Palghar News : पालघरच्या सदिच्छा साने बेपत्ता प्रकरणी दोन वर्षांनी मिथू सिंगला अटक; 18 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी
Palghar News : पालघरच्या (Palghar) सदिच्छा साने (Sadichcha Sane) बेपत्ताप्रकरणी अखेर दोन वर्षांनी मिथू सिंग (Mithu Singh) या जीवरक्षकाला अटक केली आहे.

Palghar News : पालघरच्या (Palghar) सदिच्छा साने (Sadichcha Sane) बेपत्ताप्रकरणी अखेर दोन वर्षांनी मिथू सिंग (Mithu Singh) या जीवरक्षकाला अटक केली आहे. पालघरच्या बोईसरमधील वैद्यकीय शिक्षण घेणारी 22 वर्षीय विद्यार्थिनी सदिच्छा साने ही 29 नोव्हेंबर 2021 पासून बेपत्ता आहे. याप्रकरणी बोईसर पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर बॅन्ड स्टॅन्ड पोलीस स्टेशन बांद्रा इथे हे प्रकरण वर्ग करण्यात आलं होतं. त्यानंतर आता बांद्रा पोलिसांनी जीवरक्षकाला अटक केली आहे.
जीवरक्षकाला बांद्रा पोलिसांनी घेतलं ताब्यात
बांद्रा इथे सदिच्छा साने हिची त्या जीवरक्षकाबरोबर शेवटची भेट झाली होती. मात्र या प्रकरणी अजूनही सबळ पुरावे पोलिसांना मिळाले नसल्याची माहिती एबीपी माझाला बोईसर पोलिसांनी दिली आहे. परंतू, सदिच्छा साने जीवरक्षकाला शेवटी भेटली आणि तिथेच तिचा मोबाईल स्विच ऑफ झाला. यामुळं या जीवरक्षकाला बांद्रा पोलिसांनी सध्या ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. सदिच्छा साने बेपत्ता प्रकरणी सुमारे दोन वर्षानंतर पोलिसांनी जीवरक्षक मिथू सिंग याला अटक केली आहे. बॅन्ड स्टॅन्ड इथे सिंग यानेच तिला शेवटचे पाहिले होते.
29 नोव्हेंबर 2021 ला सदिच्छा झाली होती गायब
दक्षिण मुंबई येथील जे. जे. ग्रॅन्ट मेडिकल कॉलेजमध्ये सदिच्छा साने ही तिसऱ्या वर्षात शिकत होती. 29 नोव्हेंबर 2021 रोजी ती परीक्षेसाठी जाते म्हणून घरातून निघाली. ती माघारी परतलीच नाही. सदिच्छाचा शोध कुठेच लागत नसल्यानं तिच्या कुटुंबियांनी बोईसर पोलिस ठाण्यात तक्रार केली आहे. सदिच्छा बेपत्ता होऊन 15 दिवस उलटल्यानंतरही जेव्हा तिच्याशी संपर्क होऊ शकला नाही. तेव्हा कुटुंबीयांनी तिच्या अपहरणाचा संशय व्यक्त केला होता. सदिच्छाचा शोध घेण्यासाठी सोशल मीडियासह बँड स्टॅन्ड बस स्थानकासह वांद्रे परिसरात अनेक ठिकाणी तिचे फोटो लावण्यात आले होते. तर पालघर मध्येही या प्रकरणी अनेक मोर्चे निघाले होते.
जे. जे. मध्ये परीक्षेस जाते म्हणून ती घराबाहेर पडल्याने जे. जे. मार्ग पोलिसांनी देखील तिचा शोध घेतला. तिचा काहीच ठावठिकाणा लागत नसल्याने या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला होता. तांत्रिक पुराव्यांवरुन तिचे शेवटचे लोकेशन वांद्रे बॅन्ड स्टॅन्ड येत होते. त्यामुळं तिच्या कुटुंबियांनी वांद्रे पोलिस ठाण्यातही धाव घेतली होती. गुन्हे शाखा युनिट 9 ने याबाबत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करतानाच पोलिसांनी 100 पेक्षा अधिक जणांची चौकशी देखील केली. सदिच्छाला शेवटचे जीवरक्षक मिथू सिंगने पाहिले होते.
कोण आहे मिथू सिंग?
मिथू सिंगचा वांद्रे परिसरातील बॅन्ड स्टॅन्ड भागात मित्स किचन नावाचा फूड स्टॉल होता. फूड स्टॉलवर येणाऱ्या ग्राहकांसोबत सेल्फी घेऊन तो सोशल मीडियावर पोस्ट करत असे. त्यामुळं आपल्या फूड स्टॉलची प्रसिद्धी होते, असे त्याने पोलिसांना सांगितले होते. अशा प्रकारे अनेक जणांसोबत काढलेले सेल्फीही मिथूने पोलीस आणि सदिच्छा सानेच्या कुटुंबियांनाही दाखवले होते.
पोलिसांनी मिथू सिंगची चौकशी केली मात्र तो चौकशीत सहकार्य करत नसल्याने पोलिसांना न्यायालयात मिथूच्या नार्को चाचणीसाठी अर्ज केला होता. पोलिसांनी मिथू विरोधात पुरावे गोळा केले. परिस्थितीजन्य पुराव्यांवरून मिथू सिंग याला अटक केल्याचे पोलिसांनी सांगितले. न्यायालयाने त्याला 18 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
पिंपरी चिंचवडमधील गायब झालेल्या वकिलाची हत्या प्रेमप्रकरणातून; महिलेच्या पतीसह तिघांना अटक
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
