Palghar Rain: धामणी धरणाचे पाच दरवाजे उघडले; सूर्या नदीला पूर, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
Palghar Rain : सूर्या प्रकल्पाच्या धामणी धरणाचे पाच दरवाजे उघडले आहेत आणि सूर्या नदीत विसर्ग सोडण्यात आला आहे, त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
Palghar Rain Update : पालघर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस (Heavy Rain) सुरू आहे. बुधवारी (26 जुलै) रात्रीपासून धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. पालघर जिल्ह्यातील सूर्या प्रकल्पाचं सर्वात मोठी पाणी क्षमता असलेलं धामणी धरण 97.51 टक्के भरलं आहे. रात्री दोन वाजता धामणी धरणाचे (Dhamani Dam) पाचही दरवाजे पन्नास सेंटीमीटरने उघण्यात आले असून धामणी धरणामधून 253.11 क्युमेक आणि कवडासमधून 618.66 क्यूमेक (21,829 क्युसेक) वेगाने पाण्याचा विसर्ग सूर्या नदीत सोडण्यात आला आहे. त्यामुळे सूर्य नदीला मोठा पूर आला असून नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस
धामणी धरणातून पालघर जिल्ह्यातील प्रमुख शहरांसह वसई, विरार आणि मीरा-भाईंदर महानगरपालिकांना पाणीपुरवठा होतो. त्याच प्रमाणे, सूर्या प्रकल्पाच्या उजवा आणि डावा कालव्याच्या मार्फत शेतकऱ्यांना शेतीसाठीही पाणीपुरवठा करण्यात येतो. पालघरमधील धरण क्षेत्रात आज 188 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून आत्तापर्यंत 2 हजार 583 मिलीमीटर पाऊस नोंदवण्यात आला आहे.
मुसळधार पावसामुळे गावपाड्यांचे हाल
पालघरच्या (Palghar) मोखाडा तालुक्यातील कुर्लोद ग्रामपंचायती मधील शेड्याचा पाडा, आंबेपाडा, रायपाडा, जांभूळपाडा या एकूण 500 हून अधिक लोकसंख्या असलेल्या गावपाड्यांना रस्ताच (Road Issue) नाही. उन्हाळ्यात नदी आटलेली असल्यामुळे कसाबसा प्रवास होतो, मात्र पावसाचे प्रमाण वाढल्यास मात्र या पाड्यांचा आणि जगाचा संपर्कच तुटत असल्याचं भयाण वास्तव समोर येत आहे.
गरजेच्या वस्तू आणणं देखील कठीण
मोठ्या प्रमाणावर पावसामुळे गावपाड्यांजवळील नदी ओसंडून वाहते आणि त्यामुळे ती पार करताच येत नाही. पावसाच्या दिवसांत या गावपाड्यांचा संपर्क तुटतो. अशा वेळी, जगण्यासाठीच्या गरजेच्या वस्तू आणणं तर सोडा, मात्र शाळा, दवाखाना या सुविधा देखील मिळत नाहीत. त्यात आता तर गावकऱ्यांचं जगणंच धोक्यात आलं आहे.
अर्ज देऊनही पूल बांधला जात नाही
काही महिन्यांपूर्वी गावांतून वाहणाऱ्या नदीवर एका संस्थेकडून मोठा बंधारा बांधण्यात आला, त्यामुळे पाणी कमी असेल तर यावरुन दुसऱ्या बाजूला जाणं-येणं शक्य होतं. मात्र पाण्याचं प्रमाण वाढल्यास हा प्रवास अधिक धोक्याचा होतो. जगण्यासाठी बाहेत तर पडावं लागेल, या मजबुरीने येथील महिला, बालकं या बंधाऱ्यावरुन ये-जा करण्याचा प्रयत्न करतात. पण हे कधी त्यांच्या जीवावर बेतेल हे सांगता येत नाही. ग्रामस्थांनी वेळोवेळी यासंबंधी पाठपुरावा केला, अर्जही दिले, मात्र, याचा काहीही उपयोग झाला नाही.
ग्रामस्थ संतप्त
तुम्ही कितीही रस्ते मागा, पूल मागा, काहीही मागा, शासन दरबारी यासंबंधीची कागदं लवकर हलत नाहीत. मात्र, एखादा बळी गेला की मात्र सर्वच जागे होतात. यामुळे शासनाला या गावपाड्यांना पूल द्यायला एक तरी बळी द्यावा लागेल की काय? असा संतप्त सवाल येथील ग्रामस्थ करत आहेत.
हेही वाचा :
Sangli Rain Update: चांदोली धरणातून विसर्ग वाढवला; धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम