीला गडकरी उपस्थित नसल्यानं चर्चांना उधाण आलंय. गडकरी महाराष्ट्रातल्या प्रचारापासून स्वत:हून दूर झालेत की त्यांना दूर ठेवलं जातंय, असा प्रश्न उपस्थित केला जातोय.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या प्रमुख उपस्थितीत नागपुरात भाजपची कार्यकर्ता संवाद बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष बावनकुळे, प्रभारी भुपेंद्र यादव यांच्यासह भाजपचे विदर्भातील सर्वच प्रमुख नेते उपस्थित राहिले. पण नितीन गडकरी मात्र या बैठकीला उपस्थित नव्हते. जम्मू-काश्मीर मधील निवडणूक प्रचाराचा नियोजित दौरा असल्याने नितीन गडकरी उपस्थित राहू शकले नाहीत असं सांगण्यात येतंय.
स्थानिक भाजप खासदार आणि भाजपचे प्रमुख नेते असूनही नितीन गडकरी कार्यकर्ता संवाद बैठकीला उपस्थित राहणार नसल्याने नितीन गडकरी यांच्या कडे महाराष्ट्राच्या निवडणुकीची किती धुरा हातात राहतील याबद्दल प्रश्नचिन्ह कायम आहे.
लोकसभा निवडणुकीमध्ये बसलेल्या धक्क्यानंतर नितीन गडकरींना राज्यात अधिक सक्रिय करावं असा एक मतप्रवाह भाजपमध्ये होता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही ते हवे आहेत. पण 2014 पासून नितीन गडकरी हे निवडणुकीच्या राजकारणापासून दूर असायचे. आता ते परत सक्रिय होणार असं चित्र असतानाही त्यांची प्रचारात उपस्थिती दिसत नाही
नितीन गडकरी जम्मूला स्वतःहून जाणार नाहीत, ते पक्षाचे नियोजन असणार आहे. त्यामुळेच नितीन गडकरी नागपुरात नसतानाची तारीख अमित शाहांनी निवडली का हे पाहावं लागेल. तसेच नितीन गडकरींना राज्यातील प्रचारापासून दूर ठेवण्यात येतंय का हेदेखील पाहावं लागेल.