एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ऊस पट्ट्यात मोत्यांची शेती, पंढरपुरातील शेतकऱ्याचा प्रयोग, लाखोंच्या उत्पन्नाची अपेक्षा
वाखरीमधील दिगंबर गडम या शेतकऱ्याने आपल्या शेततळ्यात शिंपले सोडून मोत्यांच्या शेतीला सुरुवात केली आहे. गडचिरोलीसह राज्यातील काही भागात या मोठ्यांच्या शेतीचे प्रयोग यशस्वी झाल्यानंतर गडम यांनी प्रशिक्षण घेत हा प्रयोग केला आहे.
पंढरपूर : दरवर्षी होणारे ऊस दराचे वांदे त्यात आलेला हुमणी, तेलाने उद्ध्वस्त होत असलेलं डाळिंब पीक आणि इतर पिकाला मिळणारी मातीमोल किंमत, यामुळे वैतागलेल्या वाखरीतील एका शेतकऱ्याने आता या ऊस पट्ट्यात मोत्यांच्या शेतीचा प्रयोग केला आहे. पंढरपूर तालुक्यातील वाखरी परिसर ऊस पट्टा म्हणून ओळखला जातो. मात्र गेल्या काही वर्षांपासून ऊसदरासाठी सुरु असलेले वाद आणि त्यातून होणारं नुकसान यामुळे शेतकरी वैतागून गेले आहेत. अशातच यंदा हुमणीमुळे ऊसाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने डोक्यावर नुसती कर्जे वाढू लागल्याने, वाखरीमधील दिगंबर गडम या शेतकऱ्याने आपल्या शेततळ्यात शिंपले सोडून मोत्यांच्या शेतीला सुरुवात केली आहे. गडचिरोलीसह राज्यातील काही भागात या मोठ्यांच्या शेतीचे प्रयोग यशस्वी झाल्यानंतर गडम यांनी प्रशिक्षण घेत हा प्रयोग केला आहे.
वाखरीमध्ये दिगंबर गडम यांची सात एकर शेती असून यात ऊस आणि डाळिंबाची पिकं आहेत. दोन्ही पिकं रोगांमुळे अडचणीत आल्यावर त्यांनी हा निर्णय घेतला. त्यांच्या शेतात 100 बाय 100 फुटांचं एक शेततळे असून यात त्यांनी तीन हजार शिंपले सोडले आहेत. यातून तयार होणाऱ्या मोत्यांची खरेदीचे करारही कंपन्यांनी केल्यामुळे सध्या गडम यांचा हा प्रयोग पाहण्यासाठी सोलापूर जिल्हा आणि मराठवाड्यातून अनेक शेतकरी येऊ लागले आहेत. उजनीच्या कालव्यामुळे शेततळ्यात पाणी असल्याने त्यांनी या प्रयोगाचे धाडस केलं. यासाठी सुरुवातीला साधारण 3 लाख रुपयांचे 3000 शिंपले त्यांनी या शेततळ्यात सोडले असून एक वर्षानंतर त्यांना यातून मोती मिळायची अपेक्षा आहे.
गडम यांच्या 85 लाख लिटर क्षमतेच्या या शेततळयातील संरक्षित पाण्याचा ठिबकच्या सहाय्याने शेतीसाठी वापर केला जातो. याच पाण्यात त्यांनी जाळी मारुन तळे बंदिस्त केले. इंडोपर्ल कंपनीने दिलेले शिंपले दोरीला तारेच्या जाळ्यात अडकवून या शेततळ्यात सोडण्यात आले. या शिंपल्यात न्यूक्लियस सोडताना सध्या बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी असणारे गणपती, गौतम बुद्ध, महावीर यांच्यासह अशा विविध आकारांचे आकर्षक मोती बनतील याचा विचार केला गेला आहे. वर्षभरानंतर तयार होणारे हे आकर्षक आकारातील मोती इंडोपर्ल ही कंपनी खरेदी करणार आहे. प्रत्येक शिंपल्यात 2 न्यूक्लियस सोडल्याने प्रत्येक शिंपल्यात दोन मोती वर्षभरात तयार होतील. गडम यांनी सोडलेल्या शिंपल्यात मर लक्षात घेऊन साधारण 5 हजार मोती बनू शकणार आहेत. इंडोपर्ल ही कंपनीने प्रत्येक मोती 250 रुपयाच्या दराने खरेदी करण्याचा करार केल्याने त्यांना वर्षभरात किमान गुंतवणुकीच्या दुप्पट फायदा मिळू शकणार आहे.
