Eknath Khadse : लाडक्या बहिणींप्रमाणे शेतकऱ्यांनाही मदतीसाठी निकष लावू नका, एकनाथ खडसेंची मागणी
Marathwada Flood : हे संवेदना नसलेले सरकार असून सर्व मंत्र्यांनी पूरस्थितीची पाहणी करा असे आदेश मुख्यमंत्र्यांना द्यावे लागतात हे दुर्दैव असल्याचं एकनाथ खडसे म्हणाले.

जळगाव : निवडणूक काळात लाडकी बहीण योजना राबवत सरकारने ज्या पद्धतीने कोणतेही कागदपत्र पडताळणी न करता मदत केली, त्याच पद्धतीने आता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनाही पंचनामे न करता, तातडीने मदत करावी अशी मागणी राज्याचे माजी मंत्री एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी केली आहे. शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी विविध निकष लावून शेतकऱ्यांना छळले जात असल्याचा आरोप यावेळी एकनाथ खडसे यांनी केला.
राज्यात मराठवाड्यातील अनेक भागात पूर परिस्थिती (Marathwada Flood) असल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. सरकारने ओला दुष्काळ जाहीर करून तातडीने शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे. राज्य सरकारची आर्थिक परिस्थिती डबघाईला आली असल्याने केंद्राने स्वतः पुढाकार घेऊन ही मदत केली पाहिजे असं एकनाथ खडसे म्हणाले.
कोणतेही निकष लावू नका (Eknath Khadse on Marathwada Rain)
एखनाथ खडसे म्हणाले की, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याबाबत सरकारने पावलं उचलावीत. विधानसभा निवडणुकीच्या आधी ज्या प्रमाणे जीआर काढून, कोणतीही कागदपत्रं न तपासता लाडक्या बहिणींना मदत केली, त्याच पद्धतीने सर्व शेतकऱ्यांना पंचनामे न करता मदत करावी.
सध्याचं सरकार हे संवेदना नसलेले सरकार आहे. नुकसानग्रस्त भागात जाऊन पाहणी करा अशा सूचना स्वतः मुख्यमंत्र्यांना आपल्या मंत्र्यांना द्याव्या लागत आहेत हे या राज्याचं दुर्दैव आहे. यातून या सरकारची शेतकऱ्यांबाबत काय आस्था आहे हे दिसून येते असं एकनाथ खडसे म्हणाले.
नुकसान झाल्याने कर्ज भरण्याची क्षमता शेतकऱ्यांमध्ये राहिली नाही. त्यामुळे राज्य सरकारने तातडीने कर्ज माफीची घोषणा करावी अशी मागणीही एकनाथ खडसे यांनी सरकारकडे केली.
कोणतेही अधिकचे निकष लावणार नाही, मुख्यमंत्र्यांचे आश्वासन (CM Fadnavis on Marathwada Rain)
सोलापुरातील माढा तालुक्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून नुकसानग्रस्त भागांची पाहणी करण्यात आली. यावेळी स्थानिकांशी संवाद साधत मुख्यमंत्र्यांनी व्यथा जाणून घेतल्या आणि काही महिलांकडून निवेदन स्वीकारलं.
कुठलेही अधिकचे निकष लावणार नाही, आवश्यकता असल्यास निकष शिथील करून शेतकऱ्यांना मदत करणार अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांची दिली. दिवाळीपूर्वीच पावसामुळे नुकसान झालेल्या सगळ्यांना मदत केली जाईल असं आश्वासन यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिलं.
पीक विमा कंपनीमधील साहित्याची तोडफोड (Hingoli Crop Insurance Issue)
मुसळधार पावसामुळे हिंगोलीतील पिकांचं अतोनात नुकसान झालं आहे. अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाल्याने शेतातील पीक सुद्धा वाहून गेलं आहे. या संदर्भात पीक विमा कंपनीकडून कोणती दखल घेतली जात नसल्याचा आरोप करत क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले. कार्यकर्ते पीक विमा कंपनीच्या कार्यालयामध्ये जाब विचारण्यासाठी गेले आणि त्यानंतर आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनी चक्क कार्यालयातील खुर्च्या आणि साहित्यांची तोडफोड केली.
ही बातमी वाचा:
























