फिरोज सय्यद निघाले पठाणकोटला; रेल्वे स्टेशनवर गाव जमलं 3 भूमिपुत्रांना 'बॉर्डर'वर सोडवायला
भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धविराम झाला असला तरीही सीमेवर तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर परभणी जिल्ह्यातील जवान आपल्या कर्तव्यासाठी पुन्हा एकदा सज्ज झाले आहेत.

परभणी : भारत आणि पाकिस्तान (Pakistan) यांच्यात गेल्या 5 दिवसांपासून युद्धजन्य परिस्थिती असून सीमारेषेवर सातत्याने शस्त्रसंधीचं उल्लंघन होत आहे. सैन्य दलाकडून कारवाया सुरूच असून हवाई हल्ले देखील करण्यात येत आहे. पंतप्रधानांकडून लष्करांना विशेष अधिकार देण्यात आल्याने सैन्य दलातील जवानांच्या सुट्ट्याही रद्द झाल्या आहेत. त्यातच, सुट्टी घेऊन गावी आलेले जवान तत्काळ बॉर्डवर रवाना होतानाचा चित्र देशभरातून दिसून येत आहे. कुणी लग्नासाठी आलंय, कुणी जत्रेसाठी आलाय, कुणी कुटुंबीयांसाठी आलंय. पण, जवानांना तत्काळ सीमारेषेवर परतावे लागत आहेत. परभणी (Parbhani) जिल्ह्यातील तीन जवान आज सीमारेषेवर (Border) रवाना झाल्या, त्यावेळी रेल्वे स्टेशनवर त्यांना सोडवायला भरल्या डोळ्यांनी कुटुंबीय आले होते. तर, भारत माता की जय... असे म्हणत मित्र परिवार व स्थानिकही एकत्र आले होते. त्यामध्ये पठाणकोटमध्ये तैनात असलेल्या फिरोज सय्यद मुसा यांनाही त्यांचे नातेवाईक सोडवायला आले होते.
भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धविराम झाला असला तरीही सीमेवर तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर परभणी जिल्ह्यातील जवान आपल्या कर्तव्यासाठी पुन्हा एकदा सज्ज झाले आहेत. सुट्ट्या रद्द झाल्यामुळे आज परभणीचे 3 जवान तातडीने सीमेकडे रवाना झाले. काश्मीरच्या राजुरी सेक्टरमध्ये कर्तव्यात असलेले रणजीत पवार, इसार येतील सीमेवर असलेले रोहिदास नाईक राठोड,पठाणकोट येथील सय्यद फिरोज सय्यद मुसा हे 3 जवान आज रवाना झाले आहेत. भारतमातेच्या या वीर जवानांना निरोप देण्यासाठी आज परभणी रेल्वे स्टेशनवर त्यांच्या गावकऱ्यांसह परभणीकरांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी जवानांचे कुटुंबीय भावुक झाल्याचे पाहायला मिळाले.
हळदीच्या अंगाने प्रसाद काळे देशसेवेसाठी रवाना
सातारा जिल्हा हा सैनिकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. साताऱ्याने अनेक जवान भारत मातेच्या संरक्षणासाठी दिले आहेत. सध्या भारत-पाकिस्तान युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने सुट्टीवर असलेल्या सर्वच जवानांना तत्काळ सीमारेषेवर बोलवण्यात आले आहे. सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यात असलेल्या काळेवाडी गावातील प्रसाद काळे या जवानाचे नुकतेच लग्न झाले. पण, युनिटमधून फोन आला अन् हळदीच्या ओल्या अंगाने ते ऑपरेशन सिंदूर साठी सीमेवर रवाना झाले आहेत. प्रसाद यांच्या पत्नीने स्वतःच्या आनंदापेक्षा देशाच्या सुरक्षेला प्राधान्य देत असल्याचे म्हटले. तसेच पहिले देशसेवा आणि नंतर कुटुंब असे सांगत प्रसादला देशसेवेसाठी जाण्यास हसतमुखाने पाठिंबा दिला.
परळीत भारतीय सैन्यासाठी रुद्राभिषेक
भारतीय नागरिकांच्या रक्षणासाठी आपल्या जीवाची पर्वा न करता देशाच्या सीमेचे रक्षण करणाऱ्या भारतीय सैन्याला यश आणि दीर्घायुष्य लाभावे यासाठी परळीतील नागरिकांकडून ज्योतिर्लिंग वैद्यनाथाला रुद्राभिषेक करण्यात आला.रुद्राभिषेकानंतर वैद्यनाथाला महाआरती देखील करण्यात आली. गेल्या काही दिवसात भारतीय सैन्याने पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिले. दोन्ही देशांमध्ये शस्त्र संधी झाली असली तरी भविष्यात पाकिस्तानसोबत पुन्हा युद्ध झाल्यास भारतीय सैन्याला बळ मिळावे आणि त्यांना दीर्घायुष्य मिळावे यासाठी हा रुद्राभिषेक करण्यात आला. या रुद्राभिषेकासाठी देशप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने वैद्यनाथ मंदिरात उपस्थित होते. अभिषेकानंतर मंदिर परिसर भारत माता की जय च्या घोषणांनी दुमदुमून गेला.























