Ajit Pawar : अजित पवारांचा महायुतीतील मित्र पक्षांना इशारा, म्हणाले; समाजात धार्मिक ध्रुवीकरण करणाऱ्यांवर कारवाई करायला हवी
Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवारांनी महायुतीतील मित्रपक्षांना इशारा दिलाय. समाजात धार्मिक ध्रुवीकरण करणाऱ्यांवर कारवाई करायला हवी, असं अजित पवार म्हणाले.
Ajit Pawar, पुणे : "समाजाचं ध्रुवीकरण करणाऱ्यांवर कारवाई व्हायला हवी. ज्ञानेश महाराजांनी वादग्रस्त आणि अपमानकारक वक्तव्य करून अनेकांच्या भावना दुखावल्या. हा अधिकार तुम्हाला कोणी दिला. काही लोक इतर समाजबाबत बोलतात. यात आमच्या मित्र पक्षाचे नेते ही अशी भाषा वापरतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला काय शिकवले आणि आपण काय करतोय. समाजात ध्रुवीकरण करणाऱ्यांवर कारवाई करायला हवी. सर्व-धर्म समभाव ही राष्ट्रवादीची विचारधारा आहे अन यापुढं ही राहील", असं उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले. ते पुण्यातील (Pune) जनसन्मान यात्रेत बोलत होते.
माझ्या समोर कोणी चुकीचं बोलत असेल तर त्या रोखण्याची जबाबदारी माझी
अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, ज्ञानेश महाराजांनी आक्षेपार्ह वक्तव्य केलं. तेव्हा उपस्थित महत्वाच्या व्यक्तींनी त्यांना का रोखलं नाही? ज्ञानेश महाराज आक्षेपार्ह बोलत असताना अनेक महत्त्वाच्या व्यक्ती मंचावर होत्या. जर मी ही एखाद्या ठिकाणी चुकून आक्षेपार्ह बोलत असेन मला मंचावरील इतरांना थांबवायला हवं. अजितदादा मला तुमचं बोलणं पटत नाही, असं म्हणून मला रोखायला हवं. अथवा माझ्या समोर कोणी चुकीचं बोलत असेल तर त्या रोखण्याची जबाबदारी माझी आहे.
एक मायचा लाल आणा आणि दाखवा की ह्याने चिरीमिरी घेऊन कामं केलं
मला कोणाच्या बापाची भीती नाही, मी काय कोणाचं घोडं मारलंय का? एक मायचा लाल आणा आणि दाखवा की ह्याने चिरीमिरी घेऊन कामं केलं. पण विनाकारण नको त्या बातम्या पेरून माझी बदनामी केली जाते. या फ्लेक्सवर अमोल कोल्हेचा फोटो आहे, आता ते स्थानिक खासदार आहेत. त्यामुळं प्रोटोकॉल म्हणून त्यांचा फोटो लावला. लगेच काय तर ब्रेकिंग न्यूज. अरे बाबांनो जरा मागचा-पुढचा विचार करा. हा काय पक्षाचा कार्यक्रम नाही, विविध विकास कामांचे लोकार्पण होतंय. मग तिथं प्रोटोकॉल पाळावा लागतो, असंही अजित पवारांनी स्पष्ट केलं.
खेड-आळंदीची विधानसभा जर आपल्या वाट्याला आली तर तुम्ही दिलीप मोहितेंना आमदार करा. मग मी तुमची मंत्रिपदाची इच्छा पूर्ण करतो. आता हा माझा निर्णय आहे. कारण आता मीचं साहेब आहे, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला.
इतर महत्वाच्या बातम्या