Jintur APMC : परभणीच्या जिंतूर बाजार समितीचे वादग्रस्त गाळे जमीनदोस्त, न्यायालयाच्या आदेशानंतर कारवाई
Jintur Bazar Samiti : कृषी उत्पन्न बाजार समितीने तातडीने या 10 अनधिकृत बांधकामावर कार्यवाही करून गाळे बांधकाम जमीनदोस्त केले.
परभणी : जिंतूर बाजार समितीतील वादग्रस्त बांधकाम झालेले 10 गाळे जमीनदोस्त करण्यात आली आहेत. न्यायालयाच्या आदेशानंतर बाजार समितीने ही कारवाई केली आहे. या कारवाईमुळे जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बोर्डीकर आणि भांबले गटात वादाची ठिणगी पडली आहे.
जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या तत्कालीन अशासकीय प्रशासक मंडळाने बनावट लेआउट तयार केले होते. अनाधिकृत गाळे बांधकाम करून त्याची विक्री केली होती. दरम्यान, गाळे बांधकाम केलेली जागा बांधकाम विभागाची असल्यामुळे प्रकरण जिल्हा न्यायालयात गेले होते.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बाजूने निर्णय आल्यानंतर बांधकाम विभागाने बाजार समितीकडून अतिक्रमण करण्यात आल्याबाबत बाजार समिती प्रशासनाला कळवले होते. यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीने तातडीने या 10 अनधिकृत बांधकामावर कार्यवाही करून गाळे बांधकाम जमीनदोस्त केले. यावेळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.मात्र पोलिस बंदोबस्त असल्याने वातावरण निवळले.
जिंतूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या तत्कालीन प्रशासक सचिव व अभियंता यांनी सन 2022 साली माजी आमदार विजय भांबळे यांचे प्रशासक मंडळ कार्यरत असताना सर्वांनी संगनमत करून बनावट लेआऊट तयार करून प्लॉट विक्री, बागबगीचा खर्च, बांधकाम खर्च, गोदमातील भंगार विक्री, स्वच्छता व दुरुस्ती, प्रवास खर्च, जेवण इत्यादी कामात स्वतःचे हीत साधण्यासाठी तब्बल 34 लाख लाख रुपयांचा अपहार केल्याचा आरोप करण्यात आला होता.
सध्याचे बाजार समितीचे सभापती गंगाधर बोर्डीकर यांच्या फिर्यादीवरून तत्कालीन संचालक मंडळ, सचिव आणि इतर काही जणांवर जिंतूर पोलीस ठाण्यात विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. जिंतूर बाजार समितीच्या आवारातील येलदरी व वरुड रस्त्यावर तत्कालीन प्रशासक मंडळाने अनधिकृत व्यापारी गाळे बांधकाम करून त्याची परस्पर विक्री करण्यात आली. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने जिल्हा न्यायालयात प्रकरण दाखल करून येलदरी रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्याची मागणी केली होती.
जिल्हा निबंधक आदेशानुसार प्रत्यक्ष कार्यवाही करण्यात आली. यावेळी कार्यवाही करताना व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानातील सामान काढून घेण्याअगोदरच जेसीबीने बांधकाम पडण्यास सुरुवात केली. रोडवरील तब्बल दहा अनाधिकृत गाडी बांधकाम केलेले दुकाने बुलडोजरच्या साह्याने जमीनदोस्त करण्यात आली. कर वरुड रस्त्यावरील जवळपास चार अनाधिकृत बांधकामांना काही काळ मुदत देण्यात आली असून लवकरात लवकर त्याच्यावरही बुलडोजर चालविण्यात येणार असल्याचे बाजार समिती प्रशासनाने स्पष्ट केलं आहे. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या कार्यवाहीत बाजार समितीचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.