Osmanabad Farmers : सोयाबीनला फूल ना शेंगा, नुकसान भरपाई कधी देणार ते सांगा, शेतकरी थेट जिल्हाधिकारी कार्यालयात
अतिवृष्टी, गोगलगायींचा हल्ला आणि अळ्यांचा प्रादुर्भाव यामुळं खरीप हंगामातील सोयाबीन पिकाचे (Soybean Crop) मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळं उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मदतीची मागणी केली आहे.
Osmanabad Farmers : अतिवृष्टी, गोगलगायींचा हल्ला आणि अळ्यांचा प्रादुर्भाव यामुळं खरीप हंगामातील सोयाबीन पिकाचे (Soybean Crop) मोठे नुकसान झाले आहे. शिवारात हिरवे सोयाबीन दिसत असले तरी त्याला फुले ना शेंगा अशी अवस्था आहे. नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी तलाठी मंडल अधिकार्यांना सांगून देखील अद्याप पाहणी केलेली नाही. त्यामुळं नुकसान भरपाई मिळावी या मागणीसाठी उस्मानाबाद (Osmanabad) तालुक्यातील सुर्डी येथील शेतकर्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालय गाठून कैफियत मांडली. नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे अशा जोरदार घोषणा देत जिल्हाधिकार्यांना मागणीचे निवेदन दिले.
उस्मानाबाद तालुक्यातील सुर्डी शिवारात शेतकर्यांनी मोठ्या प्रमाणात सोयाबीन पिकाची लागवड केली आहे. खरीप हंगामाच्या सुरुवातीपासूनच नैसर्गिक आपत्तीमुळं यंदा सोयाबीन पिक संकटात सापडले आहे. सुरुवातीलाच अतिवृष्टी आणि गोगलगायींच्या हल्ल्यामुळे पिकांची मोठ्या प्रमाणात नासधूस झाली. फुले लागण्याच्या अवस्थेतच चार-चार वेळा फवारण्या केल्यानंतरही पिकावर अळ्यांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळं कोवळ्या शेंगा अळ्यांनी फस्त केल्या आहेत. त्यामुळं सोयाबीन पीक हातून गेल्याची भावना शेतकर्यांमध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळं शेतकरी संकटात सापडले आहेत.
तत्काळ मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी
अतिवृष्टीनं झालेल्या नुकसानीची पाहणी करण्याचे आदेश शासनाने दिलेले असताना अद्याप महसूल प्रशासनातील एकही व्यक्ती सुर्डी शिवारात फिरकलेली नाही. तलाठी, मंडळ अधिकार्यांशी संपर्क साधून नुकसानीची पाहणी करण्याची विनंती केल्यानंतरही कोणी दखल घेण्यास तयार नाही. त्यामुळं संतप्त झालेल्या शेतकर्यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जोरदार घोषणाबाजी केली. शिवारातील पिकांच्या झालेल्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी आणि पंचनामे करुन तत्काळ आर्थिक मदत द्यावी अशी मागणी या निवेदनात शेतकर्यांनी केली आहे.
पेरणीवरचा खर्च तरी पदरात पडेल का?
उस्मानाबाद तालुक्यातील सुर्डी शिवारातील पिकांप्रमाणेच जिल्ह्यातील अनेक गावातील शेतकर्यांच्या पिकांची अवस्था झालेली आहे. अतिवृष्टीमुळं शिवारात पाणी साचल्याने पिकांची वाढ झाली नाही. ज्या शिवारात वाढ झाली तिथे गोगलगायी आणि अळ्यांमुळे सोयाबीनला फुले लागली तरी शेंगा पोखरल्या आहेत. त्यामुळं सोयाबीन लागवडीसाठी केलेला खर्च तरी पदरात पडेल की नाही, याची धास्ती शेतकर्यांना आहे.
महत्त्वाच्या बातम्या: