(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Hiraman Khoskar: क्रॉस व्होटिंगचा आरोप, सत्ताधाऱ्यांशी जवळीक, धनगर आरक्षणासाठी 'हा' आमदार राजीनामा देण्याच्या पावित्र्यात
Hiraman Khoskar: हिरामण खोसकर आता धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरून पेटून उठले आहेत. ते आरक्षणाच्या मुद्द्यावर आक्रमक झाले असून त्यांनी राजीनामा देण्याचा पवित्रा घेतला आहे.
मुंबई: विधान परिषद निवडणुकीमध्ये (Vidhan Parishad Election) क्रॉस व्होटिंग केल्याचा ठपका काँग्रेसचे इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर (Hiraman Khoskar) यांच्यावर लावण्यात आला होता. त्यानंतर ते सत्ताधारी पक्षातील नेत्यांशी जवळीक साधत असल्याचंही दिसून आलं. मात्र, आता हेच हिरामण खोसकर (Hiraman Khoskar) आता धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरून पेटून उठले आहेत. ते आरक्षणाच्या मुद्द्यावर आक्रमक झाले असून त्यांनी राजीनामा देण्याचा पवित्रा घेतला आहे.
धनगर समाजाला आदिवासीमधून आरक्षण देण्याचा वाद पेटला आहे. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या पाठोपाठ आता आमदार हिरामण खोसकर आक्रमक झाल्याचे दिसून येत आहेत. हिरामण खोसकर राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. सोमवारी आदिवासी समाजाच्या वरिष्ठ नेत्यांची मुबंईत बैठक होणार आहे. या बैठकीत पुढील भूमिका मांडली जाणार आहे. आदिवासी समाजाचे 25 आमदार राजीनामा देण्याबाबतचा निर्णय या बैठकीत घेतला जाणार आहे, अशी माहिती आमदार हिरामण खोसकर यांनी एबीपी माझाला दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आम्हला बैठकीला न बोलवता चुकीचा निर्णय घेतला, असा थेट आरोप हिरामण खोसकर यांनी मुख्यमंत्रीवर केला आहे.
नरहरी झिरवळांनी व्यक्त केली शिंदेंवर नाराजी
धनगर आरक्षणाबाबत मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतलेल्या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार व आदिवासी नेते नरहरी झिरवाळ यांनी देखील नाराजी व्यक्त केली. "धनगरांचा अनुसूचित जातींमध्ये समाविष्ट करण्याच्या बाबतचा निर्णय घेण्यासाठी सरकारने समितीची नेमणूक केली आहे. याबाबतचा निर्णय घेताना त्यांनी आम्हाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विश्वासात घ्यायला पाहिजे होतं. आदिवासी समाजाच्या प्रतिनिधींना त्या बैठकीला बोलवायला हवं होतं."
"जर आमचे त्यांच्याशी लागेबंधे आहेत. तर, आम्हालाही बैठकीला बोलवायला पाहिजे होतं. म्हणून मी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुढच्या आठवड्यात भेटणार आहे. आमच्या संघटना, आमच्या समाजासाठी आयुष्य खर्च केलेल्या लोकांना घेऊन आमच्या समाजाचा विचार मुख्यमंत्र्यांसमोर मांडण्याचा माझा प्रयत्न राहील".
धनगर नेते आदित्य फत्तेपूरकर यांचे आदिवासी नेत्यांना आवाहन
धनगर समाजाला अनुसूचित जमातीमधून आरक्षण देण्यास विरोध करणाऱ्या आदिवासी नेत्यांना धनगर समाजाने फटकारले असून आमची मागणी घटनेतील आहे. आदिवासी नेत्यांनी दोन समाजात तेढ निर्माण करण्यापेक्षा तज्ज्ञ घेऊन चर्चेला सामोरे यावे असे आवाहन धनगर समाजाचे नेते आदित्य फत्तेपूरकर यांनी आज केले आहे. धनगर समाजाची अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्याची मागणी नसून घटनेने आम्ही अनुसूचित जमातीमध्येच आहोत केवळ याची अंमलबजावणी करा एवढीच आमची मागणी असल्याचे फत्तेपूरकर यांनी सांगितले आहे.
आज धनगर आमरण उपोषणाच्या दहाव्या दिवशी एक उपोषण करते माऊली हळणवर यांना चक्कर आली व ते बेशुद्ध पडले . हळणवर यांची प्रकृती अस्वस्थ झाल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. यामुळे समाजात संताप वाढत चालला असून शासनाकडून केवळ मुदत मागितल्याने या उपोषणकर्त्यांनी आपले उपोषण सुरूच ठेवले आहे. सध्या सहा पैकी तीन उपोषणकर्त्यांची प्रकृती अत्यंत खालावलेली असून इतर तिघांची प्रकृती बिघडायला लागली आहे. अशावेळी शासनाने व मुख्यमंत्र्यांनी भूलथापा न देता तातडीने टाईम बॉण्ड कार्यक्रम जाहीर करून त्याची अंमलबजावणी करण्याची मागणी फत्तेपूरकर यांनी केली आहे.
आदिवासी मंत्री व सर्व पक्षाचे आदिवासी आमदार हे फक्त समाजात असंतोष निर्माण करीत असून त्यांनी त्यांची तज्ज्ञ समिती घेऊन उपोषण स्थळी यावे. येथे धनगरांचे तज्ज्ञ आणि आदिवासी तज्ज्ञ यांच्या चर्चा करून जर धनगर समाजाची मागणी बेकायदा असेल तर आम्ही तातडीने ती मागणी सोडून देऊ. मात्र, घटनात्मक मागणी असेल तर आदिवासी नेत्यांनी ते तात्काळ मान्य करावे असे आव्हान केले आहे. आदिवासी समाजाचा धनगर समाजाच्या बाबतीत कोणताही रोष नसून हे नेते चुकीची माहिती देऊन त्यांना भडकवण्याचे काम करत असल्याचा आरोप फत्तेपुरकर यांनी केला. आदिवासी नेत्यांनी चर्चेसाठी आल्यावर जागेवरच तोडगा निघेल यासाठी मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घ्यावा आणि अशी चर्चा झाल्यास आदिवासी नेत्यांच्या हातूनच उपोषण सोडवता येईल असेही आव्हान फत्तेपूरकर यांनी केली आहे. त्यांचा रोष प्रामुख्याने नरहरी झिरवळ व इतर आदिवासी आमदारांवर आहे.