(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पालघर जिल्हा परिषदेचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सदस्य हबीब शेख अटकेत; 10 कोटींच्या कामांमध्ये फसवणुकीचा आरोप
Palghar News: पालघर जिल्ह्या परिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सदस्य हबीब शेख यांना दहा कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पालघर पोलिसांनी अटक केली आहे.
Maharashtra Palghar Updates: पालघर जिल्हा परिषदेच्या (Palghar Zilla Parishad) मोखाडा तालुक्यातील (Mokhada Taluka) आसे जिल्हा परिषद गटातील राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य, जव्हार अर्बन बँकेचे चेअरमन आणि निलेश सांबरे यांचे खंदे समर्थक हबीब शेख (Habib shaikh) यांना शासनाची दहा कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पालघर पोलिसांनी (Palghar Police) काल (शनिवारी) रात्री अटक केली आहे.
पालघरचे विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांच्या नावाने बनावट लेटर पॅड तयार करून त्यावर बनावट सह्या करून तब्बल दहा कोटी रुपयांची कामं मंजूर केल्याप्रकरणी खासदार राजेंद्र गावीत यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, शेख यांच्यावर गुन्हा दाखल करून स्थानिक गुन्हे शाखेनं हबीब शेख यांना अटक केली आहे. हबीब शेख (Habib Shaikh Arrested) सध्या पोलिसांच्या ताब्यात असून पुढील प्रक्रिया सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
मोखाडा विभागातील मोखाडा खोडाळा विहीगाव राज्यमार्ग 78 रस्त्यांसाठी खासदार यांनी मागणी केल्यानुसार, शासनाकडून 10 कोटीच्या निधीची मंजुरी मिळाली होती. या कामाच्या मंजुरी करता सार्वजनीक बांधकाम विभागाकडे खासदारांनी विचारणा केली असता मंजुर झालेल्या कामाचा पाठपुरावा आणि त्याकरता लागणारी कागदपत्रे जिल्हा परिषद सदस्य हबीब शेख यांनी सादर केल्याची धक्कादायक माहिती खासदारांना मिळाली.
प्रकरण नेमकं काय?
या प्रकाराविषयी खासदार राजेंद्र गावित यांनी माहिती जाणून घेतली. तेव्हा शेख यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे काही कामासाठी सादर केलेली कागदपत्रे ही बनावट असल्याचे समोर आले. हबीब शेख यांनी बनावट लेटरहेड तयार करून त्यावर राजेंद्र गावित यांच्या बनावट सहीचा चुकीचा वापर केला. विशेष म्हणजे, या बनावट सहीवर मुख्यमंत्री कार्यालयाची टिपणी असल्याचे समजते. त्यामुळे लोकप्रतिनिधींची आणि सरकारची दिशाभूल करून शासनाची 10 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी खासदार राजेंद्र गावित यांनी पालघर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी हबीब शेख यांच्यावर पालघरमध्ये गुन्हा दाखल करून काल रात्री त्यांना अटक केली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :