पिंपरी चिंचवडमधील गायब झालेल्या वकिलाची हत्या प्रेमप्रकरणातून; महिलेच्या पतीसह तिघांना अटक
Pune Crime : वकिलाचे नात्यातीलच विवाहित महिलेशी प्रेमसंबंध होते अन् त्या महिलेच्या पतीनेच अपहरण करून ही हत्या केली अन् पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला.
Pune Crime : पिंपरी चिंचवडमधील (Pimpri Chinchwad) गायब झालेल्या वकिलाची हत्या प्रेमप्रकरणातून झाल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे. वकील शिवशंकर शिंदे (Shiv Shankar Shinde) यांचा मृतदेह हा अर्धवट जळालेल्या अवस्थेत महाराष्ट्र तेलंगणा सीमेवरील मदनुर इथे आढळला होता. वकिलाचे नात्यातीलच विवाहित महिलेशी संबंध होते अन् त्या महिलेच्या पतीनेच अपहरण करून ही हत्या केली अन् पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला. हे आत्तापर्यंतच्या तपासात समोर आलेलं आहे.
शिवशंकर शिंदे यांचा अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह सापडला होता. नांदेड जिल्ह्यात हा मृतदेह आढळला असून तिथल्या पोलिसांनी तिघांना ताब्यातही घेतलं होतं. आता त्या तिघांचा ताबा पिंपरी चिंचवड पोलिसांनी घेतलेला आहे. त्यात संबंधित विवाहित महिलेचा पती, पतीचा भाचा आणि त्याचा चालक अशा तिघांचा यात समावेश आहे. त्यांनी वकिलाचे 31 डिसेंबरच्या दुपारी कार्यालयातून अपहरण केले. हात-पाय अन् तोंड बांधून वकिलास एका ड्रममध्ये बसवले. मग हा ड्रम एका टेम्पोत टाकून नांदेड जिल्ह्याच्या टोकाला आणले अन् तिथंच अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. पण पिंपरी चिंचवड ते नांदेड या दरम्यानच्या काळात हत्या कशी केली, हे पुढील तपासात निष्पन्न होणार आहे.
हत्येमागचं मुख्य कारण
वकील शिवशंकर शिंदेंचं लग्न झालेलं आहे, असं असतानाही त्यांचं नात्यातील एका महिलेशी प्रेमसंबंध होते. त्या महिलेचं दहा वर्षांपूर्वी विवाह झाला. मात्र तरीही दोघांनी त्या संबंधांत दुरावा आणला नाही. कालांतराने नात्यातील महिलेच्या संसारात विघ्न आलंच. त्यामुळं गेल्या पाच वर्षांपासून ती महिला पतीपासून वेगळी राहू लागली. अशातच वकील शिवशंकर यांनी 'त्या' पतीस घटस्फोट घे अथवा आत्महत्या कर, असं वारंवार धमकावले. या धमकीला त्रासून त्याने थेट वकिलाचा काटा काढायचं ठरवलं अन कट रचून हत्या केली.
वकील शिवशंकर शिंदे कार्यालयातून बेपत्ता
वकील शिवशंकर शिंदे 31 डिसेंबर 2022 रोजी त्यांच्या ऑफिसमधून बेपत्ता झाले होते. कुटुंबियांनी त्यांच्याशी संपर्क केला, परंतु तो होऊ शकला नाही. त्यामुळे शिंदे बेपत्ता झाल्याची शंका त्यांच्या मनात आली. यानंतर कुटुंबीय वाकड पोलिसात तक्रार नोंदवण्यासाठी गेले होते. परंतु वाकड पोलिसांनी तक्रार नोंदवून घेण्यासाठी टाळाटाळ केल्याचा आरोप कुटुंबियांनी केला. अखेर रात्री उशिरा वकील शिवशंकर शिंदे बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांनी नोंदवून घेतली. पोलिसांनी तपास देखील सुरु केला. मात्र तपास सुरु झाल्यानंतर काही तास उलटले नाहीत तोपर्यंत शिवशंकर शिंदे यांचा अर्धवट जळलेला मृतदेह महाराष्ट्र तेलंगणा सीमेवरील मदनुर इथे आढळला .
मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत सापडला
मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळल्याने त्यांची हत्या झाली असावी असा संशय वाकड पोलिसांनी व्यक्त केला होता. त्यात नांदेडमधील पोलिसांनी शिंदे यांच्या नातेवाईकांना ताब्यात घेतलं . त्यांनीच पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला, परंतु तो अर्धवटच जळाला. आता या आरोपींना ताब्यात घेतल्यानंतरच वकील शिवशंकर शिंदे यांच्या मृत्यूचं खरं कारण समोर आलं आहे.
VIDEO : Pune Crime : बेपत्ता झालेले वकील शिवशंकर शिंदे यांचा मृतदेह नांदेडमध्ये आढळला