Palghar News: भातपट्ट्यात केली सूर्यफुलाची लागवड, पालघरच्या शेतकऱ्याची कमाल
सध्या रब्बी हंगामात त्यांनी आपल्या साडेचार एकर जागेत तीळ, हरभरा, तूर, वाल, तागडा याचबरोबर सूर्यफुलाचे उत्पादन घेण्यास सुरुवात केली आहे. हवामानाच्या सतत बदलांमुळे त्याचा विपरीत परिणाम पिकांवर होत असून सूर्यफूल आणि तिळाला त्याचा तेवढा फटका बसत नाही.
Agriculture News : भात शेती हे पालघर (Palghar News) जिल्ह्यातील प्रमुख पीक असले तरी आता सध्या येथील शेतकरी पर्यायी शेतीकडे वळू लागला आहे. पावसाळ्यानंतर याच भागात बागायत शेतीसह रब्बी पिकाकडे शेतकऱ्यांचा कल वळत आहे. त्यामुळे भात शेतीत चांगले उत्पन्न मिळत नसल्याने पर्यायी शेतीतून पालघर जिल्ह्यातील शेतकरी आता आपली स्वतःची आर्थिक घडी मजबूत करत आहेत.
पालघरमधील चहाडे येथील भालचंद्र पाटील यांची वडिलोपार्जित जागा असून ते पारंपारिक पद्धतीने भात शेती करत होते. मात्र सध्या रब्बी हंगामात त्यांनी आपल्या साडेचार एकर जागेत तीळ, हरभरा, तूर, वाल, तागडा याचबरोबर सूर्यफुलाचे उत्पादन घेण्यास सुरुवात केली आहे. सध्या हवामानाच्या सतत बदलांमुळे त्याचा विपरीत परिणाम पिकांवर होत असून सूर्यफूल आणि तिळाला त्याचा तेवढा फटका बसत नाही. भालचंद्र पाटील यांनी आपल्या दीड एकर जागेत सूर्यफूल लागवड केली आहे. या साडेचार एकरातून त्यांना जवळपास तीन महिन्यात दीड ते दोन लाख रुपये उत्पन्न मिळत आहे. पावसाळ्यातील भात कापणीनंतर भालचंद्र पाटील यांनी ही लागवड केली असून सध्या त्यांना यापासून उत्पन्न येण्यास सुरुवात झाली आहे.
भात कापणीनंतर रब्बी पिकाची पेरणी
डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला भात कापणीनंतर याच जागेच्या वाफ्यावर भालचंद्र पाटील यांनी रब्बी पिकाची पेरणी केली. रब्बी पिकांना जास्त प्रमाणात पाण्याची गरज नसल्याने या रब्बी पिकांची वाढ ही जमिनीतील आर्द्रतेमुळे देखील होते. त्यामुळे या रब्बी पिकांना उत्पन्न घेताना जास्त खर्च येत नसून अधिक नफा मिळतो. त्यामुळे पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पावसाळ्यातील भातशेतीनंतर रब्बी पिकांकडे वळावं असं आवाहन भालचंद्र पाटील यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना केले आहे.
पालघर जिल्ह्यातील दुर्गम भागात पावसाळ्यात भातशेती हा एकमेव पर्याय असल्याने येथील नागरिक स्थलांतरित झालेले पाहायला मिळतात. त्यामुळे जर याच दुर्गम भागात रब्बी पिकांची लागवड करण्यास शेतकऱ्यांनी सुरुवात केली तर येथील स्थलांतर कमी होण्यास नक्की मदत होईल.
शेतकरी सजग होऊ लागलाय
गेल्या काही वर्षांपासून शेतकरी दुबार पीक घेण्याचे प्रमाण वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यात प्रामुख्याने पावसाळ्यात खरीप तर उन्हाळ्यात भाजीपाला लागवड शेतकरी करत असतात. परंतु, ग्रामीण भागातील फारच कमी शेतकरी खाद्यतेलाच्या पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात करत आहेत. परंतु आता त्यामध्येही बदल होऊन एकमेकांनी केलेले शेतामधील प्रयोग आणि त्यापासून मिळणारा नफा पाहता आता सध्या शेतकरी जरा सजग होऊ लागला आहे.