(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Jay Pawar: बारामतीच्या मतदानाला अवघे काही तास शिल्लक, कोणालाही थांगपत्ता लागून न देता जय पवार मनोज जरांगेंच्या भेटीला, चर्चांना उधाण
Maharashtra Politics: बारामती लोकसभा मतदारसंघात अजित पवार यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. ही लढाई जिंकण्यासाठी अजित पवार शक्य ते सर्व प्रयत्न करताना दिसत आहेत. बारामतीमध्ये येत्या 7 मे रोजी मतदान होणार आहे.
जालना: राज्यातील सर्वात प्रतिष्ठेची लोकसभेची लढाई म्हणून पाहिल्या जाणाऱ्या बारामती मतदारसंघाच्या (Baramati Lok Sabha) मतदानाला अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघात आज प्रचाराचा शेवटचा दिवस असून 7 मे रोजी याठिकाणी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर अजितदादा गटाकडून (Ajit Pawar Camp) एक महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार (Jay Pawar) हे रविवारी सकाळी अचानकपणे अंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या भेटीसाठी दाखल झाले. त्यामुळे राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या. या दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली, हे अद्याप गुलदस्त्यात आहे.
जय पवार यांनी मनोज जरांगे यांच्या भेटीला जाणार असल्याचा थांगपत्ता कोणालाही लागून दिला नाही. रविवारी सकाळी जय पवार मुंबईतून हेलिकॉप्टरने थेट छत्रपती संभाजीनगरला पोहोचले. तेथून कारने जय पवार हे अंतरवाली सराटी येथे पोहोचले. याठिकाणी जय पवार यांनी अर्धा तास वाट पाहिल्यानंतर मनोज जरांगे यांच्याशी त्यांची भेट झाली. यानंतर आगतस्वागतचा कार्यक्रम पार पडला. जय पवार यांनी ही केवळ सदिच्छा भेट असल्याचे सांगितले. मात्र, या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
मनोज जरांगे यांनी काही महिन्यांपूर्वी मराठा आरक्षणासाठी पुकारलेल्या आंदोलनामुळे राज्यातील वातावरण ढवळून निघाले होते. मनोज जरांगे यांच्या उपोषणामुळे शिंदे-फडणवीस सरकार जेरीस आले होते. अखेर राज्य सरकारने स्वतंत्र मराठा आरक्षणाचा कायदा मंजूर केला होता. मात्र, जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण आणि सगेसोयऱ्यांना आरक्षण देण्याची मागणी लावून धरली होती. यादरम्यान मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका केली होती. यावरुन एका रात्रीत मनोज जरांगे यांना गांभीर्याने घेण्याची राज्य सरकारची भूमिका बदलली होती. भाजपच्या अनेक नेत्यांनी फडणवीसांवर टीका केल्याबद्दल मनोज जरांगे यांना लक्ष्य केले होते. यानंतर मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला ब्रेक लागला होता. तेव्हापासून राज्य सरकार आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात कोणतीही चर्चा झालेली नाही. मात्र, आज अजित पवार यांचे चिरंजीव अचानक मनोज जरांगे यांच्या भेटीला पोहोचल्याने यामागे नेमके काय कारण असावे, याविषयी तर्कवितर्क लढवले जात आहेत.
आणखी वाचा