Palghar News : मित्रानेचं संपवलं मैत्रीणीचं आयुष्य, आश्रम शाळेत शिकणाऱ्या मुलीच्या हत्येमुळे पालघर हादरलं
Palghar News : पालघरमध्ये भर रस्तात आश्रम शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थिनीची निर्घृण हत्या करण्यात आली आहे.
पालघर : आश्रम शाळेतून महाविद्यालयात जात असताना बारावीच्या विद्यार्थिनीवर धारधार शस्त्राने हल्ला करण्यात असून तिची निर्घृण हत्या देखील करण्यात आलीये. पालघरमधील (Palghar) मोखाड्यामधून ही घटना समोर आली आहे. मोखाड्यातील रयत शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयात ही विद्यार्थिनी शिकत होती. बारावीमध्ये विज्ञान शाखेत शिकणाऱ्या अर्चना उदार असं या विद्यार्थिनीचं नाव आहे. दरम्यान प्रेम प्रकरणातून ही हत्या झाली असल्याचा संशय सध्या पोलिसांकडून व्यक्त करण्यात येतोय.
नेमकं काय घडलं?
दररोज प्रमाणे शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास अर्चना आश्रम शाळेतून महाविद्यालयामध्ये जात होती. त्यावेळी तिच्यावर तिच्या मित्राने कोयत्याने वार करुन जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यामध्ये अर्चना गंभीर जखमी झाली. आजूबाजूच्या लोकांना तात्काळ तिला रुग्णालयात दाखल केले. पंरतु त्यावेळी अर्चना दुर्दैवी मृत्यू झाला. खरतर गुरुवार (5 ऑक्टोबर) रोजी अर्चनाचा वाढदिवस होता. पण वाढदिवसाच्या अवघ्या एका दिवसानंतर अर्चनाचं आयुष्य संपलं. त्यामुळे संपूर्ण परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
म्हणून अर्चनाचं आयुष्य संपलं
दरम्यान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,अर्चना उदार आणि आरोपी प्रभाकर वाघेरा यांचे मागील तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. पण या विद्यार्थिनीच्या घरच्यांचा त्यांच्या लग्नाला विरोध होता. त्यामुळे विद्यार्थिनीने देखील लग्न करण्यास नकार दिला. याचाच राग मनात धरुन आरोपी प्रभाकरने तिला भर रस्त्यात महाविद्यालयात जात असताना अडवले. त्यावेळी तिच्यावर त्याने धारदार शस्त्राने हल्ला केला आणि तिची हत्या केली.
अर्चनासोबत तिची मैत्रीण देखील होती. ही सगळी घटना घडल्यानंतर तिने आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. परंतु आरोपीने जंगलात पळ काढला. विद्यार्थिनीच्या हत्येनंतर मोखाडा पोलीस ठाण्यात 302 अंतर्गत गुन्हा दाखल झाला करण्यात आलाय. तर पोलिसांकडून आरोपीचा शोध देखील सुरु आहे.
विद्यार्थिनीच्या झालेल्या हत्येनंतर आश्रम शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांमध्ये भीतीच वातावरण निर्माण झालं असल्याचं सांगण्यात येत आहे. अर्चनाच्या हत्येनंतर आश्रम शाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनी देखील सध्या भीतीच्या छायेखाली आहेत . त्यामुळे आता आदिवासी विकास विभागाने विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाल्याचं म्हटलं जात आहे.
तर आता या प्रकरणात पोलिसांच्या हाती काय लागणार हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तसेच आरोपीचा शोध पोलीस कधीपर्यंत घेणार हे देखील महत्त्वाचं ठरेल. तर आश्रम शाळेतील विद्यार्थिनींच्या सुरक्षेची खबरदारी आता कशा प्रकारे घेतली जाणार हा सवाल उपस्थित केला जातोय.