Parbhani Accident : परभणीतील दुचाकी अपघातातील मृतांची संख्या वाढली; दुसऱ्या विद्यार्थ्यांचा उपचारादरम्यान मृत्यू
Parbhani Accident : परभणीत प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहणासाठी दुचाकीवरुन जाताना रील बनवताना झालेल्या अपघातातील मृतांची संख्या वाढली आहे. अपघातातील जखमी विद्यार्थ्यांपैकी दुसऱ्या विद्यार्थ्याचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला.
Parbhani Accident : परभणीत (Parbhani) प्रजासत्ताक दिनी (Republic Day 2023) ध्वजारोहणासाठी दुचाकीवरुन जाताना रील बनवताना झालेल्या अपघातातील (Accident) मृतांची संख्या वाढली आहे. या अपघातातील मृतांची संख्या दोन झाली आहे. अपघातातील जखमी विद्यार्थ्यांपैकी दुसऱ्या विद्यार्थ्याचा आज (27 जानेवारी) उपचारादरम्यान मृत्यू झाला. स्वप्नील चव्हाण असं या मृत विद्यार्थ्याचं नाव असून त्याच्यावर लातूर येथील खाजगी रुग्णालयात कालपासून उपचार सुरू होते. आज सकाळी स्वप्नील चव्हाणची प्राणज्योत मालवली.
ध्वजारोहणासाठी चार विद्यार्थी एकाच दुचाकीवरुन शाळेत निघाले होते
परभणीच्या पाथरी सोनपेठ महामार्गावर डाकू पिंपरी येथील नववीत शिकणारे चार विद्यार्थी एकाच दुचाकीवरुन प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहणासाठी दुचाकीवरुन जात होते. यावेळी दुचाकी चालवत रील बनवताना त्यांचा अपघात झाला होता. या अपघातात काल (26 जानेवारी) एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता. तर आज दुसऱ्या विद्यार्थ्याचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. शंतनु सोनवणे आणि स्वप्नील चव्हाण या दोघांचा मृत्यू झाला आहे. तर राहुल तिथे, योगानंद घुगे या दोघांवर सध्या अंबाजोगाई येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
रील करताना दुचाकीला अपघात, एकाचा जागीच मृत्यू
प्रजासत्ताक दिनाच्या झेंडावंदनासाठी डाकू पिंपरी इथले नववीचे चार विद्यार्थी एकाच दुचाकीवरुन पाथरीच्या कानसूर इथल्या चक्रधर स्वामी विद्यालयाकडे जात होते. झेंडावंदनाला जाताना 'मेला' या चित्रपटातील 'डर है तुझे किस बात का?' या गाण्यावर विद्यार्थी रील तयार करत होते. यावेळी विद्यालयापासून एक किमी अंतरावर राष्ट्रीय महामार्गावर समोरून येणाऱ्या वाहनाला त्यांची दुचाकी धडकली आणि भीषण अपघात झाला. अपघात झाला त्यावेळी दुचाकीवर बसलेले चारही विद्यार्थी रस्त्याच्या कडेला फेकले गेले. सकाळी 7 वाजता हा अपघात घडला. हा अपघात इतका भीषण होता की एका विद्यार्थ्याचा एक हात रस्त्यावर तुटून पडल्याचं उपस्थितांनी सांगितलं. तर शंतनू सोनवणे या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला. तर स्वप्नील चव्हाण, राहुल तिथे आणि योगानंद घुगे यांच्यावर अंबाजोगाईतील रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यापैकी स्वप्नील चव्हाणला लातूरच्या खासगी रुग्णालयात हलवलं होतं. तिथेच आज त्याने अखेरचा श्वास घेतला.
या अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर थोड्याच वेळाने अपघातापूर्वीचा एक व्हिडीओ समोर आला, ज्यात हे विद्यार्थी 'रील' बनवत असताना दिसून येत आहेत.
Parbhani Accident : परभणीत झालेल्या अपघातातील आणखी एकाचा मृत्यू, 4 पैकी 2 विद्यार्थ्यांनी गमावला जीव
संबंधित बातमी :