मोती तयार होण्याच्या प्रक्रियेदरम्यान उघड्या शेततळ्यात शेवाळ तयार होत असते. यातील जिवाणूंचा या शिंपल्याचे खाद्य असल्याने यासाठी एक रुपयाचाही देखभालीचा खर्च असणार नसल्याचं गडम सांगतात. याशिवाय हे पाणी ड्रीपने इतर पिकांना दिल्याने शेतातील पिकेही वाढत राहणार असून जरी पिकातून नुकसान झाले तरी या मोत्यांच्या शेतीतून फायदा मिळणार असल्याने शेतकऱ्याला मजबूत आधार मिळणार असल्याचे गडम यांनी सांगितलं. मोत्यांच्या शेतीचा जुगार टाळण्यासाठी गडम यांनी शिंपल्याचा
विमा देखील काढल्याने आता या गुंतवणुकीत त्यांना कोणतेही नुकसान दिसत नाही. त्यामुळे त्यांना 3 लाखांच्या गुंतवणुकीत किमान 10 ते 12 लाख रुपयाचे उत्पन्न एक वर्षात नक्की मिळू शकणार आहे. सध्याच्या काळात प्रत्येक पीकच सध्या जुगार बनलेला असतानाही शेततळ्यातील मोत्याची शेती ऊसपट्ट्यातील शेतकऱ्यांसाठी देखील अतिशय फायदेशीर ठरु शकते, असं गडम यांना वाटतं.
सध्या गडम यांच्या शेतात सोलापूर जिल्ह्यासह मराठवाड्यातील शेतकरी येऊन भेटी देऊ लागल्याने त्यांचाही उत्साह वाढला आहे. सध्या बहुतांश शेतकऱ्यांकडे मोठं मोठी शेततळी असून अनेकांच्या शेततळ्यात अजूनही पाणी आहे. अशावेळी हा प्रयोग करण्याच्या भूमिकेतून शेतकरी आता या मोत्यांच्या शेतीची माहिती घेऊ लागले आहेत.
मराठवाड्यातील कळंब येथून आलेले मुकुंद फडतरे यांना तर सध्याच्या दुष्काळी परिस्थितीतही मोत्यांची शेती आशादायी वाटत असून आपल्या शेतात लाखभर शिंपले सोडायची त्यांनी तयारी केली आहे. सध्या मराठवाड्यात दुष्काळामुळे सर्वच पिकांनी माना टाकल्या असताना, फडतरे हे आपल्या शेततळ्यातील मत्स्यशेती बंद करुन मोत्यांच्या शेतीच्या तयारीत आहेत. मोडलिंब येथील आलेल्या गणेश व्यवहारे या शेतकऱ्याला आता डाळिंबाच्या जुगारापेक्षा हा मोत्यांच्या शेतीचा प्रयोग जास्त फायदेशीर वाटू लागला आहे. सुरुवातीला एकदाच गुंतवणूक केल्यानंतर खात्रीने किमान दुप्पट उत्पन्न देणारा हा व्यवसाय वाखरी येथील ज्ञानू मदने आणि भागवत पोरे यांनाही आवडल्याने आता उपट्ट्यातील शेततळ्यात आता ही मोत्यांची शेती जोर धरु लागणार हे मात्र नक्की...
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
निवडणूक
निवडणूक
राजकारण
Advertisement