(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Palhjr News: पालघरच्या समुद्रात थरार, मच्छीमारांनी वाचवले पोलिसांचे प्राण
पालघर समुद्रात केळवे ते दातीवरे या भागात पेट्रोलिंग करण्यासाठी गेलेली अशोका बोट दातीवरे गावाच्या समोर समुद्रात 7 नॉटिकल भागात गेल्यावर बोटीत हळूहळू पाणी शिरत असल्याचे तैनात पोलिसांच्या लक्षात आले.
पालघर: पालघर समुद्र किनाऱ्यावर शुक्रवारी मोठी दुर्घटना टळली. समुद्रात पेट्रोलिंगसाठी गेलेली पोलीसांची बोट अचानक बुडू लागली यामुळे एकच खळबळ माजली होती. दरम्यान याबाबत तातडीने बोटीच्या मदतीसाठी स्थानिक मच्छीमारांच्या बोटीच्या मदतीने गस्त घालणारी बोट किनाऱ्यावर आणण्यात पोलिसांना यश आले आहे.
पालघर समुद्रात केळवे ते दातीवरे या भागात पेट्रोलिंग करण्यासाठी गेलेली अशोका बोट दातीवरे गावाच्या समोर समुद्रात 7 नॉटिकल भागात गेल्यावर बोटीत हळूहळू पाणी शिरत असल्याचे तैनात पोलिसांच्या लक्षात आले. आपल्या स्पीड बोटमध्ये अर्ध्यावर पाणी शिरू लागल्यानंतर पोलीस कर्मचाऱ्यांनी पाणी पिण्याच्या बाटल्या कापून त्याद्वारे बोटीत शिरलेले पाणी काढण्यास सुरुवात केली. मात्र समुद्रात जोरदार वारे वाहत असल्याने तुफानी लाटा उसळत होत्या अशा वेळी बोट लाटावर हेलकावे घेत असल्याने बोटीतील पाणी बाहेर काढणे शक्य होत नव्हते. दरम्यान पाणी बोटीत शिरल्याने त्यांच्या लाईफ जॅकेटसह अन्य साहित्य वाहून गेले होते.
बोटीतील एका अधिकाऱ्याने केळवे सागरी पोलीस ठाण्याचे सह पोलीस निरीक्षक भीमसेन गायकवाड यांच्या मोबाईलवर संपर्क साधत मदत मागितली. त्यानंतर गायकवाड यांनी आपले सहकारी कॉन्स्टेबल जयदीप सांबरे, वसंत वळवी, पी सी साळुंखे आदी कर्मचाऱ्यांना सोबत घेत मांगेल वाडीतील हर्षल मेहेर, राकेश मेहर, आतिश मेहेर, रितेश मेहेर, चंद्रकांत तांडेल आणि रुपेश बंगारा यांच्यासोबत त्यांची लक्ष्मीप्रसाद बोट समुद्रात रवाना केली.
समुद्रात वादळी वारे आणि मोठ्या लाटा उसळत असताना मच्छीमारांनी तासभर प्रवास करत त्या बोटीचा शोध घेतला. समुद्रात भरती असल्याने ही बोट भरतीच्या प्रवाहाने दातीवरे गावाकडून टेम्भी गावाच्या समोर वाहत आली होती. मदतीसाठी बोट पोहचल्यावर बुडत असलेल्या अशोका बोटीतील पोलिसांनी सुटकेचा निःश्वास टाकला. अशोका बोटीत जमलेले पाणी बाहेर काढण्यात सर्वांच्या प्रयत्नांना यश मिळाले. अथक प्रयत्नानंतर अशोका बोट आणि त्यातील चार कर्मचाऱ्यांना सुखरूप केळवेच्या किनाऱ्यावर आणण्यात सर्वांना यश मिळाले.
बोटीवरील 15 खलाशांना वाचवण्यात यश
काही दिवसांपूर्वी देखील अशीच एक घटना घडली होती. मुरबे येथील प्रवीण तरे यांच्या मालकीची सागरीका बोट बुडाली, समुद्रात वादळ तयार झाल्याने बोटीवर लाटा आदळून बोटीचा काही भाग फुटला सुदैवाने कुठलीही जीवितहानी नाही. मात्र बोटीचा मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. बाजूला मासेमारी करणाऱ्या जितेंद्र तरे यांच्या जयलक्ष्मी बोटीवरील खलाशांनी घटनास्थळी धाव घेतल्याने मोठा अनर्थ टळला