Sharad Pawar: पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड निलंबित; शरद पवार आज परभणीत, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूबाबात काय बोलणार?
Sharad Pawar Visit To Parbhani: घटनेचे पडसाद हिवाळी अधिवेशनामध्ये देखील पाहायला मिळाले. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आज परभणीत मृत तरूणाच्या कुटबांची भेट घेणार आहेत.
परभणी : परभणीमध्ये संविधानाच्या शिल्पाची मोडतोड केल्याचा दाव्यानंतर परभणीत मोठा हिंसाचार उफाळला. समस्त आंबेडकरी संघटना, आंबेडकरी समाज आक्रमक होऊन रस्त्यावर उतरला होता. या आंदोलनामुळे निर्माण झालेल्या हिंसाचाराप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असणाऱ्या सोमनाथ सूर्यवंशी याच्या मृत्यूने खळबळ उडाली. सोमनाथ सूर्यवंशी (Somnath Suryavanshi Death) या तरुणाचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचा दावा केला जात होता. मात्र आता शवविच्छेदनाच्या अहवालातून Shock following multiple injuries हे कारण समोर आल्यामुळे मोठा संताप व्यक्त केला जात आहे. विरोधी पक्षाचे नेते पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना दिसत होते. या घटनेचे पडसाद हिवाळी अधिवेशनामध्ये देखील पाहायला मिळाले. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आज परभणीत मृत तरूणाच्या कुटबांची भेट घेणार आहेत.
न्यायालयीन कोठडीत असताना मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी याच्या कुटुंबियांची शरद पवार भेट घेणार आहेत. पुतळा परिसरात आंदोलन स्थळालाही ते भेट देणार आहेत, परभणीतील त्या घटनेनंतर आरोप झाल्यानंतर काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहामध्ये यावर उत्तर देत न्यायालयीन चौकशी तसेच सोमनाथच्या कुटुंबीयांना दहा लाख कर ज्येष्ठ नेते विजय वाकडे यांच्या कुटुंबीयांना पाच लाखांची मदत जाहीर करत पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांना निलंबित केले. मात्र, या उत्तरावर विरोधक समाधानी दिसले नाहीत आणि याच पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार परभणीत दाखल होणार आहेत. सुरुवातीला ते मयत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांची भेट घेणार आहे. त्यानंतर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला भेट देऊन अभिवादन करणार आहेत. तसेच परभणी सुरू असलेल्या आंदोलन स्थळी ते जाणार आहेत. यानंतर जेष्ठ नेते विजय वाकोडे यांच्या कुटुंबीयांची ते भेट घेणार आहेत आणि यानंतर ते पत्रकारांशी संवाद साधणार आहेत.
सोमनाथ सूर्यवंशी कोण होता?
सोमनाथ सूर्यवंशी हा एक विद्यार्थी होता. त्याने परभणीतील एका महाविद्यालयात कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी प्रवेश केला होता. सध्या त्याच परीक्षा चालू होती. त्यामुळेच तो पुण्यातून परभणीत आला होता. मिळालेल्या माहितीनुसार सोमनाथ सूर्यवंशी हा एएलबीच्या तिसऱ्या वर्गात शिक्षण घेत होता. तर सोमनाथ शूर्यवंशीच्या आधार कार्डवरील माहितीनुसार तो मूळचा पुण्याचा रहिवासी होता. त्याचं पूर्ण नाव सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी असे होते. त्याचा जन्म 23 जुलै 1989 रोजी झाला होता. तर आधार कार्डवर नमूद पत्त्यानुसार तो पुण्यातील भोसरी या भागात राहायचा.
नेमकं काय आहे प्रकरण?
परभणीमध्ये मंगळवारी 10 डिसेंबरला स्टेशन रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची तोडफोड करून विटंबना करण्यात आली. या विटंबनेमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी बुधवारी 11 डिसेंबर रोजी परभणी जिल्हा बंदची हाक दिली होती. या बंददरम्यान परभणीत जाळपोळ आणि दगडफेकीच्या घटना घडल्या. त्यानंतर परभणी पोलिसांनी कोंबिग ऑपरेशन राबवत गुन्हे दाखल केले आणि त्यांना अटक केली.
अटक केलेल्यांपैकी सोमनाथ सूर्यवंशी या 35 वर्षीय तरूणाचा रविवारी सकाळी न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला. सोमनाथ सूर्यवंशीच्या शरीरावर अनेक जखमा असल्याने सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक अहवालात स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पोलिसांच्या अमानुष मारहाणीमुळेच सोमनाथचा मृत्यू झाल्याचा आरोप केला जात असून सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूस जबाबदार धरून परभणी एलसीबीचे पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांना तातडीने बडतर्फ करण्याची मागणी आंबेडकरी अनुयायांनी केली होती.
परभणी घटनेच्या निषेधार्थ जालना जिल्हा बंदची हाक
परभणी घटनेच्या निषेधार्थ आज जालना जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. सकल आंबेडकर समाज आणि सकल वडार समाजाच्या वतीने ही बंदची हाक देण्यात आली आहे. या आवाहनानंतर जालना कृषी उत्पन्न बाजार समिती देखील बंद राहणार असून शेतकऱ्यांनी आपला शेतीमाल आणू नये, असं आवाहन देखील करण्यात आल आहे. आज दुपारी आंबेडकरी समाजाच्या वतीने शहरांमध्ये निदर्शने देखील करण्यात येणार आहेत.