(Source: ECI/ABP News/ABP Majha)
काल मनोज जरांगेंच्या बैठकीला हजेरी लावली, आज आरक्षणासाठी जीवनयात्रा संपवली; परभणीतील धक्कादायक घटना
Maratha Reservation Suicide : परभणी जिल्ह्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मागील दोन दिवसांत दोन तरुणांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आल्या आहेत.
Maratha Reservation Suicide : मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) विषय दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. सगेसोयरे बाबत काढण्यात आलेल्या अध्यादेशाच्या अंमलबजावणीच्या मागणीसाठी मनोज जरांगे उपोषण करत आहेत. मात्र, दुसरीकडे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी तरुण टोकाचे पाऊल उचलून जीवन संपवत असल्याच्या घटना समोर येत आहे. दरम्यान, परभणी (Parbhani) जिल्ह्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मागील दोन दिवसांत दोन तरुणांनी आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. काल (10 फेब्रुवारी) रोजी सेलुतील तरुणाने आत्महत्या केल्यानंतर आज (11 फेब्रुवारी) सोनपेठमधील नरवाडीतील पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणाने आपली जीवनयात्रा संपवली आहे. उद्धव जोगदंड (वय 25 वर्ष) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे.
सोनपेठ तालुक्यातील नरवाडी गावातील उद्धव जोगदंड हा पोलीस भरतीची तयारी करत होता. तसेच मनोज जरांगे यांनी सुरु केलेल्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनात देखील तो सतत सहभागी राहत होता. काल अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या बैठकीला देखील तो उपस्थित होता. त्यानंतर सायंकाळी तो गावी आला. मात्र, मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी होत असलेल्या विलंबाने तो व्याकुळ झाला होता. गावात आल्यानंतर नागरिकांशी त्याने तशी चर्चा देखील केली. त्यानंतर आपल्या शेतात जाऊन त्याने गळफास लावून आत्महत्या केली. सोनपेठ पोलिसांत घटनेची नोंद करण्यात आली आहे.
प्रत्यक आंदोलनात होता सहभागी...
उद्धव हा सातत्याने मराठा आरक्षण आंदोलनात सहभागी होता. गावातील मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला प्रतिसाद म्हणून नरवाडी गावात सुरू केलेल्या अन्न त्याग आंदोलनात देखील तो सक्रिय सहभागी होता. त्याचबरोबर आंतरवाली सराटी येथे झालेल्या सभेला देखील त्याची उपस्थिती होती. तसेच, मराठा आरक्षणासाठी जालना ते मुंबई निघालेल्या पायी मोर्चामध्ये गावकऱ्यांसह तो सहभागी होता. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या चिंतेत त्याने आत्महत्या केली असल्याचा दावा गावकऱ्यांसह कुटुंबातील सदस्यांनी केला आहे.
परभणीत दोन दिवसांत दोन आत्महत्या...
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मागील काही दिवसांपासून राज्यातील मराठा समाजबांधव एकत्रित आले आहेत. मनोज जरांगे यांच्याकडून देखील आंदोलन करण्यात येत आहे. मात्र, असे असतानाच दुसरीकडे याच आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यात होणाऱ्या आत्महत्या देखील वाढल्या आहेत. परभणी जिल्ह्यात देखील मागील काही दिवसांत सतत अशा घटना समोर येत आहेत. दरम्यान, मागील दोन दिवसांत परभणी जिल्ह्यात दोन तरुणांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आपलं जीवन संपवलं आहे. परभणीच्या सेलुतील राजवाडी येथील प्रताप काळे या तरुणाने चिट्ठी लिहून ठेवत शेतातील झाडास गळफास घेऊन जीवन संपवले असल्याची घटना काल समोर आली होती. तर, आज पुन्हा सोनपेठ तालुक्यातील नरवाडी गावातील उद्धव जोगदंड या तरुणाने आत्महत्या केली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :
सगेसोयरेच्या कायद्यासाठी एकीकडे जरांगेंचं उपोषण, दुसरीकडे याच मागणीसाठी तरुणाने संपवलं जीवन