Palghar Rain : पालघरच्या पूर्व भागात अवकाळी पावसाचा तडाखा, आंब्यासह रब्बी पिकांना फटका
Palghar Rain : राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसानं (unseasonal Rain) हजेरी लावली आहे. पालघर जिल्ह्यातही या पावसामुळं शेती पिकांचं नुकसान झालं आहे.
Palghar Rain : राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसानं (unseasonal Rain) हजेरी लावली आहे. हवामान विभागानं (Meteorology Department) चार ते सहा मार्चदरम्यान राज्यात पावसाचा अंदाज वर्तवला होता. त्यानुसार अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. मात्र, याचा मोठा फटका शेती पिकांना (Agriculture Crop) बसला आहे. पालघर जिल्ह्याच्या पूर्व भागातही अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. यामुळं आंबा पिकासह रब्बी पिकांचंही मोठं नुकसान झालं आहे.
Rain : पावसाच्या माऱ्यानं आंबे पडले गळून
पालघर जिल्ह्याच्या पूर्वेच्या विक्रमगड, वाड्यासह काही भागात अचानक विजेच्या गडगडाटासह अवकाळी पावसाच्या जोरदार सरी बरसू लागल्या. शेतकऱ्यांची रब्बी पिकांची काढणी सुरु केली आहे. यामध्ये तुर, हरभरा, वाल पिकाची काढणी सुरु आहे. अशातच अचानक अवकाळी पाऊस सुरु झाल्यानं शेतकऱ्यांची तारंबळ उडाली. तसेच वीटभट्टी मालकांचीही दाणादाण उडाली आहे. आंबा बगायतदारांचेही यामध्ये मोठं नुकसान झालं आहे. आंबाच्या झाडांना मोहर आला असून काही भागात सुपारीच्या आकाराचे आंबे लागले आहेत. जोरदार पावसाच्या माऱ्यानं हे छोट्या आकाराचे आंबे झाडावरुन गळून पडले आहेत. तर काही भागातील मोहरही गळून गेला आहे.
आंबा बागायतदार, वीटभट्टी मालकांचेही नुकसान
काही दिवसापासून तालुक्यात तापमानात चढ-उतार होत आहे. काल रात्री अचानक अडीच ते साडेतीन वाजण्याच्या दरम्यान विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. 45 मिनिट सतत पाऊस झाल्यानंतर पाऊस थांबला असला तरी आंबा बागायतदार, वीटभट्टी मालकांचे नुकसान झाले. रब्बी पिकांसह भाजीपाला तसेच उडदाचे पीक, तुरीचे पीक, त्याचबरोबर काकडी, कलिंगड, चवळी, वांगी, मिरची, गवार, टोमॅटो, भोपळा, मेथी, मुळा, पालक,आदी या पिकांनाही अवकाळी पावसाचा आणि ढगाळ वातावरणाचा मोठा फटका बसणार आहे.
नाशिकसह धुळे आणि बुलढाणा जिल्ह्यातही पावसाची हजेरी
नाशिक जिल्ह्यासह धुळे आणि बुलढाणा जिल्ह्यातही पावसानं हजेरी लावली आहे. त्यामुळं शेतकऱ्यांच्या अडचणीत पुन्हा वाढ झाली आहे. कारण ग्रामीण भागाला अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे. नाशिक जिल्ह्यातील सटाणा, कळवण तालुक्यासह ग्रामीण भागात काही ठिकाणी अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. तर धुळे जिल्ह्यातील साक्री, शिंदखेडा, शिरपूर या तालुक्यांसह धुळे तालुक्यात मध्यरात्रीनंतर अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली. या पावसाचा फटका काढणीला आलेला कांदा, गहू आणि हरभरा पिकाला फटका बसण्याची शक्यता आहे. तसेच पिकावर रोग पडण्याची शक्यता आहे. त्यामुळं शेतकऱ्यांचा औषध फवारणीचा खर्च वाढणार आहे. एकीकडं कांद्यासह भाजीपाल्याला भाव नाही, दुसरीकडे पुन्हा अस्मानी संकट आल्यानं शेतकरी चिंतेत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या: