Ambadas Danve: अंबादास दानवेंचा कॅश बॉम्ब, शिंदे गटाच्या आमदाराचा नोटांची जाडजुड बंडलं मोजतानाचा व्हिडीओ, हिवाळी अधिवेशनात वातावरण तापणार
Ambadas Danve: ऐन हिवाळी अधिवेशनाच्या काळातच शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी एक व्हिडिओ बॉम्ब फोडला आहे.

Ambadas Danve: ऐन हिवाळी अधिवेशनाच्या (Maharashtra Winter Session 2025) काळातच शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी एक व्हिडिओ बॉम्ब फोडला आहे. पैशांच्या गड्ड्यांसह आमदार काय करत आहेत? असा सवाल त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना विचारला आहे. तर या व्हिडिओतील आमदार नेमका कोण? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे. या व्हिडीओमध्ये शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी दिसून येत आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
अंबादास दानवे यांनी एक्सवर व्हिडीओ पोस्ट करत म्हटले आहे की, या सरकारकडे फक्त शेतकरी कर्जमाफीला पैसा नाही. बाकी सगळं ओक्के आहे! जनतेला जरा सांगा मुख्यमंत्री फडणवीस आणि शिंदे जी, हे आमदार कोण आहेत आणि पैशांच्या गड्ड्यांसह काय करत आहेत? असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय.
या सरकारकडे फक्त शेतकरी कर्जमाफीला पैसा नाही.. बाकी सगळं ओक्के आहे!
— Ambadas Danve (@iambadasdanve) December 9, 2025
जनतेला जरा सांगा मुख्यमंत्री फडणवीस आणि शिंदे जी, हे आमदार कोण आहेत आणि पैशांच्या गड्ड्यांसह काय करत आहेत?@mieknathshinde @Dev_Fadnavis @AmitShah @BJP4Maharashtra #Moneypower #ruins #Maharashtra pic.twitter.com/WUDpmedTgo
Ambadas Danve: मी तक्रार करणार : अंबादास दानवे
याबाबत अंबादास दानवे यांच्याशी एबीपी माझाने संवाद साधला असता ते म्हणाले की, सत्ताधारी पक्षातील काही आमदार त्यात दिसत आहेत. मोठ्या नोटांच्या गड्या त्यात दिसून येत आहेत. कोणाच्या आहेत, काय आहेत हे तपासले पाहिजे. मी याबाबत तक्रार करणार आहे. मी यात कोणाचं नाव घेत नाही पण पोलिसांनी हे शोधले पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे.
Bharat Gogawale: भरत गोगावलेंची प्रतिक्रिया
याबाबत शिवसेना शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले म्हणाले की, त्यात आमदार कोण आहे आणि किती बंडलं आहेत, हे आम्ही आतापर्यंत पाहिलेले नाही. अंबादास यांच्याकडे काही शोध मोहीम आहे का? आम्ही सत्ताधारी आहोत. तीन पक्षांमधील कोण आमदार आहे? काय आहे? हे कसले पैसे आहेत? हे तरी कळायला हवे. ते अनेक वेळेला तक्रार करतात. परंतु, वस्तुस्थिती काय आहे हे तपासणे गरजेचे आहे. अंबादास दानवे यांच्याकडे सध्या कुठलेही पद नाही. त्यामुळे कदाचित त्यांची शोध मोहीम सुरू असेल, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
Mahendra Dalvi: अंबादास दानवे सुपारीबाज नेता, महेंद्र दळवींची टीका
महेंद्र दळवी यांनी या प्रकारावर प्रतिक्रिया दिली आहे. अंबादास दानवेंनी तो व्हिडीओ नीट दाखवावा. लाल टी-शर्टमधील व्यक्ती कोण, हे त्यांनी सांगावे. मी व्हिडीओत असेल तर मी आमदारकीचा राजीनामा देईन. ब्लॅकमेल करणं हा अंबादास दानवेंचा धंदा आहे. त्यांच्याकडे कोणतं काम नाही, पद नाही, पक्षात त्यांना कोणी कुत्रं विचारत नाही. या व्हिडीओशी माझा काहीही संबंध नाही. अंबादास दानवे यांनी तो व्हिडीओ समोरच्या व्यक्तीच्या चेहऱ्यासकट दाखवावा. त्यांनी व्हिडीओ कट करुन दाखवू नये. अंबादास दानवे यांनी पुरावे घेऊन हा व्हिडीओ माझाच आहे, हे सिद्ध करुन दाखवावे. अंबादास दानवेंनी व्हिडीओ मॉर्फ केला आहे. अंबादास दानवेंना कोणी सुपारी दिली हे सांगावे. अंबादास दानवे सुपारीबाज नेता आहे, अशी टीका महेंद्र दळवी यांनी अंबादास दानवे यांच्यावर केलीय.
आणखी वाचा























