(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ekanath Shinde : महायुती सरकारमध्ये एकनाथ शिंदेंचं स्थान काय? मुख्यमंत्र्यांचं स्पष्टच उत्तर; भाजपचा मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा
Ekanath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना म्हटले की, महायुतीने केलेलं काम आणि लोकांनी दाखवलेला विश्वास हेच महायुतीच्या विजयाचं कारण आहे.
Ekanath Shinde : मुंबई : विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर आता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून जवळपास देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना मुख्यमंत्री करण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही देवेंद्र फडणवीस यांच्याच नावाला पसंती दिल्याची माहिती आहे. त्यातच, गेल्या दोन दिवसांपासून नाराज असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आज पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्रीपदासंदर्भात भाष्य केलं. महायुती म्हणून आम्ही एकत्र निवडणूक लढलो असून आमच्यात कुठलीही नाराजी नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. तसेच, महायुती मजबूत असून जनतेनं जो जनादेश दिलाय तो लक्षात घेऊन आता आणखी खूप काम करायचंय, नापी है थोडी जमीन पुरा आसमान बाकी है.. असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी एकप्रकारे मुख्यमंत्रीपदाच्या निरोपाचंच भाषण केल्याचं पाहायला मिळालं. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शाह यांच्याशी फोनवर बोलल्याची माहिती देखील एकनाथ शिंदेंनी दिली. तसेच, एकनाथ शिंदेंचं मंत्रिमंडळात काय स्थान असेल, या प्रश्नावरही त्यांनी उत्तर दिलं.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना म्हटले की, महायुतीने केलेलं काम आणि लोकांनी दाखवलेला विश्वास हेच महायुतीच्या विजयाचं कारण आहे. एकीकडे विकास आणि दुसरीकडे कल्याणकारी योजनांच सांगड आम्ही घातली, महायुतीच्या सर्वांनीच खूप काम केलं. मी पहाटेपर्यंत काम करायचो आणि तीन-चार तास झोप घेऊन पुन्हा कामाला लागायचो. मी कालही कार्यकर्ता होतो, आजही कार्यकर्ता आणि उद्याही कार्यकर्ता म्हणूनच काम करेन, असे मुख्यमंत्री शिंदेंनी म्हटलं. सर्वसामान्यांसाठी मी काम केलंय, गरिब कुटुंबीयांच्या वेदना मला समजत होत्या, त्यामुळे मी त्यांना डोळ्यासमोर ठेऊन काम केलं. मी अडीच वर्षांच्या काळामध्ये केंद्रातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचं पाठबळ आमच्या पाठिमागे होते. अडीच वर्षे त्यांनी मला मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी दिली, त्यासाठी मी त्यांना धन्यवाद देईन. कारण, आमच्या सरकारने घेतलेले अनेक निर्णय हे क्रांतीकारक ठरले आहेत.
लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ अशी माझी ओळख निर्माण झाली. मला सर्व पदांपेक्षी ही ओळख मोठी वाटते. मी समाधानी असून गेल्या अडीच वर्षांसाठी केलेल्या कामावर आनंदी आहे. आम्ही नाराज होऊन लढणारे नाही, तर लढून काम करणारे आहोत. विधानसभेतील आजचा विजय हा ऐतिहासिक विजय आहे. मी माझ्या अंगात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत महाराष्ट्राच्या जनतेसाठी काम करेन. मला पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोन आला होता, मी त्यांनाही फोनवर बोलताना सांगितलं एनडीएचे प्रमुख म्हणून तुम्ही जो निर्णय घेताल तो मला मान्य राहिल. मी गृहमंत्री अमित शाह यांना देखील फोन करुन तुमचा जो निर्णय होईल ते मान्य असल्याचे एकनाथ शिंदेंनी पत्रकार परिषदेतून सांगितलं.
एकनाथ शिंदेंना कोणते पद मिळणार?
महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात एकनाथ शिंदेंंचं स्थान काय असेल, या प्रश्नावरही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिलंय. याबाबत आमच्या तिन्ही पक्षांची उद्या दिल्लीत बैठक होणार आहे. या बैठकीत जो निर्णय होईल, त्यानुसार मुख्यमंंत्री व मंत्रिमंडळाचे सर्वकाही ठरेल, असे उत्तर एकनाथ शिंदेंनी दिले. त्यामुळे, मंत्रिमंडळात एकनाथ शिंदेंचे स्थान काय असेल हे उद्याच समजू शकते.
शिवसेना-भाजपमध्ये मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच
मु्ख्यमंत्रीपद पुन्हा एकदा शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनाच मिळायला पाहिजे, अशी भावना शिंदेंच्या आमदारांची आहे. त्यामुळे, अनेक ठिकाणी देवाला नवस बोलले जात असून कार्यकर्त्यांकडूनही मुख्यमंत्रीपदाच्या मागणीचा आग्रह धरला जात आहे. दुसरीकडे भाजप नेते व आमदारही देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री बनविण्यासाठी देव पाण्यात ठेऊन आहेत. त्यामुळे, अधिकृत घोषणा होईपर्यंत मुख्यमंत्रीपदाबाबतचा सस्पेन्स कायम आहे.