Shrinivas Pawar: घराण्यातील राजकीय संघर्षामुळे अजित पवारांची आई बहिणीकडे राहायला गेली, अजितदादांना 4 जूनला मिशा काढाव्या लागतील: श्रीनिवास पवार
Maharashtra Politics: बारामती लोकसभा मतदारसंघात येत्या 7 तारखेला मतदान होणार आहे. या मतदानावेळी सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे. आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. शेवटच्या दिवशी जोरात प्रचार होणार.
बारामती: देशात 4 जून रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होईल, तेव्हा अजित पवार यांना त्यांच्या मिशा काढाव्या लागतील, असे वक्तव्य अजित पवार यांचे धाकटे बंधू श्रीनिवास पवार (Shrinivas Pawar) यांनी केले आहे. अजित पवार यांनी शनिवारी बारामतीमध्ये झालेल्या सभेत सुप्रिया सुळे आणि त्यांच्यासोबत असलेल्या पवार कुटुंबीयांवर शरसंधान साधले होते. सध्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्यासोबत प्रचारात दिसत असलेला एकही जण 4 जूननंतर दिसणार नाही, जर एकही जण दिसला तर माझ्या मिशा काढेन, असे अजित पवार (Ajit Pawar) यांनी म्हटले होते.
अजितदादांच्या या टीकेला श्रीनिवास पवार यांनी तिखट भाषेत प्रत्युत्तर दिले. अजित पवार यांना 4 जूनला निकाल लागल्यानंतर मिशा काढाव्या लागतील, असे श्रीनिवास पवार यांनी म्हटले. तसेच पवार कुटुंबातील राजकीय संघर्षामुळे अजित पवारांची आई नाराज झाल्याचेही त्यांनी म्हटले. माझा मुलगाही मला प्रिय आहे आणि दीरही तितकेच प्रिय आहेत. मला तुमच्या दोघांच्या लढाईत पडायचे नाही, असे अजितदादांच्या आईने सांगितले. या संघर्षामुळे अजित पवार यांची आई बारामती सोडून पुण्यात बहिणीकडे राहायला गेली आहे. अजितदादांनी टोकाची भूमिका घेतल्यामुळेच आपण त्यांची साथ सोडल्याचे श्रीनिवास पवार यांनी सांगितले.
बारामती लोकसभा मतदारसंघासाठी 7 मे रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीत शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे आणि अजितदादा गटाकडून सुनेत्रा पवार रिंगणात आहेत. बारामतीची निवडणूक ही अत्यंत प्रतिष्ठेची आहे. त्यामुळे शरद पवार आणि अजित पवार या दोघांनीही बारामतीमध्ये आपली संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. या निवडणुकीच्यानिमित्ताने शरद पवार यांची राजकीय कारकीर्द पणाला लागली आहे. अजित पवार यांच्यापाठी भाजपची अजस्त्र यंत्रणा आहे. मात्र, शरद पवार यांचा वैयक्तिक करिष्मा आणि जनसंपर्क बारामतीमध्ये वरचढ ठरू शकतो. त्यामुळे येत्या 4 जूनला काय घडणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
शरद पवारांवर सभेचे मैदान बदलण्याची वेळ
बारामती आणि शरद पवार हे वर्षानुवर्षे अतूट असे समीकरण राहिले आहे. बारामती हा शरद पवारांचा अभेद्य बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे निवडणूक कोणतीही असो शरद पवार प्रचाराच्या शेवटच्या दिवशी बारामतीतील मिशनरी बंगल्याच्या मैदानावर सांगता सभा घेत आलेत. मात्र, यंदा मिशन बंगला परिसरातील मैदान अजित पवार यांच्या पक्षाला सभेसाठी प्रशासनाकडून देण्यात आले आहे. त्यामुळे सुप्रिया सुळे यांच्या सांगता सभेसाठी बारामतीतील मोरगाव रस्त्यावरील एका मैदानाची निवड करण्याची वेळ शरद पवार गटावर आली. या गोष्टीचे पुरेपूर भांडवल करत सभेच्या ठिकाणी शरद पवारांसंबधी भावनिक आवाहन करणारे पोस्टर्स सभेच्या ठिकाणी लावण्यात आलेत.
आणखी वाचा
मोदी म्हणाले शरद पवार हे 'भटकती आत्मा', अजित पवार म्हणाले पुढच्या सभेत मोदींना विचारणार