(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Narendra Patil : मराठ्यांना उचकवू नका, अन्यथा घरात घुसून...; ओबीसी नेत्यांना नरेंद्र पाटलांचा थेट इशारा
Narendra Patil : ओबीसी नेत्यांनी आपले काम करावे, मराठा समाजाच्या विरोधात त्यांनी वक्तव्य करू नयेत: नरेंद्र पाटील
परभणी : सरसकट मराठा आरक्षण (Maratha Reservation) आणि मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्यावर सतत टीका करणाऱ्या ओबीसी नेत्यांवर (OBC Leaders) अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील (Narendra Patil) यांनी निशाणा साधला आहे. ओबीसी नेत्यांनी आपले काम करावे, मराठा समाजाच्या विरोधात त्यांनी वक्तव्य करू नयेत. मराठा समाजाला चेतवण्याचा प्रयत्न केल्यास मराठा समाज घरात घुसून काय करायचं ते करून जाईल हे तुम्हाला माहीत आहे, असा थेट इशारा नरेंद्र पाटील यांनी दिला आहे. परभणी (Parbhani) जिल्ह्याच्या दौऱ्यावर असतांना 'एबीपी माझा'ला प्रतिक्रिया देतांना त्यांनी हे वक्तव्य केले आहे.
यावेळी बोलतांना नरेंद्र पाटील म्हणाले की, "ओबीसी नेत्यांनी एक लक्षात घेतलं पाहिजे. मनोज जरांगे हे जी काही मागणी मांडतायत, ती काही प्रमाणात योग्य आहे. वर्षानुवर्ष मराठा समाजाच्या हक्कासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्याला दाबण्याचे काम काही नेत्यांनी केलं आहे. त्यामध्ये ओबीसीचे काही नेते जे आज भांडतायत ते पुढे होते. वेगवेगळ्या समितीचे अहवाल मराठा समाजाच्या बाजूने आल्यावर देखील त्या समित्यांना सूचना देऊन ते अहवाल पारित होऊ दिले नाही. असे काही द्वेषी लोक आहेत. त्यांनी आता गप्प बसले पाहिजे. समाजाला अंगावर घेऊ नयेत. आज मोठ्या प्रमाणात मराठा समाज चिडलेला आहे. त्यांना वारंवार त्रास दिला जातो. त्यामुळे तुम्ही तुमचं बघा, तुमचं रक्षण करा. तुम्ही आमच्या नादाला कशाला लागत आहात. उगाच व्यासपीठावर जाऊन तुम्ही आम्हाला चेतवात असून, त्याची काय गरज आहे. तसेच जर चेतवायची गोष्ट निघाली तर मराठा समाज घरात घुसून काय करायचं ते करून जाईल हे तुम्हाला माहीत आहे. त्यापेक्षा ओबीसी समाजाच्या नेत्यांनी आपली संघटना आणि आपलं कसं व्यवस्थित होईल हे पाहावं. आम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे पाहून काम करतोय. ते आम्हाला न्याय देतील तुमच्या पोटात का दुखत आहे,"असे नरेंद्र पाटील म्हणाले.
मुंबई आंदोलनाबाबत जरांगेंनी निर्णय घ्यावा...
शिंदे समितीचा सर्व्हेक्षण अहवाल जोपर्यंत योग्य येणार नाही. तोपर्यंत मागासवर्ग आयोग मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी निर्णय घेऊ शकत नाही. अशाप्रकारे दबाव तयार करून मुंबईसारख्या सर्व जाती-धर्माच्या शहराला मोठा ताण निर्माण झाल्यास तो चुकीच्या दिशेने जाऊ शकतो. आज मी देखील मुंबईत राहतो, मुंबईत आंदोलन करतांना खूप मर्यादा असतात. या ठिकाणी जातीय भानगडी होऊ शकतात. आंतरवाली सराटीच्या आंदोलनात देखील काही लोक बाहेरून घुसली होती. काहींनी जाळपोळ केली. त्याप्रमाणे गालबोट लागू शकतो. त्यामुळे जरांगे पाटील यांनी याचा विचार केला पाहिजे आणि त्यांनी ठरवलं पाहिजे. मुंबईसारख्या शहराला आपण किती ताण द्यायचा हे आंदोलन करणाऱ्या नेत्यांनी ठरवलं पाहिजे. दबावाचा वापर करून जर आपण एखादा अहवाल घेतला आणि तो न्यायालयात पुन्हा रद्द झाल्यास अडचण होईल असेही पाटील म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या: