Palghar Rain: वसईतील रस्ता गेल्या दहा दिवसांपासून पाण्याखाली, नागरिक बेहाल
गास-सनसिटी रोड पाण्याखाली असल्याने नागरिकांना वसई गाव अथवा देवतलाव असा दुहेरी वळसा घेत निर्मळ मार्गे नालासोपारा अथवा पुन्हा वसईत येण्यासाठी लांब पल्ल्याचा प्रवास करावा लागतोय.
पालघर: वसईत सुरू असलेल्या पावसामुळे गेल्या दहा दिवसांपासून गास-सनसिटी रस्ता पाण्याखाली गेला आहे. हा मुख्य रस्ता पाण्याखाली गेला असल्याने, या रस्त्यावरून जाऊन कुठलाही अपघात होऊ नये याकरता पोलिसांनी हा रस्ता बंद केला होता. मात्र आता वाहनचालक या रस्त्यावरून वाहन हाकत आहे. दहा दिवसापासून रस्त्यावरील पाणी ओसरत नसल्याने नागरिकांनी रोष व्यक्त केला आहे.
गास-सनसिटी रोडवर सलग दहा दिवसापासून पावसाचं पाणी साचलं आहे. 18 जुलैपासून वसई विरार क्षेत्रात पावसाने हाहाकार माजवला आहे. तेव्हापासून हा रस्ता पाण्याखाली गेला आहे. तो आतापर्यंत तसाच आहे. या गास सनसिटी रस्त्याचा वापर नालासोपारा, भुईगाव, निर्मळ, गास, विरार पासून अनेक नागरिक नियमित करत असतात. वसई रेल्वे स्थानक या रस्त्याने काही वेळातच गाठता येते. सनसिटी, चुळणे रस्त्यावर बाजूलाच लागून संपूर्ण खाडी क्षेत्र असल्याने खास करून पावसाळ्यात समुद्रात भरती आली की हे पाणीसुद्धा या गास रस्त्यावर येते आणि इथला संपूर्ण मार्गच बंद होतो आणि दरवर्षीप्रमाणे पालिका आणि वाहतूक पोलीस हा रस्ता बंद करतात.
येथील नागरिकांना वसई गाव अथवा देवतलाव असा दुहेरी वळसा घेत निर्मळ मार्गे नालासोपारा अथवा पुन्हा वसईत येण्यासाठी लांब पल्ल्याचा प्रवास करून शेवटी घर गाठावे लागत आहे. यंदाही पोलिसांनी हा रस्ता बंद केला होता. मात्र काही वाहनचालक या पाण्यातून मार्ग काढण्याचं धाडस करत असतात. रात्रीच्या सुमारास तर येथे मोठा अपघात होवू शकतो. आजारी माणसे, गरोदर मातांना हा रस्ता बंद असल्यामुळे वळसा घालून जावं लागतं आहे. त्यामुळे नागरिकांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या रस्त्यात पाणी ओसरायला आणखीन काही दिवस लागू शकते.
गास सनसिटी हा रस्ता सरकारी आणि मिठागराच्या जागेतून 2005 साली बनला आहे. सध्या मिठागराची जागा ही पालिकेकडे हस्तांतरीत झाली आहे. हा रस्ता सिडको ने बनवला त्याच रुंदीकरण, डागडुजी ही वसई विरार शहर महानगरपालिकेने केली. रस्त्याच्या शेजारी सायकल ट्रॅक ही 2019 ला बनवला आहे. दरवर्षी हा रस्ता पाण्याखाली जात असल्याने नागरिकांचे हाल बेहाल होत आहेत. प्रशासन आणि स्थानिक आमदारांच लक्ष नसल्याचा आरोप ही स्थानिकांनी केला आहे
वसई विरारचे आयुक्त अनिल कुमार पवार यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं की, दीड कोटी खर्चून दोन उघाड्या बनवण्यात आल्या आहेत. तर आता या रस्त्याची हाईट ही वाढवणार आहेत. साडे तीन कोटीचा रस्त्याचं टेंडर ही काढण्यात आलं आहे. पावसाचा जोर जास्त असल्याने पावसाचं पाणी साठत असल्याच आयुक्तांनी सांगितलं.
ही बातमी वाचा: