कामावर का गेला नाहीत असे म्हणताच पत्नीला विषारी द्रव पाजले; परभणी जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार
Parbhani Crime News : याप्रकरणी आता पत्नीने दिलेल्या जबाबावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
परभणी : जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कामावर का गेला नाहीत असे म्हणताच पत्नीला पतीने चक्क विषारी द्रव पाजल्याची घटना उघडकीस आली आहे. घरगुती कारणावरून झालेल्या भांडणामध्ये पतीने एवढ्या टोकाचे पाऊल उचलल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना परभणी (Parbhani) जिल्ह्यातील नानलपेठ ठाण्याच्या हद्दीतील नेहरूनगर भागात बुधवारी सायंकाळी घडली आहे. याप्रकरणी आता पत्नीने दिलेल्या जबाबावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नारायण पवार असे आरोपी पतीचे नाव आहे.
अधिक माहितीनुसार, परभणीतील शासकीय रुग्णालयात उपचार घेत असलेल्या नेहरूनगरातील शीतल नारायण पवार यांनी पोलिसांना जबाब दिलाकी, त्यांचे माहेर हादगाव तालुक्यातील मारलेगाव येथील आहे. दरम्यान, त्यांचे सन 2012 मध्ये नेहरूनगर भागातील नारायण उत्तम पवार यांच्यासोबत लग्न झाले, त्यांना एक मुलगा आणि मुलगी आहे. पती नारायण पवार हे बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास घरी असताना त्यांना शीतल पवार यांनी कामावर का गेला नाहीत, असे विचारले. त्यावेळी नारायण पवार यांनी भांडण करून शिविगाळ केली. पुढे वाद एवढा वाढला की, नारायण पवार यांनी पत्नीस विषारी द्रव पाजले आणि तुला जिवंत ठेवणार नाही, असे म्हटले. नंतर आरडाओरड केल्याने सासू, नणंद आणि शेजाऱ्यांनी सोडवासोडव केली.
चक्कर येत असल्याने रुग्णालयात दाखल केले...
नारायण पवार यांनी विषारी द्रव पाजल्याने शीतल पवार यांना चक्कर येवू लागले. त्यामुळे त्यांचे दीर बालाजी आणि सासू यांनी उपचारासाठी त्यांना सरकारी दवाखान्यात दाखल केले. डॉक्टरांनी त्यांच्यावर तात्काळ उपचार सुरु केले. सध्या त्यांची प्रकृती ठीक आहे. दरम्यान, घडलेल्या या सर्व घटनेनंतर शीतल पवार यांच्या तक्रारीवरून पती नारायण पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक वसंत मुळे पुढील तपास करीत आहेत.
मुलीसोबत वेगळे का राहत नाही म्हणून जबर मारहाण
दुसऱ्या एका घटनेत आमच्या मुलीसोबत वेगळे का राहत नाही म्हणून मंठा तालुक्यातील इडोळी येथील 8 ते 9 जणांनी संगनमत करून बोरी गावातील संजयनगरातील कुटुंबाला बेदम मारहाण केली. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांत देण्यात आलेल्या तक्रारीनुसार आरोपींनी रॉड आणि काठ्यांचा वापर करत मारहाण केली आहे. गोविंद रामेश्वर अंभुरे यांच्या फिर्यादीवरून नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला.
इतर महत्वाच्या बातम्या: